म्हतारीचं काॅन्फीडन्स

Started by Parshuram Sondge, April 01, 2018, 06:27:06 PM

Previous topic - Next topic

Parshuram Sondge


दुपारची वेळ होती. मुलांची मधली सुट्रटी ची वेळ झाली होती. खिचडी तयार झाली होती.घंटी वाजली.तसा मुलांचा लोंढा बाहेर पडला.सारी किलबील सुरू झाली.भातावाली बाई तयार झाल्या होत्या.
मुलांची रांग केली. त्यांना काही सूचाना केल्या आणि तिच भींतीला टेकलो.मुलं येत होती .जात होती. तेवढयात एक आजीबाई आल्या.हातात एक डबा होता.त्या काठी टेकून तिथचं शांत बसल्या.त्या खाली जमीनीकडं बघत होत्या.त्यांच लक्ष तिथं नव्हतं.त्यांच्या हातातला डबा पण त्यांनी लपवला होता.बहुतेक मी तो पाहू नये म्हणून त्यांनी तसं केल असावं. मी उगच जरा अलीकडं सरकलो.आता त्या मला पाहू शकत नव्हत्या पण मी थोडं पुढं सरकलो की सारं पाहू शके.
                          सा-या मलांची खिचडी वाटून झाली.  आजी उठल्या. डबा पुढं केला.त्या आमच्या भातावाली बायीला भात मागू लागल्या. अापण फारचं प्रमाणीक व साव अहोत याचा आव आणण्याचा त्यांचा प्रयत्न असावा.तसा प्रयत्न अनेक चोर पण करतच असतात.म्हतारी हळू अवाजात भात मागत असतानी.काकू त्यांना टाळत होत्या. त्या मोठयांंन बोभाटा करू पहात होत्या.मी ते सारं हळूच पहात होतो.अाजीनं डब्याचा स्पर्श तिच्या दंडाला करत विनवणी सुरू केली.
तशी काकू मोठयान तिच्यावर खेकसली," म्हतारे पळ ग. हा भात पोरासांठी असतो. मोठया माणसाना नाही."
तसं म्हतारीनं तोंडावर बोट ठेवता.तिला गप राहण्याची खूण केली. बराच वेळ मी गप राहीलो. त्या ही गपच बसल्या. मुलांनी खरकटं सांडू नये म्हणून ग्राऊंड मध्ये उग फिरवू लागलो.माझं लक्ष मात्र त्यांचकडच होतं.
"अग,रकमा आत्या तुला सगितलं ना ? जा. तू. सर मला खवळतेल. मोठाल्या माणसाला नाय हयो भात."
"अग, दे थोडा. पोंराचं झाला की आता खाऊन."
"जा, तू सरला इचार."
"मी नाय बया. त्यांना कशाला इचारू?"
"मग मी इचारू का ?"
"नकू. त्यांना कशाला इचारतीस? ते जर म्हणले आजी, तू काय शाळेतस तर काय सांगू?^
हे ऐकल्या बरूबर. मी जवळ गेलो व म्हणालो,"काकू काय म्हणत्यात आजी?"
"काय नाय हो सर. म्या कशाला काय म्हणू ?"
"आजीला, मी मराठीत किती वेळा सांगते. हा भात पोरांसाठी असतो. तुला कसं देऊ.तिला मराठी कळनाचं."
आमच्या शाळाची आर्ची म्हणून प्रसिद्धीस आलेली मीनी.सैराट पिक्चरमधील बरेच डाॅयलाॅग पाठ असल्यामुळे सारे तिला अार्चीच म्हणू लागले. तिला तसचं वाटतं.तर ती आर्ची मध्येच म्हणाली,"आजी ,मग काय इंगलीश मध्ये सांगू काय ?"
तशी म्हतारी चिडली. रागारागनं काठी उचलली.
"नका, देऊ. जाते माझी म्या. कशाला इंग्रजी नी बिग्रजीत सांगता मला"
"आत्या राग आला काय?"
"आता कशाचा राग बया मला. माझा सारा राग गेला.कुणावर रागू ?अशी पोरी सोरीनी भी राडोळी नाय करावी. जाते बया." अशी म्हणाली. दोन पावलं पुढं गेली.
"आजी, पोरं काय करेतत?"
"एकचं होता. एकुलता एक. त्या ढोल्या मेल्यांनी नेलां बाबा. आता चार वर्ष होत आलं."
"त्या वरच्यान. भरल्या रानात. फाशी घेतली. गेला सोडून."
