भेट

Started by Minal Kulkarni, January 15, 2017, 10:36:41 AM

Previous topic - Next topic

Minal Kulkarni

भेट

तो :
आज कित्येक वर्षांनी झाली भेट
नजर काळजात रुतली थेट
काय बोलायचे सुचले नाही
न बोलणेही रुचले नाही
तु कशी मी कसा ?
मुलं बाळ संसार कसा ?
आजकाल उन्हाळा
खूप वाढलाय ना
चला, वेळ मारुन न्यायला
मी कोणतातरी विषय काढलाय ना
खरचं, अगदीच अनोळखी
झालयं का आपलं जग...
प्रत्येक वाक्यानंतर बोलतोय
आणखी काय चाललय मग...
मला वाटलं तुझही
असचं काहीसं झाल असेल
शब्दांचा विचारांशी
मेळच बसत नसेल
उपचारा पुरतं
बोलशील काही
नजर नजरेला
द्यायची नाही
पण तू तर पुर्वीसारखीच
बिनदिक्कत पहात राहीलीस
खळखळणा-या झ-यासारखी
मनापासून वहात राहीलीस
ओथंबलेले होते
सारेच तुझे शब्द
मीच होतो मूकं
जग माझं स्तब्ध
नकळत उलगडलस
भूतकाळातलं  पानं
प्रत्येक आठवण मनात
कोरली होतीस छानं

ती :
ते कौलारु घर आणि
कुंपणावर वेलीचा तिढा
अजूनही पडतो कां
अंगणात प्राजक्ताचा सडा
आजही माझ्या मनात
मोहर आंब्याचा दरवळतो
पावसाच्या एका थेंबामधे
सारा भूतकाळ विरघळतो
तू अजूनही तसाच
पावसावर चिडतोस कां रे?
चिखल उडेल म्हणून
बाहेर जायचं टाळतोस कां  रे ?

तो :
कित्ती प्रश्न आज
तुझ्या मनात होते साठले
माझ्या वरच्या रागाचे
मळभ नव्हते कां दाटले ?
एकदा तरी विचार जाब
कां गेलो सारे बंध तोडून
आयुष्याच्या वळणावर
तुला असं मागे सोडून ?

ती :
तू गेलास ? असं खरच तुला वाटतं ?
सोडून तर मी आले
मात करून माझ्या भूतकाळावर..
मला तर तू अजूनही
दिसतो आहेस थबकलेला
आयुष्याच्या त्याच वळणावर....
          - मीनल