मी एक किंचित बिरबल!

Started by gaurig, February 03, 2010, 04:30:12 PM

Previous topic - Next topic

gaurig

मी एक किंचित बिरबल!
8 Jan 2008, 0138 hrs IST
                                                                                   प्रमोद देव

मंडळी ही गोष्ट २५-३० वर्षांपूर्वीची म्हणजे माझ्या ऐन पंचविशीतील आहे. काही कामानिमित्त मी एकदा धारावीत गेलो होत
ो. परतताना संध्याकाळ झाली. भुकेची जाणीव झाल्यामुळे मी एका क्षुधाशांतिगृहात गेलो आणि वेटरकडे मागणी नोंदवली.पदार्थ येईपर्यंत मी दिवसभराच्या कामाबद्दल विचार करत होतो आणि नकळतच चाळा म्हणून मिशांवरून हात फिरवत होतो. आजूबाजूच्या कोणत्याही गोष्टींकडे माझे लक्ष नव्हते. मी माझ्यातच हरवलो होतो.
इतक्यात वेटरने खाद्यपदार्थ आणून ठेवले आणि मी माझ्या त्या तंद्रीतच खात खात मधनं मधनं मिशांवरनं हात फिरवत होतो.
थोड्या वेळाने वेटर पुन्हा आला आणि मला म्हणाला , " साब , वो साब आपको बुलाता है!"
मी मान वर करून त्या दिशेला पाहिले पण तसे कोणी ओळखीचे दिसले नाही म्हणून पुन्हा समाधिस्थ झालो.दोन मिनिटांनी वेटर पुन्हा आला आणि तोच निरोप दिला.पुन्हा मी मान वर करून बघितले पण ओळख पटली नाही म्हणून पुन्हा मी माझ्या समाधीत प्रविष्ट झालो.
आणि अचानक टेबल हादरलं , काचेचा पेला आडवा होऊन पाणी सांडले समाधी भंग पावली आणि मी वास्तव जगात आलो.
एक ६-७ फुटी आडदांड वास्तव माझ्यावर आपले खुनशी डोळे रोखून उभे होते.पहिली प्रतिक्रिया म्हणजे मी मनातल्या मनात घाबरलो.मंडळी विचार करा सव्वा पाच फूट उंच , ४५किलो वजन आणि वीतभर छाती असलेल्या म्या पामरावर हा काय प्रसंग आला होता.खाऊ की गिळू अशा आविर्भावात तो टग्या माझ्यासमोर उभा होता.प्रसंग बांका होता पण घाबरून चालणार नव्हते.मी माझ्या मनाला बजावले "माझ्या मना बन दगड"(ह्याचा आधार घेऊनच मग विंदा करंदीकरांनी बहुतेक ती त्यांची गाजलेली कविता बनवली असावी)आणि माझ्या तोंडातून पहिला प्रश्न बाहेर आला! "बोला साहेब , काही काम ?"
माझा आवाज नैसर्गिकरीत्या मोठा आणि खणखणीत आहे.त्या तशा अवस्थेतही आवाजाने मला दगा दिला नव्हता.माझ्यासारख्या फाटक्या व्यक्तीचा तो खणखणीत आवाज ऐकून तो टग्या जरासा बावरला पण पुन्हा भान सांभाळून त्याने मला प्रश्न केला , " जानता नही क्या मै कौन हूं ?"
मी म्हणालो , " नाही! आपण ह्या हॉटेलचे मालक आहात काय ?"
माझा प्रतिप्रश्न ऐकून तो खवळला आणि म्हणाला , " क्या खुदको दादा समझता है क्या ? कबसे देख रहा हूं मुछोपे ताव मार रहेला है.मालुम नही आपुन ए एरियाका दादा है ? आपुनके सामने ज्यादा शानपत्ती नही चाहिए. क्या ?"
आता कुठे माझी ट्यूब पेटली. "अरेच्च्या , म्हणजे मी तंद्रीत मिशांशी चाळा करत होतो त्याचा हा अर्थ ?
माझ्यातला किंचित बिरबल जागा झाला आणि मी पटकन बोललो , " क्या साब आप जैसे हाथीके सामने मेरे जैसा चुहा क्या कर सकेगा ? क्यों मजाक कर रहेले हो गरीब आदमीका ?"
त्या़क्षणी त्या टग्याने खूश होऊन पाठीत असा काही रट्टा मारलाय राव की मी सपशेल आडवाऽऽऽ.
खाली वाकून त्याने मला उठवले आणि जवळ घेतले(अफज़ल खान-शिवाजीमहाराज भेट प्रसंग आठवला) आणि म्हणाला , " मान गये रे तेरेकु! अरे मेरेको देखके बडा बडा पुलिस आफिसर भी डरता है और तू ईतना चोट्टा क्या दिमाग है रे तेरा! तू चुहा और मै हाथी! आपुनको पसंत है तेरी बात. डरना नही , तू आपुनका दोस्त है."
आतापर्यंत श्वास रोखून पुढे होणार्‍या संभाव्य राड्याची वाट पाहणारे बघे ह्या अनपेक्षित कलाटणीने खूश झाले आणि त्यांनी त्या दादाचा जयजयकार केला. दादाने मग मोर्चा हॉटेलमालकाकडे वळवला आणि त्याला दम भरला.
दादा त्याला म्हणाला , " ये चोट्टा आपुनका मेहेमान है. इससे पैसा लिया तो देख!"
माझ्या खाण्याची केंव्हाच वाट लागली होती पण दादामुळे माझ्यासाठी पुन्हा एकदा नवीन पदार्थ आले .मी पटापट खाल्ले आणि दादाला रामराम करून निघालो . दादाने माझ्याबरोबर माहीम स्टेशनपर्यंत पोचवायला एक बॉडीगार्ड दिला.आणि अशा तर्‍हेने मी त्या प्रसंगातून अनपेक्षितरीत्या पार पडलो. आजही तो प्रसंग आठवला की वाटते जर
का ती उपमा त्या दादाला आवडली नसती तर ???  
                                                                                                    प्रमोद देव




Vkulkarni

अरे वा आमचे देवबाप्पा इथे पण आहेत का? अप्रत्यक्षरित्या का होइना  :)

prasad21dhepe

aawdli nasti tar kay tumhi tumcha bhugol bighdawoon aala astat