अशी सुचते कविता (कवितेच्या जन्माची कहाणी)

Started by Rajesh khakre, November 15, 2017, 07:40:39 PM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

अशी सुचते कविता अर्थात कवितेच्या जन्माची कहाणी

कवी हा एक आगळावेगळा निर्मितीकार असतो. स्वतः च्या प्रतिभेतून नवनवीन कवितांना जन्मास घालत असतो. कविता कधी, कुठे, कशी सुचेल याचा काहीच नेम नसतो. कधी रस्त्याने, कधी गर्दीत, कधी चालताने, कधी गाडीवर, कधी कधीपण...अमुक वेळी मला कविता सुचेल हे कवी स्वतः पण ठामपणे सांगू शकत नाही. शरीराच्या एखाद्या भागात अणकुचीदार सुई टोचावी आणि त्यातून रक्ताची चिळकांडी बाहेर यावी तशी कवींच्या संवेदनशील मनावर एखाद्या बाह्य किंवा अंतस्थ: परिस्थितीचा आघात होतो आणि कविता बाहेर निघते. तिचा आवेग हा त्या भावनेच्या आघाताच्या तिव्रतेवर  ठरत असतो. भावना वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, कधी राग, द्वेष, उद्रेक, तर कधी सुखद, हास्य अशीही असू शकते. कविता या भावनेचा हात धरून कागदावर उतरते.आणि तसेच स्वरूप धारण करते. एखादी कविता वाचताना कधी तोंडातून आपसूकच वाह शब्द निघतात याचे कारण त्या कवीने त्या त्या भावनेला यतार्थपणे आपल्या कवितेत मांडलेले असते. कविता ही कवींच्या भावना आविष्कराचे मूर्तीमंत स्वरूप असते. ती कविता जन्म घेताना कवी ज्या मानसिक भावना आवेगातून जात असतो, त्याच भावनेतून जर वाचकाने कविता वाचली तर कविता खऱ्या अर्थाने वाचकपर्यत पोचली असे म्हणता येईल, मात्र ते प्रत्येकवेळी साध्य होईलच असे नाही. कारण कवी आणि वाचक यांचे स्वतंत्र भावनाविश्व असते.कवितेत कवीने मांडलेला एखादा प्रसंग किंवा शब्द,ओळ वाचकाला रुचत नाही किंवा त्याला खटकते मात्र कवीने मांडलेला प्रसंग, शब्द किंवा ओळ ही कवीने ज्या पूर्वपार्श्वभूमीतून मांडलेली असते. ती पार्श्वभूमी मात्र वाचकाला माहीत नसते.
कविता जन्म घेण्यापूर्वी ती अनेक मानसिक प्रक्रियेतून जात असते. तिच्या निर्मितीमध्ये जशी एखादी तात्कालिक परिस्थिती कारणीभूत ठरते तसेच त्या निर्मितीमागे कवीचा काही विचार असतो, काही दृष्टिकोन असतो. त्याच्या काही जीवनाविषयीच्या जाणिवा असतात. जेव्हा कुठे काही कमी जास्त होताना दिसले की कवीची लेखणी डोकं वर काढते, ती प्रहार करायला लागते, कुठे व्यंगावर बोट ठेवते, कुठे उपरोधिक टीका करते, कुठे शाबासकी देते, कुठे हास्य फुलविते, कुठे प्रोत्साहन देते, तर कुठे जगण्याला दिशा देते, जीवनाला आकार देते. आणि या सर्व गोष्टी कवी करत असतो. त्याच्या लेखणीतून. त्याची लेखणी म्हणजे एक एक क्रांतिकारक शस्र असते.त्याच्या ह्याच लेखणीतून अवतरलेल्या कवितेच्या पाठीमागची पार्श्वभूमी काय होती, कवीला ही कविता नेमकी का लिहावी लागली, असे काय घडले, अनुभवले किंवा बघितले ज्यातून ह्या कवितेचा जन्म झाला, ही एक न सांगितलेली कहाणी असते, आणि कवितेचे तेच मूळ असते.जसे एखादे गाणे कसे तयार झाले, त्याच्या पाठीमागची रोचक कहाणी ऐकली की ते गाणे आवडायला लागते, तसेच कवींच्या भावनेशी एकरूप होऊन कविता वाचण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला की कविता आवडायला लागते.
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
Rajesh.khakre@gmail.com

माझे अधिक लेख व कविता वाचण्यासाठी भेट द्या:

www.rajeshkhakre.blogspot.in वर