माय 'eye' चा घो!

Started by Swan, March 02, 2010, 11:34:12 AM

Previous topic - Next topic

Swan


इंग्रजीत आपल्या महत्त्वाच्या इंद्रियांपैकी एक असलेल्या डोळ्याला 'आय' म्हणतात हे ज्ञान येथे देण्याची गरज नाही. मांजरेकरांनी 'शिक्षणाच्या आयचा घो' म्हणजे शिक्षणाच्या डोळ्याचा घो असे स्पष्टीकरण दिले असते म्हणजे मग त्यावर आक्षेप घेण्यासाठी कोणत्याच महासंघाच्या आयची (डोळ्याची) हिंमत झाली नसती. आता वयोमानानुसार माणसांची 'नजर' बदलते. नजरानजर आणि 'नजरबंदीचे' सगळे खेळ बंद करावे लागतात. नाही ते आपोआप होतातच आणि मग समोरचे भुरकट दिसू लागते. भलत्याला आपण भलत्याच नावाने हाक मारू लागतो. डोळ्यात हा कॅटॅरॅक्ट नावाचा 'आयचा घो' राहायला येतो आणि आपली 'नजर'च बदलून जाते. कुणाच्याही बैलाला घो लावण्याचे दिवस संपले हे लक्षात येत नाही. मुलाने आणि सुनेने संगनमत करून आपल्याला अंकलचे व बाबाचे आजोबा बनवलेले असते. डोक्यावरचे केसांचे छप्पर अर्धे उडालेले असते आणि डोळ्यांच्या बरोबर त्याचे आणखी दोन भाऊ 'नाकावर टिच्चून बसलेले असतात.' आयचे हे बायफोकल कनेक्शन सांभाळणे व मान खालीवर करून नेमकी 'इमेज' रेटिनावर आणणे कठीण असते. हे सारे शब्द आम्हाला डॉ. गोडबोले यांनी शिकवले. डोळ्याबद्दलचे हे शब्द कानात शिरले व तोंडात फिट्ट बसले. तशी आमच्या डोळ्यांची फोकल लेंथ गुडलेंथ चेंडूसारखी योग्य आहे. आता हे आमच्या मिसेसचे मत सर्वाना मान्य करावे लागेल. फिरायला जाताना ती विकेटकीपरसारखी दक्ष असते. जाऊ दे, आपला विषय चालला होता आय म्हणजे डोळ्यांबाबत. महेश मांजरेकरांचे नशीब थोर म्हणून आय पक्षाचा डोळा त्यांच्याकडे गेला नाही. नाही तर त्यांच्या डोळ्यातून पाणीच आले असते.
आता आमच्या डोळ्यात हा पांढरा डाग तयार झाला आणि आमचे लिहिणे-वाचणेच कमी झाले. आंबा पिकण्यासाठी जसा आढीत घालून ठेवावा लागतो तसे हे आमचे मोतिबिंदूचे प्रकरण लोकांच्याही डोळ्यात येऊ लागले. मोती जसा शिंपल्यातच तयार होतो तसा हा मोती पण डोळ्याच्या शिंपल्यातच तयार होत होता आणि मग एके दिवशी तो प्रसंग आला. म्हणजे डॉ. गोडबोले यांनी शस्त्रक्रिया करण्याची तारीख दिली. डॉक्टरांनी अशी 'तारीख' काढून दिली की आमच्या 'पोटात गोळा' येतो. नेमक्या त्याच तारखेला शस्त्रक्रिया होईल, असे गृहीत धरून आम्ही कामाची आखणी केली. ब्लड शुगर तपासण्यासाठी शिरा ताणून रक्त सांडले. साखरेचे प्रमाण बॉर्डरलाच होते. दोन-चार दिवसांनंतर खाण्यावर बंधने येणार म्हणून आम्ही आमच्या जिभेला जरा सैलच सोडले होते. न जाणो ऑपरेशन करताना भलतेच काही झाले तर खाण्याची इच्छा बाकी राहायला नको. आता दोन दिवस मनसोक्त खा-प्या, मजा करा, असे जगायचे असे ठरवून आम्ही 'सारेगमप्या' पाहत होतो. तेवढय़ात मोबाईल बोंबलला. आम्ही कानाला लावला तेव्हा डॉ. गोडबोल्यांच्या