दुराव्या नंतर

Started by शिवाजी सांगळे, June 23, 2020, 05:07:53 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दुराव्या नंतर

काँफीच्या पहिल्याच घोटा बरोबर त्याला मुंबई जवळचं शांत आणि महत्त्वाचं म्हणजे मनाजोगता एकांत देणारं बेट आठवलं. बस् आता तिथेच जायचचं, त्याच्या कडून तर हे पक्कं ठरलं. 'ती' काय रीअँक्ट होईल? असा हलकासा विचार त्याच्या मनात आला खरा, पण काँफीच्या घोटासोबत त्यानं तो सहज रीचवला. ती नकार देणार नाही याची त्याला कल्पना होती. जावू तेव्हा तीला काय भेट द्यायची याचा बेत तो मनोमन आखू लागला, जास्त काही नाही, फक्त छान सुगंधित मोगऱ्याचा एक गजरा जरी पेश केला तरी 'ती' मनापासून सुखावेल याची त्याला खात्री होती. कारण त्याला माहित होतं, कि 'ती' ला त्याचे अस्तित्व मोलाचे वाटते. याच विचारात त्याने काँफी संपवून कप टेबलावर ठेवला आणि क्षणभर डोळे बंद करून घेतले. तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर तीचचं चित्र दिसु लागलं, तशा बऱ्याच जणीं त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करीत असत, पण 'ती' ते होवु देत नव्हती, तशी त्याच्या बद्दल ती फारच पजेसिव्ह होती, तीच्या मते तो फक्त तीचाच आहे. त्याच्याप्रती तीचं ते झपाटलेपण, वेडेपण त्यालाही फार आवडत होतं, कदाचित सवय झाली होती... दोघांनाही, आणि याच झापाटलेपणातील अति प्रेमामुळे वा ओढी मुळे  आणि त्यातून झालेल्या गैरसमजामुळे  त्यांच्यात काहीतरी  बिनसलं असावं !

दुरावलेली नाती पुन्हा जुळली तर त्यांच्या संबधांची तीव्रता वाढते म्हणतात, परस्परांवरचा विश्वास जरी वर वर पुर्वी सारखा असला, तरी तो बऱ्या पैकि सावध झालेला असतो. काही बाँन्डिगज् असतात, आतली हुरहूर असते म्हणुनच नाती तोडता येत नाहीत, समज गैरसमजातून निर्माण झालेल्या दुराव्याने मानसिक पातळीवरची घालमेल दोघंही दाखवत नसले तरी ती आत कुठेतरी असतेच, दोघं जरी कितीही लाँयल असले तरी. सहवासाने, दुरावा थोडा थोडा कमी होउ लागतो. एकमेकां बद्लची आसक्ती, ओढ सुध्दा वाढीस लागते. तरी पण पुढाकार कोणी घ्यायचा हा संकोचमिश्रित अहंभाव मात्र दोघांनाही सारखाच सतावत असतो.

अशाच काही दिवसांच्या मानसिक अवस्थेनंतर, एक दिवस लांब कुठेतरी जायचं, मनात जे काही राहिलय ते मोकळेपणाने बोलायचं असं 'तो' सुचवतो, विचारांचा, भावनांचा गुंता आणि त्यातून झालेल्या कोंडमाऱ्यातुन त्याला स्वतःला सोडवायचं असतं. 'ती' नं जरी याला स्पष्ट नकार न देता, मुक होकार दर्शवला होता, तीला सुद्धा वाटत होत कि मधल्या काळात जे काही बोलायचं, ऐकायचं राहिलं होतं, हरवलेलं होतं, ते प्राप्त करायचं, उपभोगून घ्यायचं आणि स्वतःला मनसोक्त उधळून, लुटून द्यायचं.

