मी कोण?

Started by Sagar Gangurde, June 16, 2019, 02:33:46 PM

Previous topic - Next topic

Sagar Gangurde

नक्की कोण मी?

सर्वच राजनेते भ्रष्ट म्हणून न काढलेले मतदानचे 'ओळखपत्र' मी? कि,

हवालदाराच्या हातावर १०० ची नोट ठेवताना सरकारची न फाडलेली 'पावती' मी?

एखाद्याचं चुकल्यावर त्याला शहाणपणाचे चार शब्द ऐकवणारा 'समजूतदार' मी? कि,

'माझं कधीच चुकत नाही' म्हणून दोन शब्दही कुणाचे न ऐकून घेणारा 'शहाणा' मी?

'जवळच्यांच्या' प्रेतावर आकांताने रडताना डोळ्यातून गळणारे 'अश्रू' मी? कि,

जेवण करताना 'दूरच्या' अपघाताच्या बातम्या बघून हळहळ करत येणारा 'तृप्तीचा ढेकर' मी?

उडणाऱ्या पाखरांकडे बघून भरारी मारण्यासाठी मोठं होण्याचं लहानपणी बघितलेलं 'स्वप्न' मी? कि,

आता पहिल्या पावसात तेव्हासारखं भिजता येत नाही हे मोठेपणी उमजलेलं 'वास्तव' मी?

रात्रीच्या शांत कुशीत किरकिरणाऱ्या रातकिड्यासारखं मनात माजलेलं विचारांचं 'काहूर' मी? कि,

गर्दीने भरलेल्या बसमध्ये मागच्या सीटवर गुपचूप एकटच विचारात हरवलेलं 'मन' मी?

जीवनाची उत्तरं शोधण्यासाठी या आभासी जगाचं चढत असलेलं 'शिखर' मी? कि,

जीवाला पडणारे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतःच्याच आत उतरत असलेली एकेक 'पायरी' मी?