ती गजरा

Started by विक्रांत, May 15, 2017, 10:57:52 PM

Previous topic - Next topic

विक्रांत


काळी बुटकी
बसक्या नाकाची
बारीक डोळ्याची
बरचशी
कुरूप दिसणारी
गजरा होती
माझ्या वर्गात
गुपचूप यायची
क्वचित हसायची
परीक्षेत हमखास
नापास व्हायची
तशी ती नव्हती
खिजगनितीत माझ्या
लक्ष देण्यासारखे
काहीच नव्हते तिच्यात

पण एक दिवस
पंचमीच्या बारीत
पाहिलं मी तिला
रंगवून चेहरा
घालून दागिने
गर्दी समोर
स्वैर नाचतांना
कुठलतरी
पांचट गाणं
देही मिरवतांना
तिचं तोंड भरून हसणं
लोकांचं शिट्या वाजवणं
अन ते पैसे उधळण ..

तसा त्या गावाचा
रिवाजच होता
दरसाल पंचमीला
नायकिणीचा नाच
फुकट दाखवायचा
आणि कुतूहलाने गेलेलो मी
झालो प्रचंड शरमिंदा
गजराला पैसे गोळा करतांना
तसे पाहतांना

तिने पहिले नसावे
मला कदाचित
मी मागच्या मागे
पाय काढला
मान खाली घालून
त्या गर्दीत

नंतर दोन तीन दिवस
माझा धीर झाला नाही
गजराकडे पाहण्याची
पण ती तशीच होती
शांत संथ काहीशी मख्ख
यायची शाळेच्या युनिफोर्म मध्ये
तोच पायघोळ निळा परकर 
आणि पांढरा सदरा घालून
बसायची वर्गात
पेंगुळल्या डोळयांनी
ऐकायची शिकवणं
कळल्या न कळल्या चेहऱ्यानी

ती दिसली की
मन भरून जायचं
एका अनाम दु:खानं
एका वेगळ्या कौतुकानं
आणि व्यथित करुणेनं

पण ती येताच समोर
मी पळ काढायचो
मागच्या मागं
काहीतरी बहाणा करून
कदाचित
त्या गर्दीतील माझी ओळख
तिला पटू नये म्हणून


विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in