घर माक्याचे..

Started by विक्रांत, July 02, 2017, 12:15:47 AM

Previous topic - Next topic

विक्रांत

घर माक्याचे..

येई प्रकाश दारात
उब घेवून कोवळ
उन सोनेरी केशरी
दिसे वेल्हाळ बाभूळ

थवे इवल्या पक्ष्यांचे
कलकलती फांद्यात
धूळ होवूनिया जागी
खेळू लागते खुरात

गार अजून पाषाण
ओट्या निजे बिलगून
खुळखुळते घुंगूर
संथ लयी जडावून

निळे आकाश मोकळे
मनी येई उमलून
वारा नितळ तरल
दूर ओल्या शेतातून

चूल पेटता कोन्यात
काड्या वाजती तडाड
नाद काकणाचा मंद
घुमू लागतो कानात

घर माक्याचे मातीचे
अर्धे उघड्या छताचे
चित्र उमटे मनात
जणू सारेच कालचे


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http://kavitesathikavita.blogspot.in