मित्रो...!

Started by Rajesh khakre, November 08, 2017, 07:29:04 PM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

मित्रो
●●●
एक वर्षांपूर्वी 8 नोव्हेंबरला रात्री 8 वाजता टिव्हीवरून आमच्या मोदीसाहेबांची मित्रो अशी हाक आली आणि तेव्हापासून समस्त देश वासीयांनी मित्रो या शब्दांची जेव्हढी धास्ती धरली आहे ती पण ऐतिहासिकच आहे. नाहीतरी लोकसभा इलेक्षनात मोदी साहेबांनी ही हाक कितीतरी वेळा दिली होती, पण आठ तारखेची हाक मात्र बारा वाजवून गेली.
एका क्षणात पैशाचा कागद व्हावा तसा काहीसा भास झाला. आणि मग कुठे कुठे किती किती पैसा ठेवला ते धनाढय लोक शोधू लागले, नियोजन करायला लागले, या निर्णयाने पाहिल्यांदाच पैसे नसण्यातला आनंद काही लोकांनी घेतला. वाईट आणि खोट्या मार्गाने ज्यांनी पैसा कमवला त्यांची मोठी पंचाईत झाली.गरीब जनतेला या निर्णयातून मोठे मोठे घबाड बाहेर येतील असेही वाटत राहिले, आपल्या पती, मुलांपासून काही पैसे गुपचूप, काटकसर करून ठेवलेल्या आणि स्वतः चे बँकखाते नसलेल्या महिला भगिणीची मोठी पंचाईत झाली. सर्वसामान्यांची बँकेसमोर रांगा लावून मोठी परवड झाली. प्रवासात आणि बाहेरगावी गेलेल्या लोकांची तर तारांबळच उडाली.घरी लग्नकार्य असणारे मोठ्या चिंतेत पडले,बऱ्याच गोष्टी घडून गेल्या. काही चांगल्या तर वाईट. नोटबंदी झाल्यावर काही महिने सर्वसामान्य लोकांना त्रासही झाला, मात्र जर काही चांगले घडत असेल तर होउद्या थोडा त्रास म्हणत काहींनी सहन केला तर काहींनी नेहमीप्रमाणे शिव्याशापही दिले.
पैसा हातात नव्हता मात्र सर्वत्र पैशाच्याच गप्पा चालत होत्या. बसस्टॅन्डवर कटिंग चहा पिता- पिता कुठे किती पैशाचे पोते सापडले याची चर्चा चालत होती. काही ठिकाणी गंगेत, रस्त्यावर फेकलेल्या आणि बातम्यात दाखवलेल्या घटनांवर ऑफिसातून, नाक्यावर, पारावर, चर्चासत्रे रंगत होती. ज्याला उधारी द्यायची आहे तो मुद्दाम फोन करून घेऊन जाण्यास सांगत होता, तर असुदे सध्या काही घाई नाही म्हणून समोरचा पैसे घेण्याचे टाळत होता. कुणाला आपल्याकडे फारसे पैसे नाही याचा आनंद होत होता तर ज्यांनी भ्रष्टाचार आणि अनितीने माया जमवली त्याची व्यवस्था लावण्याच्या भीतीने काया थरथरत होती. पेट्रोलपंपावर काही काळ नोटा चालत असल्याने पेट्रोल टाकताना काहींना उगीच आनंद मिळत होता. 10, 20,50,100 रुपयांच्या नोटा असणारा व्यक्ती तर एकदम श्रीमंत वाटायला लागला.
जुन्या नोटा जाऊन नवीन करकरीत नोटा आल्या, काहींनी पाहिल्यादाच हातात आलेल्या नोटा जपून ठेवल्या. नवीन आलेल्या नोटांची सवय नसल्याने त्या कागदाप्रमाणे वाटायला लागल्या. काही महिने विस्कळीत झालेले जनजीवन पुन्हा सुरु झाले. या काळात ऑनलाइन व्यवहाराकडे बऱ्यापैकी ओढा वाढला.
नोटबंदींतर काळापैसा बाहेर आला का? भ्रष्टाचार कमी झाला का? अर्थव्यवस्था सुधारली का?? यात सामान्य जनतेचे हित झाले का? काळा पैसा पुन्हा सफेद करण्यात भ्रष्टाचारी लोक यशस्वी झाले का? नोटाबंदीने देशाचा जनतेचा फायदा झाला का?
नोटबंदीची गरज होती की नव्हती? नोटबंदी यशस्वी झाली का??? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मात्र अजूनही स्पष्टपणे लोकांना समजली नाही.
सत्ताधारी पक्ष सुरवातीपासून नोटबंदीचे समर्थन करत ती कशी यशस्वी झाली हे पटवून देण्याचा प्रयत्न करत राहिला. तर दुसऱ्या बाजूला विरोधक सुरुवातीपासून नोटाबंदीला विरोध करून ती कशी निष्फळ आणि जनतेला परेशान करणारी होती याचे चित्र रंगवत राहिला.
सामान्य माणसाला मात्र थोडा त्रास आणि त्याच्या खिशात असणाऱ्या तुटपुंज्या पैशाचा रंग बद्दलण्यापलीकडे नोटबंदीतून काही मिळाले असे जाणवले नाही.
नोटबंदीतून देशाचा, जनतेचा फायदा झाला की तोटा हे  येणारा पुढील काळ सांगून देईल, असे असले तरी नोटबंदी अगदीच निरर्थक होती असे म्हणणेही योग्य होणार नाही. नोटाबंदीने खोट्या मार्गाने मिळवलेली संपत्ती तुम्हाला अडचणीत आणू शकते, हे प्रकर्षाने जाणवून दिले, online व्यवहारात आपोआप वाढ झाली ती नोटबंदीमुळेच..आणि पैशाच्या पाठीमागे धाप लागेपर्यंत धावणाऱ्या आणि पैसाच सर्वस्व आहे असे मानणाऱ्या लोकांना पैसा म्हणजे सर्वस्व नाही हे  या निमित्ताने अनुभवता आले ही गोष्टही नाकारून चालणार नाही.
-राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
rajeshkhakre.bolgspot.in