वाचन किती महत्वाचे?

Started by yallappa.kokane, December 22, 2016, 12:04:49 AM

Previous topic - Next topic

yallappa.kokane

वाचन किती महत्वाचे?

    प्रेमात पडायचं असेल तर पुस्तकाच्या प्रेमात पडावं. आणि नाती जोडायची असतील तर पुस्तकाशी जोडावं. कारण जो एखाद्याच्या प्रेमात पडतो तो त्याची खुप काळजी घेतो व त्याला जीवापाड जपतो. जर तुम्ही पुस्तकांच्या प्रेमात पडाल तर सहजच तुम्हाला वाचनाची आवड लागेल. मी तर म्हणतो तुम्ही एकदा पुस्तकाच्या प्रेमात पडूनच बघा. आणि पहा काय फरक जाणवतो.

    वाचन म्हणजे कला. वाचन ही अशी कला जी व्यवहारात दैनंदिन जीवनात याची खुप मदत होते. माणसाला इतर व्यसनांपेक्षा वाचनाचं खुप व्यसन असावं. अडलेल्यांना मार्ग दाखवतो ते म्हणजे वाचन. समजा एखाद्या विषयावर चर्चा सुरू आहे आणि त्या चर्चेचा तूम्ही एक भाग आहात. खुप वेळा अशी परिस्थिती निर्माण होते की चर्चेमधल्या विषयांवर तुम्ही पूर्वी काहीतरी वाचन केलं आहे व इतर कोणालाही त्याच्याबद्दल माहीती नाही आणि काहीच क्षण न दवडता तुम्ही लगेच त्याची माहीती त्या चर्चेत पूरविता. त्याक्षणी त्या चर्चेत तुमचा दरारा असेल. व इतर सर्व जण तुम्हाला एक हूशार व्यक्ती म्हणून पाहत असतात. त्यावेळी आपण इतरांवर एक वेगळीच छाप सोडतो. हे फक्त होतं वाचणामूळेच.

    तुम्हाला आवडत्या व्यक्तीची मैत्री करायची असेल तर काहीही करून जीवाचा आटापिटा करून तुम्ही त्या व्यक्तीची माहीती मिळवता व त्यांच्याशी संपर्क  साधण्याचा प्रयत्न करता, हेच पुस्तकाच्या बाबतीत घडलं तर. खुपच फरक पडेल. एकदा का तुम्हाला  वाचनाची सवय लागली की बघा फरक किती पडतो. ते स्वत:लाच विचारा. पुस्तक हा आपला गुरू असतो हे मानायला हरकत नाही कारण आपण ज्या गोष्टीचे वाचन केले आहे त्या वाचनातून आपण बरंच काही शिकतो व घडतो. शिकवण्याचं, मार्ग दाखवण्याचं, घडवण्याचं काम हे पुस्तक करतंच ना! मग पुस्तक म्हणजे आपला गुरूच आहे. पुस्तक हा आपला मार्गदर्शक असतो. बऱ्याच वेळी चुकलेला रस्ता सोडून सरळ मार्गाने चालण्यास भाग पाडण्याचे काम ते पुस्तकालाच जमतं.

    काही केलेलं वाचन हे आपल्या कधी काही तासांपुरतं स्मरणात राहतं तर काही केलेलं वाचन हे आपण कधी विसरूच शकत नाही. तुम्ही याचा विचार केलात का हो कधी! हे असं का घडतं. आपण काही वाचताना आजुबाजुला काही गडबड व गोंधळ असेल तर खरंच ते वाचन जास्त काळ आपल्या स्मरणात राहत नाही. वाचन करताना त्या पुस्तकातील प्रत्येक पात्रात आपल्याला पहावं. वाचन करताना त्या कथेचा वा त्या गोष्टींचा आपण एक भाग आहोत असे जर आपल्या मनात असेल तर तसे वाचन आपण लवकर विसरत नाही. कधी कधी ते आपल्या कायमच्या स्मरणात राहतात.

