नाती म्हणजे नाती असतात

Started by sachinikam, December 27, 2020, 08:22:52 PM

Previous topic - Next topic

sachinikam

नाती म्हणजे नाती असतात
कवी: सचिन निकम, कवितासंग्रह: मुक्तस्पंदन

नाती म्हणजे नाती असतात
एकाच समईत उजळणाऱ्या वाती असतात
अंधारावर मातून जगणाऱ्या राती असतात
वाऱ्याशी झुंजून मिणमिणाऱ्या ज्योती असतात.

नाती म्हणजे नाती असतात
तळहाताचा करुनि पाळणा जोजवणाऱ्या आई असतात
वात्सल्याने वासराला कुरवाळणाऱ्या गाई असतात
ताडुनि खोडकर कान्हाला
मिठीत घेणाऱ्या यशोदामाई असतात
पाजुनी स्वाभिमानामृत शिवबाला
स्वराज्य घडवणाऱ्या जिजाबाई असतात
बीज अंकुरे वृक्ष बहरे
जोपासणाऱ्या जन्मदात्री असतात.

नाती म्हणजे नाती असतात
देह दोन वेगळे असुनि
स्पंदने मात्र एकच असतात
सुमनांनी भ्रमरासाठी साठवलेल्या
माधुर्यवाटी असतात
कामदेवाने रतीसाठी बांधलेल्या
रेशीमगाठी असतात
घेऊनि सात फेरे हाती
साथ राहूदे जन्म साती
मागणाऱ्या सावित्री असतात.

नाती म्हणजे नाती असतात
रेशमी धाग्यात गुंफलेले मोती असतात
असल्यावर एकत्र, शोभा उजळती असतात
इतस्ततः विस्कटल्यावर मोल मात्र माती असतात
पुन्हा नव्याने गुंफणारी मने मात्र मोठी असतात.

नाती म्हणजे नाती असतात
पाची बोटे एका हाताची
एकसारखी कधी नसतात
एक होऊनि झुंजायला
बळकट मुठी तेच बनतात
झेलायला बिकट आव्हाने
तयार निधड्या छाती लढतात.

नाती म्हणजे नाती असतात
एकमेकांपासून दुरावले तरी
मायेच्या ओढीने जोडत असतात
रागद्वेष हेवेदावे
गंगेला सोडत असतात
जवळ असल्यावर मनामध्ये
कसल्याही भीती नसतात.

Copyrights: Skrinz Studios
Watch the full video on YouTube Channel "Skrinz Studios Music".