असिस्टंटचा फोन होता, ''सर, उद्या तुम्हाला वेळ असेल तर ऑपरेशन करून टाकू या का, असा डॉक्टरांचा निरोप आहे.'' आम्ही ताबडतोब हो म्हटले. एकदा ते ऑपरेशन करून लवकरात लवकर 'सुटका' करून घेण्याचा आमचा विचार केव्हाच पक्का झालेला होता. फोन बंद करून उद्या आम्ही सकाळी ऑपरेशनला जाणार असल्याचे जाहीर करून टाकले. हे अचानक काय कसले अशा प्रश्नांना उत्तर होते. ज्यांना आधी 'तारीख' दिलेली होती. त्यांची शुगर वाढल्याने त्यांची शस्त्रक्रिया कॅन्सल झाली होती आणि मैदानावर जसा बदली खेळाडू जातो तसे आम्ही उद्या जाणार होतो. ''चला, उद्या मी पण येते'', असे आमची ही म्हणालीच. मी तिला म्हटले, ''अगं, हॉस्पिटल जवळ आहे. डॉक्टर माझा मित्र आहे आणि त्याने काही आपले मेहुण बोलावलेले नाही म्हणून तू येऊ नको. नाही तर तेथे बसून धन्वंतरीच्या मूर्तीपासून सगळ्या डोळ्यांच्या कॅलेंडरला व फोटोंना नमस्कार करत बसशील. ठरल्याप्रमाणे आम्ही दवाखान्यात वेळेआधीच दाखल झालो. ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यावर आम्हाला टेबलवर झोपवण्यात आले. डॉक्टरांबरोबर त्यांचे तीन असिस्टंटही होते. बायका घेतात तसा बुरखा आम्ही घेतला होता. एवढय़ात आमची बायको थेट ऑपरेशन थिएटरमध्ये आली. तिने डॉक्टरांना काहीतरी विचारले आणि ती बाहेर निघून गेली. आम्हाला ''एकदा पाह्यला'' आली होती की काय, असा भयंकर विचार मनात आला. मग डॉक्टरांनी डोळ्याच्या बाजूनी दोन-चार इंजेक्शने दिली व आमच्या पापण्याही कापून काढल्या. पापणी लवायच्या आत सारे घडले आणि थोडय़ाच वेळात आम्हाला काहीही न कळता डॉक्टर गोडबोल्यांनी तो मोती काढून टाकला. डोळ्यावर हे मोठे बॅण्डेज बांधून आम्ही बाहेर आलो तेव्हा हिच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते. ते ऑपरेशन यशस्वी झाल्याचे होते की, आमच्या विनोदी चेहऱ्याबद्दल होते हे तिचे तीच जाणे. संध्याकाळीच डॉक्टरनी बॅण्डेज काढले आणि डोळ्यांवर काळा चष्मा लावल्याबरोबर आम्हाला दोस्ती चित्रपटातील सगळी गाणी आठवली. एका डोळ्याने आम्ही आमचा चेहरा आरशात बघितला आणि एकदम ''मैं हू डॉन' म्हणत रस्त्यावरून नाचत जावेसे वाटू लागले. आमच्याजवळचा 'एक मोती गळाला' इस्टेट कमी झाली पण 'नजर साफ' झाली. काही दिवसांतच 'चांगले' चांगले दिसू लागले आणि तेवढय़ात आम्हाला लेखाचे शीर्षक सुचले, 'माय आयचा घो.' मांजरेकरांनी आयचा घो म्हणजे 'eye' चा घो असे स्पष्टीकरण दिले असते तर कोणत्याही महासंघाने आक्षेप घेतला नसता. म्हणून नेमके समजण्यासाठी या वयात नजर साफ हवी. आम्हाला आता दुसऱ्या डोळ्याने भुरकट दिसू लागले आहे म्हणून आता दुसऱ्या  'eye' चा घो काही दिवसातच. वाचकांच्या भावना दुखावल्या असल्यास आम्ही दिलगीर आहोत.

शंकर पु. देव

NilamT

chan aahe lekh
kahi vinod uttam aahet