नाळ...

Started by Jueli, December 17, 2016, 09:02:36 PM

Previous topic - Next topic

Jueli

त्या कोपऱ्यात एक दिवा पेटतोय,

ह्या कोपऱ्यात पंखा फिरतोय.

टेबलावर चार कॉफीचे मग,

पाचव्या मगातली कॉफी अर्धी माझ्या पोटात,

अर्धी कपात,

मगाच्या कडेला एक ओघळ येतो कॉफीचा,

हळूच माझ्या समोरच्या उघड्या डायरीच्या पानावर पडतो...


मी निरखत बसते

तो तांबडा, टप्पोरा थेंब.

कागद रंग बदलतो

अगदी सरड्यासारखा

क्षणार्धात !


पंख्याचा आवाज विचित्र यायला लागतो,

त्यात एक कागद रोलर कोस्टर खेळत असतो,

आणि मला जाणवतं,

अर्धीच आहे कविता,

मी गर्भार आहे,

माझ्या पोटात कवितेचा गर्भ !

प्रसवकळांना सुरुवात,

भयानक वेदना,

मी आक्रंदत असते मनात,

रडत असते हृदयात...


कविता अर्धीच झालेली असते,

बहुदा सिझेरियन करावं लागणार,

डॉक्टर ?

छे !

मीच करणार..

लेखणी घेतली आणि चिरलं मन,

थोडे शब्द बाहेर पडले,

लालसर रक्त जणू !


थोडं अजून आत जावं लागलं,

येस!

मिळाली,

कविता मिळाली,

बाहेरही आली.

हो, हो, सुखरूप आहेत,

कविता अन् कवयित्री !


एक गोष्ट बाकी आहे,

नाळ,

हो ती कापावी लागेल,

पण सापडत नाहीये,

श्या ! असं कसं झालं बुवा ?

नाळ तर हवी ना...


शोधाशोध सुरु होती माझी,

कॉफीच्या मगात,

टेबलावर,

डायरीत,

लॅम्पवर.

सापडली,

ती बघा कागदावर,

कापता येणार नाही फक्त,

कारण आधीच पडली आहे बाहेर ती,

स्वतंत्र,

स्वच्छंद !