एक संध्याकाळ

Started by gaurig, January 20, 2010, 02:11:49 PM

Previous topic - Next topic

gaurig

एक संध्याकाळ       

घराचा दिवाणखाना. घरमालक एका खुर्चीत बसले आहेत. त्यांचा कोट दुसऱ्या खुर्चीच्या पाठीवर आहे. बूट काढून त्यांनी पाय सपातात सरकवले आहेत. थोडक्यात, दिवसभर काम करून साहेब घरी परतले आहेत. त्यांच्या मागचा स्वयंपाकघराचा दरवाजा थोडासा उघडा आहे. बाईसाहेबांचं आत काम चालू असावं, कारण आतून अधूनमधून भांडी वाजत आहेत.)
ती : ''हरमन्, हरमन्..''
तो : ''हां, बोल.''
ती : ''काय करतो आहेस?''
तो : ''काही नाही.''
ती : ''काही नाही? म्हणजे काय?''
तो : ''मी काही करत नाहीये.''
ती : ''अजिबात काही नाही?''
तो : ''नाही.''
ती : ''(थोडय़ा  वेळाने) काही म्हणजे काही करत नाहीयेस तू?''
तो : ''नाही. इथे बसलोय.''
ती : ''तू नुसताच तिथे बसलाहेस?''
तो : ''हो.''
ती : ''तू कसलातरी विचार करतोयस् का?''
तो : ''खास असं काही नाही.''
ती : ''खास काही करत नसलास तर एखाद्वेळी फिरून, पाय मोकळे करून आलास तर काही बिघडणार नाही.''
तो : ''नाही बिघडणार.''
ती : ''मी तुला तुझा ओव्हरकोट आणून देते.''
तो : ''नको. धन्यवाद. मी ठीक आहे.''
ती : ''पण ओव्हरकोट न घालता बाहेर गेलास तर थंडी बाधेल तुला. मग सर्दीनं हैराण झालास, की मलाच सगळं निस्तरावं लागेल.''
तो : ''ठीक. बाहेर जाताना मी ओव्हरकोटाशिवाय नाही जाणार.''
ती : ''मग तुझा तू घेशील का ओव्हरकोट?''
तो : ''मी मुळी बाहेर फिरायला जातच नाहीये.''
ती : ''स्वत: कोट घ्यायला लागला, की बाहेर जातच नाहीये. सगळी कामं मीच करायची.''
तो : ''मला मुळातच बाहेर जायचं नव्हतं.''
ती : ''आत्ताच तर म्हणालास, ओव्हरकोट घालून जाईन म्हणून.''
तो : ''मी नाही. तूच म्हणालीस की मी बाहेर फिरायला जावं.''
ती : ''मी? मी म्हणाले? मला काडीचाही फरक पडत नाही- तू फिरायला जा किंवा जाऊ नको. कर मनमानी तुझी.''
तो : ''छान, छान!''
ती : ''मला फक्त एवढंच सुचवायचं होतं, की कधीतरी जर तू नुसता बसून राहण्याऐवजी बाहेर पडलास नि फिरून आलास तर तुझं काही नुकसान व्हायचं नाही.''
तो : ''खरंय, नाही नुकसान होणार.''
ती : ''म्हणजे तुला मान्य आहे तर?''
तो : ''हो, ते खरंच आहे.''
ती : ''म्हणजे तुला फिरायला जायचंय.''
तो : ''नाही. मला इथे बसायचं आहे.''
ती : ''तुला फिरायला जायचं होतं. फक्त ओव्हरकोट घ्यायचा आळस. तो मी आणून द्यायचा. तो नाही दिला तर म्हणे फिरायला जायचं नाहीय. मग काय करायचंय?''
तो : ''मला इथे बसायचं आहे.''
ती : ''मघापासून नुसता धोशा लावला आहेस- मला इथे बसायचं आहे म्हणून. झालं काय तुला अचानक?''
तो : ''अचानक काही नाही. मला सतत असंच वाटत होतं, की इथे बसून राहावं नि शांतपणे आराम करून थकवा दूर करावा.''
ती : ''तुला जर शांतपणे बसायचं होतं, तर एवढा वेळ बडबड बडबड का करत होतास?''
तो : ''आता मात्र मी काही बोलणार नाही.''
ती : ''(थोडय़ा वेळानं) आता मात्र तुझ्याकडे निश्चित वेळ आहे, असं काहीतरी करायला की ज्यात तुला खूप मजा येईल.''
तो : ''बरोबर!''
ती : ''तू काही वाचतोयस् का?''
तो : ''आत्ता तरी नाही.''
ती : ''मग वाच की काहीतरी.''
तो : ''नंतर. नंतर वाचेन कदाचित..''
ती : ''तुला मी एखादं मासिक आणून देऊ का वाचायला?''
तो : ''आधी मला नुसतं इथे थोडा वेळ बसायचं आहे.''
ती : ''नंतर वाचणार आहेस ना?''
तो : ''कदाचित. माहीत नाही.''
ती : ''मला ठाऊक आहे, तू काही आपलं आपण मासिक घेणार नाहीस. तुला वाचायचं असेल तरी मी मासिक आणून द्यायची वाट बघणार तू. ठीक आहे. तू वाचणार असशील तर देते आणून मासिक. इतर काही हुकूम माझ्यासाठी?''
तो : ''काही नाही.''
ती : ''मी सगळा दिवस इथे राबत असते. तू स्वत: जरा जागेवरून हललास नि तुला वाचण्यासाठी मासिक जर तुझं तू घेतलंस तर चालेल की!''
तो : ''मला मुळी वाचायचंच नाहीये.''
ती : ''अशी डोक्यात राख घालून घ्यायची मग. बायकोनं मासिक नाही दिलं आणून कधीतरी, तर वाचायचंच नाही. का? का असा विचित्र वागतोस तू? का छळतोस असा?''
तो : ''(गप्प).''
ती : ''हरमन्! हरमन्!!''
तो : ''(अजूनही गप्पच).''
ती : ''कान फुटले का?''
तो : ''नाही. ऐकतोय.''
ती : ''तुला जरा मजा येईल असं कध्धी काही करत नाहीस. त्याऐवजी नुसता तिथे बसून राहतोस.''
तो : ''मी इथे बसतो, कारण मला त्यात मजा येते.''
ती : ''मी इथे काम करतेय. तू कर मजा.''
तो : ''करेन, अजून मजा करेन.''
ती : ''एवढं रागावून, अंगावर ओरडायची काही गरज नाहीये. राबतेच मी दिवसभर तुझ्यासाठी.''
तो : ''मी मुळीच तुझ्यावर ओरडलो नाहीय.''
ती : ''मघापासून ओरडतोयस्. का? का?''
तो : ''(आता मात्र ओरडून) मी.. मुळीच.. तुझ्यावर.. ओरडत.. नाहीये!''

मूळ जर्मन लेखक-  लोरिओ
स्वैर रूपांतर- नितीन जोगळेकर 

santoshi.world

:D :D :D :D solid ahe ekadam lekh   ....... ती ne khup hasaval mala  ;D