त्या एकाच क्षणासाठी

Started by विक्रांत, April 20, 2017, 08:23:40 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

त्या एकाच क्षणासाठी
**************** 

त्या एकाच क्षणासाठी
सार्थकतेच्या स्पर्शासाठी
लावूनी चूड सुखांना
वेदनाच बांधल्या गाठी

गात्रात विझल्या चिता
स्मशान सुनेच सारे
तरीही सताड उघडे
हे भिंगुळ पिंगुळ डोळे

हे शब्द पाझर कातळ
ठिबकती दुःख नितळ
ओल पांघरून भिंती
उगवती दारुण शेवाळ

करुणेची बांधुनी झोळी
कुणी गेला वाटेवरूनी
वा भासच हा मनकवडा
मिरवतो नशा बांधुनी

वक्षात कुणाच्या व्यथा
रुतलेले पायच खोल
पाचूचे माणिक दु:ख
का नखी खरडते ओल

मिटणार कधी हा क्षोभ
विरहात विकल का व्योम
अगणित कृष्ण विवरे
गिळतात निनादी ओम

डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in