पाल

Started by santosh mansute, October 13, 2017, 10:22:21 PM

Previous topic - Next topic

santosh mansute

पाल
====
    ✍ लेखन :- श्री.संतोष बा.मनसुटे

माय व हे पोरं शाळेमंदी कावुन वं जातात..वडाराच्या पालामधली एक पोर तिच्या आई ला म्हणाली..

ते पोरं शाळेमंदी पुस्तक शिकत्यात.
आईने उत्तर दिल.

माय व मले बी घाल न व शाळेमंदी,मले बी त्या पोरीसारखं वेणीले रिबन लावुन अन पाठीवर दप्तर घेवुन शाळेत जायचय..तू सांग न बा ले माय नाव शाळेमंदी टाकायले...

गप बस तुया बा आला का चपलीन मारनं तुले.

आई ने सुलभा ला गप्प केल पण भुतकाळ तीची पाठ सोडत नव्हता. स्वताशीच विचार करु लागली,पाट्यावर चटनी लाटता लाटता हरवुन गेली भुतकाळात..तिलाही लहानपणी शाळेच भारी आकर्षण होत.गावोगावी बापा बरोबर, पाल फिरवत जीवन जगत अनेक पाटे- वरंवटे विकले.ज्या वयात लेखनी घेवुन पाटीवर अक्षरं गिरवायची त्या वयात गावोगावी डोक्यावर पाटे- वरवंटे,जाते विकण्यात कधी हातावरच्या भाग्याच्या रेषा पुसल्या गेल्या हे तिलाही आठवत नव्हते.

     गावकुसा बाहेर सांजच्याला झोपायला पालं ठोकायचं,अन अर्धपोटी दारु प्यालेल्या बापाची बडबड अंगाई प्रमाण ऐकत झोपण्याची आता सवय झाली होती..

तिला आठवत होत तिला लहानपणी शाळेतून ओढत नेवुन पाटे विकायला लावणारा बाप.दोष त्या बापाचा होता की नियतीचा हे तिलाही उमजत नव्हतं.पण अभ्यासात हुशार पोरं कामधंद्याला लागली होती..

दिवसभर जंगलातून टनक दगड हुडकायची,हेरलेले दगड गोळा करायचे,गाढवावर बांधुन पाला जवळ आणायचे .बापा च पाहुन पाहुन छन्नी हातोड्याने धार लावत पाटा-वरवंटा बनवायचा . तयार झालेले पाटे ,जाते गावात नेवुन विकायचे अन पोट भर‍ायचं हा दिनक्रम रोजचाच झाला होता..

गावात शाळेतल्या पोरींना लगोरी खेळतांना पाहिल की काळजात पाणी सुटायच तिच्या,वाटायच जाव अन स्वछंदी पणे खेळावा खेळ  लगोरीचा पण दगडाच्या नशिबी फुलाच जगण कुठे.
हिरमुसल्या चेहर्याने अन जड शब्दात घसा चिरुन आवाज फुटायचा.....जाते घ्या ,पाटे घ्या~~~

    अनेक वेळा गावातून शिळ्या भाकरी दारोदारी हिंडुन मागल्या होत्या,पाण्यात बुडवुन खाल्याही होत्या.वाटायच तिलाही खावा एखादा आवडीच्या नवलाईचा घास पण नशिबान दगडाच जगन मांडुन ठेवल होत जीवनात..तिचा ही नाईलाज होता.तिलाही वाटायच बसाव बापाच्या सायकली वर अन मारावा फेरफटका गावाचा पण बापाच्या डोक्यावरचे पाटे विकण्यातच जिंदगी बरबाद होत गेली.

गावकुसातली धिटकारलेली कुत्रे झोपल्यावर पालात येवुन संगतीला  झोपायची..हाळ हाळ म्हणुन हानली तरी फिरुन यायचीच.तिला वाटायच या कुत्र्या च अन आपल जीवन सारखच आहे..धिटकारलेलं...

मोठ मोठ्या घरांत गुडनाईट लावुन झोपणार्या माणसांच जगन कुठ नशिबात होतं...

कुणाला हिवाळा आवडतो तर कुणाला पावसाळा पण तिला तर केवळ उन्हाळा च आवडायचा कारण पावसाळ्यात गळत्या पालाला   थिगळं लावण अन हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीला अडवन तिच्या आवाक्यात  नव्हतं...नशिब हिनवत होत रोजलाच..कैकदा विंचू -साप पाहूणे यावे तसे पालात फेरफटका मारुन निघुन जायचे..पण मेलेल्या कोंबडीला होरपळण्याची भिती नसते तसच तिच्या बाबतीत होतं.म्हणुन निश्चिंत झोपायची...

लहान वयातच बापान लग्न लावुन दिलं.वरिस भर‍ात पाळणाही हालला.जनावरं होतात तशी उघड्यावरच बाळंतीन झाली.नाड दगडानंच ठेचून तोडली.बाळंतीनीच्या डिंकांच्या लाडवांना तिच्या घरचा पत्ता माहित नव्हताच  मुळात..बाशा भाकरीचे तुकडे पाण्यात डुबुन खावुन दुध ही येत नव्हतं.अन उपाशी पोटी बाळाच्या हुंदक्यांना दुधाची धार नशिबी लागत नव्हती..बाराव्या दिवशी नाव ठेवल पोरीचं तशीच डोक्यावर जाते घेवुन गावात विकायला निघाली.सव्वा महिना चप्पल घालुन अन डोक्याला रुमाल बांधुन बाळंतपणाचे लाड पुरवणं नशिबात कुठ होतं.अनवानीच गावात पाटे वरवंटे विकायला निघाली..

दिवसामागुन दिवस जात होते अन काळे केस पांढरा मुलामा लावत होते..पोरं मोठी होत होती अन ती नाउमेद..

पोरीनं हाताला झटका दिला तशी ती भानावर आली..अजुनही तिच्या कानावर पोरी चे शब्द घुमत होते, हे पोरं शाळेमंदी कावुन वं जातात...तिलाही वाटत होतं पोरीला शाळेत टाकावं  अन शिकवाव पुस्तकातले दोन धडे ...जींदगी तर खुप शिकवत होतीच...हुंदके देत करकचुन मिठ्ठी मारत तिनं पोरीला कुशित घेतलं..ज्या प्रमाण तीच बचपण बर्बाद झाल तस पोरीच होवु नये अस तिला वाटत होतं.पण सतत भटकंतीवर असणार जीवन कात टाकायला तयार नव्हतं...

रोजी रोटीचा सवाल जगु देत नव्हता अन पोरांच भविष्य मरु देत नव्हतं.कंटाळून वाटायच तिला की झोपाव सरनावर निवांतपणी पण मयतीला खांदा देणारे खांदे अजून लहान होते.....बर्बाद झाल होत बचपण तिच अन होत होत तिचही.....अर्धी भाकर मरु देत नव्हती अन अर्धी भाकर जगु देत नव्हती....

नारायण सुर्वे म्हणतात ना ......अगदी तसचं जगन होतं.....

दोन दिवस वाट पाहण्यात गेले
दोन दुखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिले
डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला
तारे फुलले रात्र धुंद झाली
भाकरीचाच चंद्र शोधण्यात
जींदगी बर्बाद झाली..

✍लेखन :- श्री.संतोष बा.मनसुटे

रोहणा ता.खामगांव जि.बुलडाणा

9099464668
Santosh Mansute