भटकंती

Started by abhishek panchal, May 19, 2017, 08:05:14 PM

Previous topic - Next topic

abhishek panchal

         नवीन वर्षाची सुरुवात चांगली करण्याकडे प्रत्येकाचाच कल असतो आणि अशी चांगली सुरुवात एखाद्या गड भेटीने होणार असेल तर बातच काही और . वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ जानेवारी ला मल्हार गडावर जाण्याचा आमचा बेत आधीच ठरला होता . मराठ्यांच्या कारकिर्दीत सर्वात शेवटचा बांधलेला किल्ला म्हणून मल्हार गड दुर्गप्रेमींमध्ये प्रसिद्ध आहे .
        किल्ल्यावरील माहितीनुसार या किल्ल्याचे बांधकाम १७६३ ते १७६५ यादरम्यान झाले आहे . पेशव्यांचे तोफखान्याचे प्रमुख भीमराव पानसे व कृष्णराव पानसे यांनी हा किल्ला बांधला . पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवे घाटावर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला त्यांनी बांधला . या किल्ल्याच्या पायथ्याला सोनोरी गाव वसले आहे , म्हणूनच हा गड सोनोरी गड म्हणूनही ओळखला जातो . विशेष म्हणजे तिथल्या स्थानिक लोकांना हा गड सोनोरी गड म्हणूनच परिचित आहे . म्हणून गडाच्या शोधात निघालात तर सोनोरी गड हे नाव लक्षात ठेवा , नाहीतर आमच्यासारखे रस्ता भटकताल . इतका कि थेट मल्हार देवांच्या जेजुरीला जाऊन भिडताल . चुकत मुकत आम्ही थोडे उशिरा का होईना पण मल्हार गडावर , म्हणजे सोनोरी च्या किल्ल्याजवळ पोहोचलो . खूप जवळचा प्रवास जरा जास्तच लांबल्याने सगळे थोडे थकले होते , म्हणून जरा जास्त आराम करायचे ठरले . या क्षणभर विश्रांतीनंतर गड चढण्यास सुरुवात केली . वर वर अगदी सहज भासणारी चढाई तिचे खरे रंग दाखवू लागली . महाराजांचा या महाराष्ट्राच्या डोंगर रांगांवर इतका का विश्वास होता , याचं जणू उत्तरच गवसलं . २० ते २५ मिनिटात आम्ही चोर दरवाज्याजवळ पोहोचलो . अगदी लहान , पण सुस्थित असलेला हा चोर दरवाजा सर्वात पहिल्यांदा दर्शन देतो . किल्ल्याचा हा भाग पाहून किल्ला त्यातल्यात्यात नवीन आहे , याची खात्री पटते . मग पुढे सर्वात सुंदर भाग डोळ्यासमोर येतो . किल्ल्याचा बालेकिल्ला . जो बऱ्यापैकी विस्तारित आहे . शासनाने मनावर घेतलं तर या किल्ल्याच्या इतिहासच स्मारक , म्हणजे खरा इतिहास इथे पुन्हा उभा करता येईल . पण या खऱ्या वैभवाकडे लक्ष देतील ते आपले सरकार कसले . या किल्ल्यावरच्या बऱ्याच तटबंद्या , बालेकिल्ल्याचे तट , बुरुज यांची ढासळलेली स्थिती बघता , आपले शासन या किल्ल्यांच्या बाबतीत किती निष्क्रिय आहे याची जाणीव होते . पण इथल्या एका स्थानिक संस्थेने ( Vinsys Fort Restoration Group - Malhar Gad ) हा इतिहास बऱ्याच अंशी राखून ठेवला आहे . प्रत्येक महत्वाच्या ठिकाणी त्या स्थानाच्या नावाचे फलक , किल्ल्याची माहिती , सूचना अगदी व्यवस्थित लावल्या आहेत . हा व्यवस्थितपणा काही समाजकंटकांना बघवत नाही . किल्ल्यांच्या या अशा सुंदर माहिती फलकांवर यांना घाण करायची बुद्धी येतेच कुठून काय माहीत ? स्वतः काही करायची हिम्मत नाही , दुसरा करतो तर त्याची निगा राखण्याऐवजी त्याची वाट लावण्याकडे त्यांचा कल असतो . किल्ल्यांवर हे असे नमुन्यांचे प्रताप आता नेहमीचेच झाले आहेत , पण कुठेतरी हे थांबायला हवे . या अशा समाजकंटकांची प्रसिद्धी करण्यात मला काहीच रस नाही . पण आपण काय करतो याची त्यांना लाज वाटायला हवी . असो , यासर्वात एक गोष्ट चांगली घडली . जेव्हा आम्ही डब्बा खाण्यासाठी एकाजगी बसलो , तेव्हा एक आजोबा जवळ आले . त्याआधी डब्याची गंमत सांगतो . आम्ही एकूण दहाजण होतो आणि त्यापैकी फक्त एकानेच डब्बा आणला होता . त्यात चपात्या होत्या आठ आणि मस्त बटाट्याची भाजी . मस्त अशासाठी कि भूक इतकी लागली होती , कि खाण्याजोगं काही दिलं तरी ते मस्त लागलं असतं . आमची ती जेवणाची वेळ आणि ते आजोबा आमच्या जवळ आले . कोण होते , कुठचे होते काहीच माहीत नाही . पण आम्ही त्यांना " जेवता का ? " म्हणून विचारलं . वयोमानाने ते त्यांना ऐकूच नाही आलं . मग खाणाखुणा करीत त्यांना जेवायचं विचारलं . ते लगेच तयार झाले . त्यांना पूर्ण एक चपाती आम्ही देऊ केली आणि आम्ही सर्वांनी कुणी चतकोर , कुणी अर्धी असं करत डब्बा संपवला . पण खरंच , त्या आजोबांची भूक शमताना पाहून आपोआपच आमची भूक शमली . एक सुंदर अनुभव या आमच्या ट्रिपला चार चांद लावून गेला . पण वाईट अनुभवाचं गालबोट शेवटी लागलंच . काही भुरटयांनी आमच्यातल्या एका गाडीतले पेट्रोल काढायचा व्यर्थ प्रयत्न केला . असो , काही सुंदर आठवणीत हि ट्रिप आता नेहमीच घर करून राहील . नव्या वर्षाची सुरुवात याहून सुंदर होऊच शकली नसती .

- अभिषेक पांचाळ , पुणे
( ९०२८८७५९५८ )