तू...

Started by Jueli, December 10, 2016, 10:28:57 PM

Previous topic - Next topic

Jueli

दिवसभराचा थकून मी दार ठोठावणार
इतक्यात,
"निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई,
आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही?"
तू गात होतीस,
तसा गायकी गळा नाही तुझा
पण सुंदर गातेस..
मागेही जाणवलं होतं ते,
जेव्हा स्वयंपाकघरात फोडणी देताना
"सलोना सा सजन है और मै हू"
गात होतीस.
गोड वाटला आवाज तुझा
जेव्हा मिठीत शिरून,
"रिमझिम गिरे सावन"
आळवत होतीस.
तेव्हा तर अगदी पाऊसच पडावा इतकं सुंदर बरसत होतीस..

"जगावेगळी ही ममता जगावेगळी अंगाई"
तुझ्या कातरलेल्या स्वरांनी मी भानावर आलो,
हळूच दार उघडलं, तर पाठमोरी बसलेलीस,
मांडीवर छोटी तू,
मी अगदी हळुवार पावलांनी जवळ आलो.
साधी कॉटनची लाल साडी, पण किती आकर्षक दिसलीस,
छोटीशी काळी टिकली,
कानात नाजूकसे मोती,
आणि कसलंही बंधन नसलेला मुक्त गळा,
मंगळसूत्राशिवाय!
पिल्लू तुझ्या कुशीत झोपलेली,
तिच्या गालावर तुझ्या डोळ्यातला अश्रू सांडणार,
इतक्यात मी अलगद तो झेलला,
तू जणू मी आहे हे माहीत असल्यासारखी प्रसन्न हसलीस..

"आज उशीर केलास यायला, पिल्लू झोपलं बघ बाबाला न भेटता"
मी तरीही तुझ्याकडे एकटक पाहत होतो,
तो गोल पण सुंदर चेहरा,
बोलके डोळे,
आणि त्यातलं प्रेम,
माझ्यावरचं अन् तिच्यावरचं.
हळूच तू तिला पाळण्यात ठेवलंस,
आणि उठून आत गेलीस..

मी भारावल्यासारखा तुझ्यामागे आलो,
तू सवयीने कॉफी करायला घेतलीस,
घट्ट मिठी मारावीशी वाटली तुला,
"जरा इथे बघ"
तू वळलीस,
अगदी मला होकार दिल्यावर वळलीस त्याच डौलाने!
बघत राहिलो तुझ्याकडे,
अन् आठवत गेलीस तू, प्रत्येक रूपातली,
मंगलाष्टकं सुरु असताना हुंदका दाबणारी,
आई रडताना "Chill Mom, मी आहे इथेच" म्हणणारी,
त्याच रात्री माझ्या कुशीत शिरून लहान पिल्लागत रडणारी,
माझ्या स्पर्शात उलगडणारी,
रोमांचित होणारी,
शहाऱ्यांत न्हाऊन निघणारी,
प्रसवकळा सहन करणारी,
पिल्लू दिसल्यावर रडू आवरणारी,
तू आठवलीस..

"अरे बघतोस काय असा?"
मी तुला घट्ट मिठी मारतो,
सगळं समजल्यासारखी तू मला अजूनच जवळ घेतेस,
"तेरे बिना जिया जाये ना,
तेरे बिना जिया जाये ना,
बिन तेरे तेरे बिन साजना,
सांस में सांस आये ना"
तू गुणगुणतेस,
आणि मी,
मी घायाळ होत जातो पुन्हा एकदा!