"मग सून आसणं की....?"
"सुन कुणाची कोण बाबा. लयं रीन झाल. रीन झाल.असं म्हणाली. गेली एके दिशी एका डारयवरचा हात धरून.इवडुशी इवडूशी पोरगी माझ्या अंगावं टाकनू.
"अरे.. अरे.. तिला काय झालं ?" मी उत्तर हळहळ व्यक्त केेेली.
"तसल्या शिदळ रांडाचं काय आसत ? झोपीतल लेकरू. उठलं आयी आयी करत. आयीन केलं काळ त्वांङ.संभाळते मीच. भरल्या जगात कुणी नाय तिला. " आजीच्या डोळयात पाणी दाटलं. त्या चेह-यावरील सुरूकत्याच्या ओघळरेषातून ते पाणी खाली ओघ्ळत आलं. आजीचा पदर ओला झाला. आता मला आजीचं पुढं काहीचं ऐकायचं नव्हतं. कुणाचं दु:ख टोकरण्यात काय  हशील? मनातलं ठसठसलेले थोडसं ढिवचलं. की कसा भळा भळा पू बाहेर यावा तसं तिच्या मनातलं भळभळत राहीलं.
"सरकार भी कसलं. त्या सटवेनं.कपाळाला लावायला माती नाय ठेवली.म्या पोटाला चिमटं घेऊन कमीलेले सारं शॅत त्याच्या घशात घातल."
"कुणाच्या.."
"तुम्हाला सांगाया काय झालं बाबा. महया लेकारावाणीत तुम्ही.त्या मसनवाडीच्या ड्रायरला घेउन घरात बसायची. महया लेकाच्या खाटीवर... पोटात आग पडायची नुसती. आग. आग व्हायची देहाची.सारं घरं पेटून दयावा वाटायचं. त्यात उडी मारून जळून जाव वाटायचं.त्यांना भी जाळावं पण त्या पोरीकडं पहात जगते बाबा. माझं तरी काय राहीलं? गापकुणी डोळ झाकलं तर महया लेकराचं काय होईल? लयं घोर राहतो. झोप नाय लागतं रातच्याला."
"असं नाय व्हायचं आजी. रडू नका. देवाला काळजी आसती. नाय तुमचं डोळ झाकायचे. त्या आजीला मी धीर देऊ लागलो होता.
"कुडीत प्राण हाय तव्हरं.मी नाय कमी पडू दयायचो." फाटका पदर पुन्हा एकदा ओला झाला. माझं काळीज आतुन चीरफाडत गेलं होतं.
                    गेल्या वर्षी आमच्या शाळेत असलेली.एक सडपातळ.. बुजरी.. पोर ही राणी...तिचंच चित्र डोळया समोर उभा राहीलं. राणी लयं हुशार नाही पण ती समजदार पोरगी आहे. इतकी समज तिला या वयात का आली असेल ! त्याचं उत्तर मला आज कळालं होतं.
"काकू ,दया त्यांना भात."
"सर, आज देता येईल.आजी रोजच आल्यावर ?" संवेदना बोथट झालेल्या ऑफीसमधील अधिका-यासाखी व सरकारी बाबूसारखी काकू मनान बधीर झाल्या सारखी वाटली मला.
"येऊ दया की.... रोजच दयायचा त्यांना भात आता."
"ही म्हतारी आली की दुस-या येतील.. तुम्हला माहीत नाय हे गाव सर." काकूनं उगचं निर्थरक सल्ला दिला.
"येऊ दया. म्हतारंपण  ही निरागसच आसतं ना बालपणावाणी?"
"दे की सर म्हणेत तू का फाटं फोडीती?" मी दिलेल्या आधारानं तिचा कॉन्फीडन्सं वाढला होता.
भरला डबा घेऊन जातानी तिच्या चेह-यावर आंनदाच्या मंद लाटा उठल्या होत्या.
आणि माझ्या अंतरंगात कसल्या समाधानाचं अमृतथेंब पाझरत होते. ते माझ्या डोळयाच्या कडा ओलावून गेले. त्यालाच आंनद आश्रू म्हणतात,ना?
                                                 परशुराम. सोंडगे,पाटोदा
                                prshuramsondge.wordpress.com
sahitygandha.blogspot. com





Email This
BlogThis!
Share to Twitter
Share to Facebook
Share to Pinterest
Pprshu1312