गझल आणि काव्य

Started by Asu@16, April 25, 2018, 06:49:42 PM

Previous topic - Next topic

Asu@16

गझल आणि काव्य

हृदयातून येते खरी !
पण गझलची शिस्त भारी
नजर समोर, बंद ओठ
हाताची घडी, तोंडावर बोट

रविवर्म्याची चित्र सुंदरी
अवतरली जणु भूवरी
नटूनथटून नेसून आली
भासे कामिनी नऊवारी

साधी सरळ कविता बरी
वाटे सर्वां मनास प्यारी
शब्दांची केवळ भेळ नसावी
शब्दफुलांची माळ असावी

पवनसुतासम पारखून घ्यावे
परमात्म्याचे दर्शन व्हावे
शब्दांचे फोडिता रत्ने
प्रत्येकात राम पहावे

हृदयी ज्याची गाज घुमते
शब्दांचा तो रत्नाकर असावा
शब्दांचे फेकून मोती
केवळ शिंपल्यांचा हार नसावा

कविता खरी अशीच घडते
भावशब्दांची गुंफण होते
धागा धागा वस्त्र विणुनि
नवरंग पैठणी काव्य बनते

'छंदमुक्त' थोडी स्वैराचारी
कुठेही फिरते दारोदारी
नाही धुंदी नाही छंदी
गद्य की पद्य फसगत न्यारी

काव्यगद्य की, गद्यकाव्य?
वेगवेगळा आस्वाद घ्यावा
गद्य पद्य दोन्ही दिव्य
संकराचा का अपसव्य!

शूर, सिंहाचा छावा
वीर, वाघाचा बच्चा
सिंव्याघ्राचा कशास हेवा
ना व्याघ्र ना सिंह सच्चा

- अरुण सु.पाटील
 
https://www.facebook.com/AsuChyaKavita