हलकीशी थंडी असलेली डिसेंबर महिन्यातली आल्हाददायक सकाळ, स्टेशनवर येणाऱ्या प्रत्येक ट्रेनमधून मुंग्यांसारखे बाया माणसांचे लोंढे बाहेर पडत होते, स्वतःच्याच तंद्रीत तो त्या गर्दीत 'ती' ची वाट पहात, तीला शोधत उभा होता, अधुनमधून होणाऱ्या उद्घोषणांमुळे त्याची तंद्री भंग पावत असतानाच काळ्या रंगाची नाजुक नक्षी असलेल्या लालचुटूक साडीकडे त्याचं लक्ष गेलं, आणि तो मनातून हरखला, सुखावला, खरं तर तीचं साडी नेसणं त्याला खूप आवडायचं, ती सुद्धा ग्रेसफुल दिसायची साडीत. ती जवळ येताच, त्याने न बोलता काँफी स्टाँलकडे नजर फिरवीत हात पुढे केला, कप तयारच होता, त्यानं कप घेऊन तीच्या पुढे केला, संकोचाने तीनं कप हातात घेतला खरा, आणि पुढच्याच क्षणाला परत त्याच्या पुढे करून इशाऱ्यानेच त्याला अगोदर काँफी प्यायला सुचवलं, त्यानेही लगेच कप ओठाला लावला, तीन चार घोट घेतल्यावर पुन्हा त्यांने कप तीच्या समोर धरला, आणि त्याच्या नजरेत आपली नजर मिसळत तीने अलगद तो कप आपल्या ओठांना लावला.

मूकपणे दोघ स्टेशन बाहेर आले, त्याने हात दाखवताच एक टॅक्सी त्यांच्या जवळ येऊन थांबली, बसताच त्यानं 'गेटवे ऑफ इंडीया' चलो म्हटलं, पैसे देई पर्यंत दोघही गप्प होते, टॅक्सीतून उतरून दोघेजण शांतपणे फेरीबोटीकडे निघाले. साडी नेसल्यामुळे तीला बोटीत चढताना त्रास होतोय हे लक्षात येताच त्याने हात पुढे केला, त्याच्या आधाराने बोटीत पाय टाकताना ती कौतुकाने त्याच्याकडे पहात होती. काही वेळात बोटीने धक्का सोडताच, वाऱ्याची छान झुळूक त्यांच्यातलं वातावरण हलकं करून गेली. मुंबईला आलेले नवखे सहप्रवासी मुलाबाळांसह समुद्रचा मनमुराद आनंद घेत होते, सुरवात कुणी करायची या द्वंद्वात अडकले हे दोघं शेजारी बसुन मौन असताना एक सीगल अचानक त्यांच्या जवळून गेला तशी ती दचकली आणि तीने नकळत त्याचा हात धरताच, "घाबरलीस?" त्यानं विचारलं, नकारार्थी मान हलवत आणि छान स्मित करीत तीने त्याचा हात आणखी घट्ट धरला, ऐवढी कृती दोघानाही रिलॅक्स व्हायला पुरेशी होती.

एका लयीत चाललेल्या बोटी भोवती सीगल्सचा थवा घिरट्या घालत, प्रवाशांनी पाण्यात टाकलेला खाऊ हवेतल्या हवेत लिलया आपल्या चोचीत पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सीगल्सना न्याहाळत असता दबक्या आवाजात तीने विचारलं, "अजून चिडला आहेस?" तो नुसताच हसला, आणि त्याने बॅगेत हात घालून  मोगऱ्याचे दोन गजरे बाहेर काढून तीच्या ओंजळीत ठेवले, तसा तीचा चेहरा फुलला, लागलीच तीने आपली ओंजळ त्याच्या चेहऱ्यासमोर केली, मोगऱ्याच्या मंद, धुंद सुवासाने त्यालाही रहावलं नाही, त्याने तीची ओंजळ आपल्या दोन्ही हातात घेत मोगऱ्याचा मनसोक्त सुगंध घेतला आणि तशीच ओंजळ तीच्या चेहऱ्यासमोर धरली, तीने एक दीर्घ श्वास घेत त्याच्या काही लक्षात येण्या अगोदर  दोन्ही गजरे आपल्या केसात माळले सुद्धा, आणि तो अनिमिषपणे तीच्याकडे नुसतं पहात राहिला. साधारण पाऊण तासाने बोटीचा वेग थोडा कमी झाला, तसा सीगल्सनी आपला मोर्चा माघारी वळवायला सुरवात केली, याचा अर्थ बोट आता समोरच्या धक्क्यावर थांबणार होती.

© शिवाजी सांगळे 🦋
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९

Powerboy9

मी कॅफेमध्ये कॉफी खातो, मी किंक्ससाठी कॉफी खातो. प्रत्येकाला आवडते की मी थंड होण्यासाठी खावे.