शिक्षक दिन

Started by Rajesh khakre, September 04, 2018, 10:54:28 PM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

शिक्षक दिन
●●●
आई नंतर बालकाचे जीवन कुणी घडवत असेल तर तो शिक्षक असतो. शिक्षक खऱ्या अर्थाने माणसाचे भवितव्य आणि चारित्र्य घडवत असतो. एखादा कुंभार जसा मातीच्या गोळ्याला आकार देऊन सुंदर मडके घडवतो, अगदी तसेच शिक्षक मुलांना ज्ञान आणि संस्काराचे सिंचन करून घडवत असतो.शिक्षक त्याच्या पूर्ण कौशल्याने कधी प्रेमपूर्वक, कधी धाकाने,कधी आदराने मुलांना घडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असतो.
खरं तर शिक्षक हा पेशा नाही, तर ती वृत्ती आहे, देण्याची वृत्ती. ज्ञान, समाधान, प्रेरणा देण्याची वृत्ती... आणि हे देण्याचे भाग्य खूपच कमी जणांच्या वाटयास येते.काही शिक्षक अगदी मन लावून पूर्ण निष्ठेने आपले कर्तव्य बजावत असतात. मुलांचे जीवन आणि भवितव्य घडविण्यासाठी धडपड करत असतात. आपला विद्यार्थी जीवनात अधिकाधिक उंच जावा, यशस्वी व्हावा यासाठी प्रयत्न करत असतात.त्यात त्यांना आनंद तर मिळतोच तसेच आत्मिक समाधानही मिळते. तेच खरे शिक्षक असतात. प्रसंगी पदरमोड करणारे, विद्यार्थ्यांशी एकरूप होणारे, विद्यार्थ्यांची आर्थिक आणि कौटुंबिक स्थिती ओळखून त्यांना परिस्थितीशी लढायला प्रवृत्त करणारे, प्रेमाचा हळूवार हात फिरवून मायेने जवळ घेणारे, प्रसंगी शिक्षाही करणारे, असेच शिक्षक हे खरे शिक्षक असतात. त्यांच्या प्रत्येक कृतीत विद्यार्थ्यांचे भले होण्याची तळमळ सामावलेली असते. मात्र काही शिक्षक असेही असतात, जे फक्त नोकरी म्हणून शिक्षक असतात; केवळ पाट्या टाकण्याचे काम असे शिक्षक करत असतात. त्यांना नुसते दिवस ढकलायचे असतात, असे शिक्षक हे त्यांच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबतच खेळत असतात.आणि त्याच्या अशा कृतीतून ते मोठे सामाजिक आणि नैतिक पातक करत असतात. मला अशावेळी पूज्य साने गुरुजींचे वाक्य आठवते "आज तुम्ही आदर्श शिक्षक असाल किंवा नसाल मात्र तुमच्या वर्गातील मुले तुमच्याकडे एक आदर्श शिक्षक म्हणूनच बघत असतात" हे साने गुरुजींचे वाक्य खूप बोलके आहे. शिक्षकाची जबाबदारी किती मोठी आहे, हे अधोरेखित करणारे आहे.
शाळेत पाऊल ठेवणारा एक निष्पाप बालक हा,घराचा उंबरठा ओलांडून शाळेच्या उंबरठ्यावर आपले पहिले पाऊल टाकत असतो. तो निरागस असतो, जगाच्या हरामखोरीशी, लुच्चेगिरीशी, भ्रष्टपणाशी त्याचा संबंध आलेला नसतो. एखाद्या कोऱ्या काळ्याशार पाटीप्रमाणे तो बालक असतो, त्यावर हळुवार ज्ञान आणि संस्काराच्या रेघोट्या काढून त्याचे सुंदर, आल्हाददायक चित्र शिक्षक काढत असतो, त्यात विविध नितीमूल्याचे रंग भरून ते चित्र अधिकाधिक खुलवण्याचा तो प्रयत्न करत असतो.शाळा संपल्यावर जेव्हा हे चित्र घेऊन विद्यार्थी जगाच्या भाऊगर्दीत शिरतो, तेव्हा शिक्षकाने साकारलेल्या त्या सुंदर चित्राची जपवणूक करणे, ही पूर्णपणे त्या विद्यार्थ्यांची जबाबदारी असते.
शाळा संपली म्हणून विद्यार्थी आणि शिक्षकांचे नाते संपत नाही, उलट ते अधिक घट्ट होते. मुलगा मोठा झाल्यावर बाप जसा त्याचा मित्र बनतो, तसेच शाळेत कडक शिस्तीचे वाटणारे शिक्षक नंतर कुठे भेटले की मित्राप्रमाणे बोलताना बघून आपल्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. त्यावेळी कळते की या वरून नारळाप्रमाणे टणक भासणाऱ्या आवरणाखाली असणारा एक मृदू आणि गोड शिक्षक आपल्याला कधी लक्षातच आला नाही.
आपला एखादा विद्यार्थी जेव्हा एखाद्या मोठ्या पदावर गेल्याचे समजते, तेव्हा शिक्षकाच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक तयार होते, जी त्याला मिळणाऱ्या पगारापेक्षा कितीतरी मोठी असते, तो आनंद परमानंद असतो. त्यात असूया नसते तर गर्व असतो, अभिमान असतो. शिक्षकांनी शिकविलेली मुले डॉक्टर बनतात, इंजिनीयर बनतात, संशोधक बनतात, कलेक्टर बनतात, मात्र शिक्षक कायम शिक्षकच असतो, जणू त्याचा तो स्थायीभाव असतो. किंबहुना शिक्षक असणारी व्यक्ती दुसऱ्या पदावर जरी गेली तरी त्यांच्यातला शिक्षक तसाच जिवंत राहतो. राष्ट्रपती पद भूषवूनसुद्धा डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्यातील शिक्षक शेवटच्या क्षणापर्यंत तसाच राहिला. यापेक्षा दुसरे मोठे उदाहरण कोणते असू शकेल.
शाळा,कॉलेज जीवनात कितीतरी शिक्षक आम्हाला शिकवून गेलेले असतात, मात्र तीन चार अशी नावे असतात कुणी 'शिक्षक' शब्द उच्चारला की आमच्या नजरेसमोर ती नावे आणि त्यांचे चेहरे ऊभी राहतात.मला वाटते "शिक्षक दिन" खऱ्या अर्थाने अशा शिक्षकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.
"गु-शब्द स्तवन्धकारास्यात
रु-शब्द स्तनिवर्तक:"
(आमच्या जीवनातील अंधकार जो काढून टाकतो तो गुरु)
असे आपले उपनिषद गुरूंचे यथार्थ वर्णन करतात.
कधी एखाद्या शिक्षकदिनी तुमच्या शाळेतील शिक्षकांना भेटायला नक्की जा..त्यांना सांगा, सर मी तुमच्यामुळे घडलो, तुम्ही मला जीवन दिले...या दोन शब्दांने त्यांचा ऊर अभिमानाने भरून येईल.त्यांचा प्रेमळ हात पुन्हा पाठीवर फिरला की तुम्हाला पुन्हा एकदा विद्यार्थी झाल्यासारखे वाटेल..!
© राजेश खाकरे
मो.७८७५४३८४९४
https://rajeshkhakre.blogspot.com/2017/09/blog-post_5.html?m=1

(लेखकाचे नाव काढून फॉरवर्ड केल्यास कॉपीराईट कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल)