...तर मराठीची चिंता बाळगण्याचे कारण नाही

Started by gaurig, February 09, 2010, 11:06:24 AM

Previous topic - Next topic

gaurig

...तर मराठीची चिंता बाळगण्याचे कारण नाही

३ जुलै १९८७ ला अमेरिकेत न्यू जर्सीला झालेल्या बृहन् महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात पुलंनी केलेल्या अध्यक्षीय

भाषणातील अंश...

* इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की, साँग हॅज द लाँगेस्ट लाइफ. गाणं हे चिरंतन असतं. या मराठी मुलांच्या ओठांवर, मनामध्ये तुम्ही मराठी गाणी दिलंय. अशी पाचपन्नास गाणी दिलीत, तर मराठी संस्कृतीची चिंता करण्याचं तुम्हाला काहीही कारण उरणार नाही. हे गाणं या बालकांबरोबर त्यांच्या वयाच्या ऐंशीव्या-नव्वदाव्या वर्षापर्यंत जाईल, कदाचित शंभराव्या वर्षापर्यंतसुद्धा जाईल. जोपर्यंत एक मराठी गाणं तुमच्या ओठांवर आहे, तोपर्यंत तुम्ही अमेरिकेत राहा, नाहीतर टिंबक्टूत राहा, कुठंही राहा, तुम्ही मराठीच आहात. त्यात काही चिंता बाळगण्याचं कारण नाही.

* तुकारामासारख्या संतानंसुद्धा म्हटलंय की, ' माझिया जातीचा मज मिळो कोणी ' . इथे ' जातीचा ' याचा अर्थ माझ्यासारखी ज्याला विठ्ठलाची ओढ आहे, देवाची ओढ आहे. अशा प्रकारचा कोणीतरी मला मिळो. तुकारामाच्याच उक्तीप्रमाणे बोलायचं तर ' माझिया भाषेचा मज मिळो कोणी ' या भावनेनं आपण इथे एकत्र आलेले आहोत. आणि इतक्या संख्येनं इथे एकत्र जमलेले आहोत की , मला तर असं वाटतं, कोणीतरी तिथून ' न्यू जर्सीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ', असं म्हणेल की काय !

* परदेशात आपल्या भाषेचा शब्द कानांवर पडणं मुश्कील. म्हणूनच तर तो ' परदेश ' होतो ना ! मला खात्री आहे की, इथे अगदी अनोळखी प्रदेशातून प्रवास करताना कानांवर बालकवींची कविता वगैरे जाऊ दे, पण ' च्यायला ' अशी शिवी जरी ऐकू आली, तर ती ओवीसारखी वाटेल आपल्याला त्यावेळी.

* हे जीवन सुंदर व्हावं, आनंददायक व्हावं, हाच हेतू सगळ्या संस्कृतीच्या मुळाशी असतो. गुलाबाचं फूल आणि मोग-याचं फूल ही फुलं भिन्न आहेत, म्हणजे त्या फुलांचं वैर आहे असं नव्हे. त्यातलं फूलपण एकच आहे. ' ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा ' असं चोखोबांनी म्हटलंय. ऊस वाकडा पण रस वाकडा नसतो. गाय काळी म्हणून दूध काळं नसतं. तसं हे फुलातलं फूलपण खरं. तिथे पुष्पसृष्टीचेच कायदे लागू पडतात. प्रत्येक माणसाला, तो कुठलाही असला तरी जीवसृष्टीचेच कायदे लागू पडतात. दाढ ठणकायला लागली की, कानडी मनुष्य ' अय्यय्यो ' म्हणून कानडीत ठणाणा करील. तो कानडीतून असला, इंग्लिशमधून असला किंवा जपानीतून असला, तरी दाढ ठणकण्याची वेदना तीच आहे. त्याच्यामध्ये काही फरक नसतो. एकात्मतेत विविधता आणि विविधतेत एकात्मता - ' युनिटी इन डायव्हर्सिटी ' म्हणतात ती हीच. एकात्मता हे जसं सत्य आहे, त्याचप्रमाणे विविधता हेही सत्य आहे.

