कविता चोरांस मार्गदर्शन भाग-2

Started by Rajesh khakre, December 22, 2016, 05:27:33 PM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

कविताचोरांस मार्गदर्शन भाग -2

रात्री उशिरापर्यंत जागून आम्ही लिहलेल्या 'कविताचोरास मार्गदर्शन' या लेखास मिळालेली अपार प्रसिद्धी आणि अगदी सकाळी सकाळी आम्ही जेव्हा इमेलचा इनबॉक्स उघडला तेव्हा त्यात आपण दिलेल्या भरभरुन प्रतिसादामुळे आम्हास भलतीच प्रेरणा मिळाल्याने हा लेखप्रपंच न राहावून आम्ही हाती घेतला आहे, त्यात कविताचोरांचे हक्क अबाधित रहावे हे आमचे प्रमुख ध्येय असल्याचे आम्ही पुन्हा मुद्दामहून नमूद करत आहोत.
अगदी काल काल आमच्या निर्दशनास आलेली घटना म्हणजे आपल्याच कुणा एका सन्माननीय महोदय यांनी काल कुणा कविमार्फत चालवली जाणाऱ्या एका ऑनलाइन नियतकालिकाची "साहित्य पाठवा" अशा आशयाची जाहिरात हातोहात चोरल्याचे समोर आले आहे.हे गैरबीर कृत्य आहे असे नाही मानले तरी उगीच टाईप करण्याची तसदी का घ्यावी हा आम्ही करत असलेला विचार कविलोक का करत नाही हे न कळणारे आहे. आमच्या मागाहून हे ही लक्षात आले आहे की त्यांनी केलेली जाहिरात चोरी ही सुद्धा साहित्याच्या सेवेसाठीच केली आहे ते ऐकून आमचा कविता,साहित्य चोरांबद्दलचा आदर द्विगुणित झाला आहे.
याबाबत एक महत्वाची गोष्ट आम्ही आमच्या कविता/साहित्यचोर मित्रास अतिशय अनुभवाने सांगू इच्छीतो ती ही की, आज बरेच कवी लोक कविता वगैरे लिहत असले तरी सरसकट कोणतीही कविता चोरण्याच्या मोहात पडू नये. शक्यतो मार्केट मध्ये चालेल अशीच (दर्जेदार वगैरे असं काही तरी म्हणतात तशी) कविता अतिशय निर्लज्जपने चोरावी. सुमार दर्जाच्या कविता चोरुन काहीही उपयोग होत नाही.त्या कोणीही वाचत नाही त्यामुळे त्या आपल्यालाच वाचत बसाव्या लागतात आणि आपला मौल्यवान वेळ उगीच वाया जातो. कविता चोरीला गेली म्हणजे नक्कीच दर्जेदार होती असा एक मापदंड कविवर्गात रूढ़ झालेला आमच्या ऐकण्यात आलेला आहे.त्यामुळे कधिकधी ते कवी अशावेळी विनाकारण खुश होतात, त्यामुळे अशी चुक आपल्याकडून अजिबात होता कामा नये.
या बाबत काळजी घ्यावी.
कविता/साहित्यचोरी ही कला आहे आणि त्यामुळेच आधीच अस्तित्वात असलेल्या 64 कलेत कविताचोरी या 65 व्या कलेची भर घालण्याची कल्पना आमच्याशिवाय कुणाच्याही लक्षात कशी आली नाही याचे आम्हाला राहून राहून आश्चर्य वाटते.
कारण कविता चोरी करने निश्चितच वाटते तितकी सोपी कला नाही.त्यासाठी सहनशक्ति असावी लागते कारण पकड़ले गेल्यावर मुळ कवी लेखक यांचे नाही नाही ते बोलणे सहन करण्याची प्रचंड क्षमता कविताचोरात असते.याशिवाय साहित्यरूचीहीनता,निर्लज्जता, अकलात्मकता, आदि गुणांची गरज असते ते वेगळेच.त्यामुळे कविताचोरीस 65 वी कला म्हणून बहुमान मिळत नाही तोपर्यंत आम्ही कदापिहि स्वस्थ बसणार नाही.
कविताचोरास समाजात मानाचे स्थान मिळण्यासाठी लढ़ा- बिढा उभारण्यास सर्व कविताचोरांनी संघटित होण्याची आवश्यकता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.यासाठी लवकरच गुपचुप कविताचोरांची नोंदणी हा कार्यक्रम ही हाती घेत आहोत.
कविताचोर हा शब्द सरळढोपट वापरला जात असला तरी आमच्या अतिशय दीर्घ अशा अभ्यासातून कविता/साहित्यचोरांचे आम्ही काही प्रकार केले आहे ते अतिशय दुर्लभ ज्ञान आपणांस सांगत आहे,
1) स्वार्थी कविताचोर : या प्रकारचे कविताचोर हे कवीचे नाव काढून त्याठिकाणी आपले नाव टाकून फॉरवर्ड करतात. ह्या व्यक्ती स्वार्थी व पोकळ प्रसिद्धीच्या मागे असतात.त्यांचे साहित्य,कविता यावर अजिबात प्रेम नसते.
आपली कवी बनण्याची अतृप्त इच्छा ते अशा रितीने पूर्ण करु इच्छितात, अशा व्यक्ती कधीच  कवी बनू शकत नाही.
2) असंवेदनशील कविताचोर: या प्रकारचे लोक हे कविता कॉपी करुन कवितेखालील कवीचे नाव काढून निनावी कविता forword करतात.हे स्वतः चे नाव टाकत नसले तरी त्यांची मुळकवीला श्रेय देण्याची अजिबात मानसिकता नसते, तसेच कला हि कुणाची तरी बौद्धिक प्रॉपर्टी आहे ही गोष्ट त्यांच्या ध्यानात येत नाही.पापशालनार्थ ह्याच व्यक्ती पुढे अशा कवितेवर "हि कविता कुणाची आहे माहीत नाही पण ज्याची असेल त्याला लाख सलाम" असं काही बाही लिहून  कविता फॉरवर्ड करत असतात.
असे अनेक प्रकार करता येतील पण हे मुख्य प्रकार आहेत.
जाता जाता एक कानगोष्ट आम्ही आपणांस सांगून जात आहोत ती ही की, कवी या जगात काही तरी नवनिर्मिती करत असतो, समाजभान जपत असतो, मात्र समाजात जोपर्यंत ती दृष्टी निर्माण होत नाही तोपर्यंत कविताचोराला काहीही मरण नाही, ते निर्लज्जपणे, असंवेदनशिलपणे कविता साहित्य चोरत राहतील.
"कविताचोरांचे भवितव्य" ह्या अतिशय महत्वाच्या विषयावर उद्या व्याख्यान द्यावयाचे असल्याने काही मुद्दे चोरावयाचे बाकी आहेत, त्यामुळे तूर्तास आपली रजा घेतो आहे.
© राजेश खाकरे
Mo 7875438494
http://rajeshkhakre.blogspot.in

(ता.क :- आम्ही आता लिहलेला हा लेख ही चोरीला जाण्याची दाट भीती असल्याने आम्ही आधीच तो रजिस्टर वगैरे करुन पाठवत आहोत )