आसवांच्या खेळात

Started by कवी अमोलभाऊ शिंदे पाटील, April 27, 2019, 10:59:43 AM

Previous topic - Next topic

कवी अमोलभाऊ शिंदे पाटील

*शीर्षक.आसवांच्या खेळात*

तुझ्यामुळंच सखे रान आज हे झुरलं
मरण येऊन दारा पुढं का आज हे उरलं

तुझ्या आठवणीत
ही रात्र रोज येते
आसवांच्या खेळात
तू तर मात्र होते

थेंब थेंब साठून सखे सपान मी पेरलं
मरण येऊन दारा पुढं का आज हे उरलं

वाहणारा वारा
सुगंध घेऊन आला
त्यानं ही मस्करीचा
पारा वरती नेला

मस्करीनं त्यानं माझं हसू ही पुरलं
मरण येऊन दारा पुढं का आज हे उरलं

साखर झोप माझी
मज खुणावत होती
बघ ती ही किती हट्टी
नजरेच्या आड येती

तिनं साऱ्या स्वप्नांवर माझ्या पाणी फेरलं
मरण येऊन दारा पुढं का आज हे उरलं

मनाला समजावून
जगी वेगळं राहतो
ती नसताना आज
मी जरा वेडा वागतो

वेड लागलं तिनं घातलं नसता डोरलं
मरण येऊन दारा पुढं का आज हे उरलं

✍🏻(कवी.अमोल शिंदे पाटील).
मो.९६३७०४०९००.अहमदनगर

Atul Kaviraje



     अमोलभाऊ सर, झुरणारं रान, आठवणीतील रात्र, पेरलेलं स्वप्न, वाहता वारा, इत्यादी उदाहरणांनी, विशेषणांनी  नटलेली, सजलेली आपली ही एक वेगळ्याच धर्तीवरील कविता "आसवांच्या खेळात" , मनास स्पर्श करून गेली. आपल्या अश्रूंनी हा जो खेळ मांडला आहे, त्यावरून आपल्या हळुवार मनाचा, अंदाज बांधता येतो.

     जास्त काही बोलता येत नाही, परंतु उच्च प्रतीची, अनाकलनीय अशी हि कविता आहे असंच मी फक्त म्हणू शकेन, अश्याच वास्तव, जीवनाचे सत्य सांगणाऱ्या कविता आपण लिहाव्यात, हि माझी मनापासून इच्छा आहे.

     भाव-भावनांच्या,सुख-दुःखाच्या लपंडावात
     आसवांनी माझ्या मांडला खेळ
     असेच जगणे का आयुष्यभराचे
     बसत नाही याचा आजही मेळ.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-०१.०६.२०२१-मंगळवार.