* कुसुमाग्रजांची एक कविता आहे, ' नवलाख तळपती दीप विजेचे येथ, उतरली जणु तारकादळे नगरात, परि स्मरते आणिक करिते व्याकुळ केव्हा, त्या माजघरातील मंद दिव्याची वात. ' आपल्या माणसांपासून, आपल्या भाषेपासून हजारो मैल दूर असलेल्या आपल्यासारख्या मराठी माणसांच्या मनाच्या माजघरामध्ये आजूबाजूला एवढं सारं ऐश्वर्य असूनही जिवाला व्याकूळ करणा-या मंद दिव्याच्या वाती या असणारच. या मेळाव्यात अशा माजघरातल्या मंद दिव्याच्या वातींचं स्मरण न होणारं असं कुणी असेल, असं मला वाटत नाही. ती रुखरुख नसती, तर मराठी भाषेची ज्योत तशीच पेटत राहावी, या भावनेनं तुम्ही असे एकत्र आला नसता. ज्या भाषेचे संस्कार तोंडावाटे शब्द फुटण्याच्या आधी आपल्या कानांवर झाले, त्या भाषेची नाळ ही नुसती कानाशी जुळलेली नसते, प्राणाशी जुळलेली असते. शरीरातून रक्त वाहावं तशी आपल्या व्यक्तिमत्त्वातून भाषा वाहत असते, तो प्रवाह थांबवणं अशक्य असतं. आईच्या दुधाबरोबर शरीराचं पोषण होत असताना तिच्या तोंडून येणा-या भाषेनं आपल्या मनाचं पोषण होत असतं. केवळ देहाच्या पोषणानं माणसाचं भागत नाही. किंबहुना मानव म्हणजे ज्याला मन आहे तोय मन एव मनुष्यः अशी योगवासिष्ठामध्ये माणसाची व्याख्या केलेली आहे. या मनाचं पोषण भाषा करत असते. त्या पोषणाचे पहिले घास ज्या भाषेतून मिळतात, ती आपली भाषा.

* ' पुंडलिक वरदा ' म्हटल्यानंतर तुम्ही आस्तिक असा की नास्तिक असा, ' हारी विठ्ठल ' तोंडातून येणारच तुमच्या. तो प्रतिसाद तुम्हाला कळण्यापूर्वी उमटलेला असतो. अशा नेणिवांतून, आपोआप उमटणा-या प्रतिक्रियांतूनच समाजमानस तयार होत असतं. ' छत्रपती शिवाजी महाराज की ' म्हटल्यानंतर ज्याच्या तोंडून आपोआप ' जय ' येत नाही, तो मराठी माणूस आहे असं आपल्याला वाटतच नाही.

* खुद्द महाराष्ट्रात आज मराठीपेक्षा इंग्रजी भाषेलाच जास्त मान आहे. इंग्रजाच्या अमदानीमध्ये तिला राजभाषा म्हणून मान मिळत होता. इंग्रजी शिकायची सक्ती होती, आता तशी सक्तीही नाही. पण इंग्रजी भाषेची किल्ली हातात असली की, अभ्युदयाची अनेक दारं उघडली जातात, हे अनेक लोकांनी ओळखलेलं आहे. किंबहुना, पुण्याहून मुंबईला जाताना नव्यानेच कारखानदारीत शिरलेले जोशी-कुलकर्णीसुद्धा एकमेकांशी इंग्रजीत बोलत असतात. आता त्यांचं इंग्रजी ऐकल्यावर इंग्रज हा देश सोडून का गेला, हे आपल्याला कळतं.

* अमेरिकेमध्ये आल्यानंतर केवळ डॉलर्सचा संचय हे एकमेव उद्दिष्ट राहू नये, तर नवी निर्मिती करण्याचे जे जे काही प्रकार इथे चाललेले आहेत, चांगले आहेत, सुंदर आहेत, त्याच्यामागे आपली मुलं कशी लागतील, त्याची त्यांना आवड उत्पन्न कशी होईल, याची तळमळ हवी. आजच्या काळामध्ये मी एकच विनंती करणार आहे, इथं तुम्ही जमलेले आहात, फार मोठे तंत्रज्ञ-शास्त्रज्ञ आहात, तुम्हाला महाराष्ट्राची सेवाच करायची असेल, तर तुमचा जो विषय आहे, त्याच्यावरचे लेख मराठीत लिहून ते महाराष्ट्रात पाठवा. ही मराठी भाषेची सगळ्यात मोठी सेवा होईल. तळमळ खरीखुरी असेल तर अशक्य काहीही नाही.  



gaurig