मनातून....पानावर....

Started by Minal Kulkarni, January 16, 2017, 07:14:26 PM

Previous topic - Next topic

Minal Kulkarni

मनातून....पानावर....

कविता ?.......छे !!
शब्दाचा शब्दांशी झालेला वाद
अहं... मनाने मनाला घातलेली साद
की कल्पनांची नुसतीच एक श्रृंखला
सहजपणे गुंफलेली अक्षरांच्या धाग्यात
नाही या पैकी काहीच नाही....
कल्पना तरी कशी म्हणू याला ??
यातील प्रत्येक क्षण जगलं असेलचं
कोणीतरी कुठेतरी जगाच्या पाठीवर
प्रत्येक दुःख ओघळलं  असेलच
कधी अश्रू तर कधी पाऊस बनून
येथल्या कोरड्या मातीवर
त्यातूनच फुटले असतील नवे अंकुर
नवे विचार, नवे भावनिक तरंग
जुन्याच चित्रात कदाचित
भरला असेल जगण्याचा नवा रंग..
कविता नाही तर मग काय आहे काय हे ?
मनाच्या पटावर मांडलेला बुद्धिबळाचा डाव..
जिथे हरण्याचीही नसते मुभा
अन् जिंकण्याचाही नसतो ठाव...
शेवटी जर हातात काहीच उरणार नसेल
तर कशासाठी करायचा हा सारा अट्टाहास
का द्यायचं झोकून स्वतःला  बेफिकिरपणे
कां बरं घ्यायचा एवढा कवितेचा ध्यास
कविता ?.......छे !!
ही कविता आहेच कुठे ?
ही तर मोहर आहे उमटलेली
मी जगलेल्या प्रत्येक क्षणावर...
माझ्याच आयुष्याचं जणू प्रतिबिंब
अलगद उतरलेलं मनातून ...पानावर...
मनातून .............पानावर.............
                               - मीनल