    निरीक्षण करणे ही माझी सवय. माझा दिवसभराचा बराच वेळ हा प्रवासात जातो. घर ते कार्यालयात, कार्यालय ते घर  (मी बदलापूर येथे राहतो व कामासाठी अंधेरी (एअरपोर्ट रोड-मेट्रो) येथे येतो. प्रवासात व्यक्ती आपला वेळ जात नाही म्हणून बहूतेक जण आपल्या मोबाईल मध्ये मग्न असतात हे मला नेहमी पहायला मिळतं. कोणी गेम खेळतो तर कोणी काणाला हिअर फोन लावून गाणी ऐकतो. हे करत असताना बहूतेक वेळा आपल्या अवती -भोवती काय घडतं आहे हे लवकर त्या व्यक्तीच्या लक्षात येत नाही. माझं असे म्हणणे आहे की हीच मग्नता आपण वाचनात दाखवली तर त्याचा बराच फायदा होईल. माझे तरूण वर्गाला हेच सांगायचं आहे की तुम्ही भविष्य आहात. जसा वेळ मिळेल तसे जास्तीत जास्त वाचन करा. अशा गोष्टी करणे टाळा की ज्या गोष्टीचा आपल्या फायदा होत नाही.

    वाचनाचे बरेच फायदे आहेत हे वेगळे सांगायची गरज नाही. आपले वाचन नियमीत असेल तर  समाजात वावरताना, व्यक्तीशी संवाद साधताना आपण कधीच अडखळत नाही. संवाद साधताना कधी कुठे कोणता शब्द वापरावा हे लगेच लक्षात येते. थोडक्यात सांगायचं म्हणजे वाचनामूळे आपल्या ज्ञानात बरीच भर (शब्दांची) पडते. लिखाण करतानाही आपल्या शुद्धलेखनात भर पडते.

    माझ्या बरोबर घडलेला एक किस्सा तुम्हाला सांगतो. २००४ सालची गोष्ट आहे. मी श्री. प्रवीण दवणे सरांचं एक पुस्तक वाचलं आणि मला राहवलं गेलं नाही आणि मी पुस्तक आवडलं म्हणून त्यांना पत्राद्वारे कळवलं. आठवडा भरातच मला त्यांचं पत्र आलं. मला पत्र आलं होतं तेव्हा तो दिवस होता १५/५/२००४ पंधरा मे दोन हजार चार. ते पत्र मी अजून जपून ठेवलं आहे. "प्रेम व्यक्त करणारं, लेखणास प्रतिसाद देणारं पत्र खुप आवडलं" असं त्यांनी पत्रात नमूद केलं होतं. पत्रात त्यांनी मला असाही एक सल्ला दिला की, " तुझं सर्व शिक्षण पूर्ण झाल्यावर आधी बाह्यावाचणावर भर दे." त्याचं कारणही तसंच होतं.  मी त्या पत्रात भावनेच्या भरात "आशीर्वाद" हा शब्द "आर्शिवाद" असा लिहिला होता. त्यांनी तो मला त्यांच्या शैलीत पत्राद्वारे समजवून सांगितला होता. बाह्यवाचन व शुद्धलेखनावर जास्त भर देण्यास त्यांनी मला सांगितले. खरं सांगू मित्रांनो मी तूम्हाला, त्या एका पत्रामुळे मला खुप काही शिकायला मिळाले. त्यांचं पत्र आलं  तेव्हा मी कला शाखेत (समाजशास्त्र विषय) दुसऱ्या वर्षाला होतो. मी  त्यावेळी समाजशास्त्र या विषयाचं वाचन फार कमी केलं, व इतर लेखकांची, कवींची पुस्तकं वाचण्यास भर दिला. श्री. प्रविण दवणे सर खरंच तुमच्या एका पत्रामुळे माझ्यात खुप बदल घडून आले आहे. धन्यवाद श्री. प्रविण दवणे सर.

यल्लप्पा सटवाजी कोकणे
२२ डिसेंबर २०१६

९८९२५६७२६४
यल्लप्पा सटवाजी कोकणे
९८९२५६७२६४
बदलापूर