*बालगणेश *

Started by विक्रांत, October 08, 2017, 08:41:27 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

*बालगणेश *

मंदाराच्या बुंध्यावर
कोण बाई बसला ग
गणपती पार्वतीचा
सांगा कुणा दिसला ग

गोल मोठे पोट तरी
पोर किती चपळ ग
मोदकाची पुरचुंडी
घेऊनिया चढला ग

सोबतीला इटुकला
मूषकराज आला ग
गुळखोबरे खावूनी
सेवेलागी सजला ग

पाय हालवी जोराने
वृक्ष दुमदुमला ग
वारा घालीत कानाने
करितो दाणादाण ग

गज ध्वनी करुनिया
मित्रा करी व्याकूळ ग
उतरुनी तया मग
भरवी गोड खाऊ ग

हसूनिया पार्वती त्या 
घेई प्रेमे जवळ ग
कौतुकाने देखे देव
आनंदाचा सुकाळ ग


डॉ.विक्रांत प्रभाकर तिकोणे
http;//kavitesathikavita.blogspot.in