दिसलीस आज मला...

Started by swapnil.huddar, January 05, 2017, 10:45:02 AM

Previous topic - Next topic

swapnil.huddar

समुद्र जसा खेळतो रोज त्याच्याच लाटांवर,
दिसलीस आज मला, पुन्हा त्याच वाटांवर...

पाहिलस मला चोरून, लक्ष न गेल्यासारखं,
भास झाला अगदि,तू जवळ केल्यासारखं...
वाट का पाहतेयस, समोरून बोल आज तरी,
हा दिवस पाहण्यासाठी, किती आठवणी जपल्या उरी...
नजर का लपवतेयस, पाणी ठेऊन पापण्यावर,
दिसलीस आज मला, पुन्हा त्याच वाटांवर...

बिथरतील ओठ तुझे, नाव माझं घेताना,
चलबिचल होईल मन, साद मला देताना...
असं न भेटता निघून जाणं तुला जमणार नाही,
तू सुद्धा जपल्या असतीलच ना, माझ्या आठवणी काही...
आली होतीस का गं, आपण भेटायचो त्या जागांवर,
दिसलीस आज मला, पुन्हा त्याच वाटांवर...

समोरा समोर आलो बघ, लपत लपत एकमेकांपासून,
विसरलो सगळं दु:ख, जेव्हा पाहिलस मला हसून...
त्याचवेळी या ढगांना बरसायला कुणी सांगितलं,
आपण हसताना, त्यांना रडायला कुणी सांगितलं...
बरसू दे त्यांना, आपण भिजू त्यांच्या आसवांवर,
दिसलीस आज मला, पुन्हा त्याच वाटांवर...

ओल्या होताच आठवणी, निघायची वेळ झाली,
प्रश्न ठेवत चेहऱ्यावर, उत्तरांना तू पुन्हा टाळत आली...
क्षणासाठी का होईना, आपण आज जवळ आलो,
विसरू शकणार नाही असं ठरवून, परत एकदा वेगळे झालो...
हट्ट न करता जाऊ देतोय, जप मला आयुष्यभर,
पुन्हा कधीतरी वेळ काढून, भेट त्याच वाटेवर.
- स्वप्नील