एच.आय.व्ही. बाधित मुले

Started by विक्रांत, April 09, 2017, 10:47:57 PM

Previous topic - Next topic

विक्रांत



मृत्यूबीज देहात घेवून
का जन्मतात इथे
हे निरागस जीव
हजारो अन लाखो 
कधी राहती बेवारस जगत
तर कधी घर खांद्यावर सावरत
एच आय व्ही ची लागण
जन्मत: देहात होवून ..
जी राहते पोखरत देह
हळू हळू किडीगत 
नुकत्याच फुलून आलेल्या
कुंडीतील गुलाबावर
मृत्यूकळा आणत

त्यांची पापपुण्ये मला कळत नाही
त्या जगण्याचा अर्थ मला लागत नाही
कुठल्यातरी पालकाच्या
क्षणिक मोहाच्या वादळात
अथवा वासनेच्या पराभूत
देहव्यापी रणांगणात
जन्म होणे हाच काय तो
एक गुन्हा भोगीत ..
वा वाटेला आलेला
एखादा अनवांच्छित 
अटळ अपघात
नाईलाजाने सोशीत 

त्या चिमुकल्या चेहऱ्यावरील
ते अपूर्व कोवळे निर्मळ हसू
ती खोडकर मिश्कील चकाकती नजर
ती अबोध शांत लाजाळू वृत्ती
पहिले की वाटते
अरे यांनी जगलेच पाहिजे
अरे यांना जगवलेच पाहिजे

त्यांनी न केलेल्या पापाचे
ते प्रायश्चित भोगल्या वाचून
कारण इथे जन्माला आलेल्या
प्रत्येक जीवाला
जगण्याचा हक्क आहे म्हणून
आणि त्याहूनही 
माणसातील माणूसपण जगावे म्हणून

डॉ विक्रांत प्रभाकर तिकोणे
http:\\kavitesathikavita.blogspot.in