देणा-या हातांचे पुल!

Started by gaurig, February 09, 2010, 09:49:47 AM

Previous topic - Next topic

gaurig

देणा-या हातांचे पुल!

आज १२ जून! ' महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व ' अशा यथार्थ शब्दात गौरविलेल्या पु. ल. देशपांडे यांची आज पुण्यतिथी. आता पुल आपल्यात नाहीत , ही जाणीव मन विषण्ण करणारी असली तरी पुलंचे स्मरण झाल्याबरोबर प्रत्येक मराठी माणसाच्या मनात त्यांची एखादी तरी विशिष्ट आठवण चटकन जागी होते. कधी पुलंनी केलेली एखादी कोटी आठवते , कधी त्यांच्या नाटकातील वा चित्रपटातील एखादा खुसखुशीत संवाद आठवतो , तर कधी त्यांच्या एखाद्या लेखातील गमतीदार वाक्य आठवते. पुलंनी निर्माण केलेल्या व्यक्तिरेखा मराठी साहित्यात अजरामर आहेत.

त्यांचा ' काकाजी ', त्यांचे ' चितळे मास्तर ', त्यांचा ' नारायण ' हे सगळे थोड्याफार प्रमाणात आपल्याला आजूबाजूच्या जगात वावरताना दिसतात. पुलंनी निर्माण केलेले वाक्प्रचार मराठी भाषेत रुढ झालेले आहेत. '' तुला शिकवीन चांगलाच धडा '' हे ' ती फुलराणी ' मधील स्वगतातील उद्गार कधी गमतीत तर कधी रागात अनेकदा उच्चारले जातात. आतातर ते चित्रपटाच्या नावानेही विभुषित झाले आहे. मराठी भाषेची विविध रूपे आणि ती भाषा बोलताना प्रांतपरत्वे होणारे बदल पुल जेवढ्या बारकाव्याने दाखवत तेवढे बदल कोणी क्वचितच दाखविले असतील. पुल हे साहित्यसृष्टीचे अनभिषिक्त सम्राट होते , याबद्दल वादच नाही. इतके अष्टपैलू व्यक्तिमत्त्व महाराष्ट्रात आजवर झाले नाही. पुल लेखक होते , कवी होते , संगीत दिग्दर्शक होते , नट होते , वक्ते होते.

ही सगळी यादी सांगण्यापेक्षा काय नव्हते ? असे विचारणे अधिक सोपे आहे. पण यापलीकडेही पुलंच व्यक्तिमत्त्व विशिष्ट ठळकपणे नजरेत भरण्यासारखा त्यांच्याकडे एक गुण होता. तो म्हणजे समाजसेवेची त्यांना असलेली जाणीव आणि दीनदुबळ्यांसाठी , गरजवंतांसाठी प्रसंगी स्वत: तोशीस सोसूनही त्यांनी उभारलेले समाजकार्य आणि त्या विषयातील त्यांची तळमळ. पुलंचा आशीर्वाद मिळणे , पुलंनी '' भले शाब्बास '' म्हणणे याला महाराष्ट्राच्या कालपरवापर्यंतच्या जडणघडणीत मोलाचा वाटा होता. पुलंची शाबासकी मिळाली की कोणालाही आकाश ठेंगणे वाटे. पुल जेथे जात तेथे माणसांची गर्दी त्यांच्या अवतीभोवती आपोआप जमा होई. त्यासाठी भाड्याने माणसे बोलवावी लागत नसत. पुलंच्या ठायी असलेली विविध स्वरूपाची गुणसंपदा हे देवाचे देणे आहे , ते प्रयत्न करून अंगी बाणविता येण्यासारखे नाही.

समर्थांनी म्हटले आहे , '' रूप लावण्य अभ्यासिता न ये । सहज गुणासि न चले उपाये । काहीतरी धरावी सोये । आगंतुक गुणांची ।। '' समर्थांच्या काळात ब्युटीपार्लर नव्हते. त्यामुळे त्यांनी '' रूप लावण्य अभ्यासिता न ये । '' असे म्हटले असावे. आता रूप-लावण्यात ' नव्हत्याचे होते ' करणा - या कला अस्तित्वात आल्या आहेत. पण '' सहज गुणासि न चले उपाये '' हे त्रिकालाबाधित सत्य आहे. म्हणून पुलंच्या लेखातील वा साहित्यातील गुण किंवा त्यांचा अभिनय अनुकरण करून साधणार नाही ; पण समाजहिताची कळकळ आणि तळमळ मात्र आपल्या अंगी बाणविता येऊ शकते.

लेखनाच्या उत्पन्नातून भलेमोठे समाजकार्य निर्माण करण्याचा पुलंनी जो वस्तुपाठ आपल्यासमोर उभा केला , त्याचे अनुकरण यथानुशक्ती प्रत्येकाने केले तर ते पुलंची स्मृती चिरकाल ठेवण्यास साह्यभूत होईल , यात शंका नाही.