चहा-टकळी

Started by Swan, March 10, 2010, 10:30:55 AM

Previous topic - Next topic

Swan

चहा हे भारताचं राष्ट्रीय पेय आहे. भारताच्या कुठल्याही राज्यात, जिल्ह्यात, खेडेगावात जा, प्रत्येक ठिकाणी चहा हा हमखास मिळणारच. त्याच्या प्रतवारीत फरक असेल. पंचतारांकित हॉटेलात तो टी-क्रोझी, शुगरक्यूब वगैरे सरंजामासकट येतो तर उत्तरेकडे कुल्हट नावाच्या मातीच्या मडक्यातून येतो. पण चहा हा भारतात 'ओमनी प्रेझंट' आहे. देवासारखा. तो सर्वव्यापी आहे. देव तरी दिसत नाही. त्याचं अस्तित्व सौजन्य म्हणून मान्य करावं लागतं. चहा तर प्रत्यक्षात दिसतो. देव भेटल्यावर स्वर्गसुख मिळतं असं म्हणतात, इतर म्हणतात म्हणून आपण म्हणतो. चहा प्यायल्यावर मात्र ते खरोखरच मिळतं. कडाक्याच्या थंडीत किंवा पावसाच्या धारा कोसळत असताना कपभर गरमागरम फक्कड, लालभडक चहा मारण्यात जी मजा असते तिलाच स्वर्गसुख असं म्हणतात. (असं मला माझ्या स्वर्गवासी काकांनी पाठविलेल्या पत्रात लिहिलं आहे.)
सच्च्या भारतीय नागरिकाला चहा 'ढोसल्या'शिवाय काम सुचत नाही. भारत सरकार, सगळ्या राज्य सरकारी कचेऱ्या, त्यांची विविध खाती आणि महामंडळं यांच्यातला 'चहापाणी' हा समान दुवा आहे. राष्ट्रीय वृत्तीचे खरे देशभक्त, सरकारी कर्मचारी 'चहापाणी' घेतल्याशिवाय कामाला हात लावत नाहीत, इतकं त्यांचं देशावर प्रेम असतं. सर्व सरकारी कचेऱ्यांमध्ये 'चहापाणी' हा परवलीचा शब्द असतो. 'चहापाणी' घेतल्याशिवाय सरकारी कर्मचाऱ्यांना काम करायला उत्साहच येत नाही. म्हणून चहा हेच भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेचं खरं प्रतीक आहे. चहा हे निव्वळ एक उत्तेजक पेय नाहीय. उत्तेजक पेय तशी इतर अनेक आहेत. काही उत्तेजक पेयं पिण्याच्या काही ठराविक वेळा असतात. चहाचं तसं नाहीय. तो कधीही प्यायला जाऊ शकतो. पाजला जाऊ शकतो.
चहा हा शिष्टाचार आहे. (भ्रष्टाचारही आहे. 8)) तो पाहुणचार आहे :). तो होकार आहे ;). त्यात रुकार :o आणि काही वेळा नकारही   :-[दडलेला असतो. तो एकाच वेळी पाहुण्याविषयी अगत्य दाखविण्याची आणि त्याच वेळी पाहुण्यांना फुटवण्याची ट्रीकही आहे. पूर्वी ऑफिसात पाहुणे आले की साहेब प्यूनला 'अप्पाला किंवा नरसूला दोन चहा पाठवायला सांग' असे सांगायचे. त्यामागे एक संकेत असायचा. नरसूला चहा पाठवायला सांगितलं तर प्यून चहाची ऑर्डरच द्यायचा नाही 8). पाहुणे बसून बसून कंटाळायचे आणि उशीर होतोय म्हणून निघून द्यायचे. साहेब शिष्टाचार पाळायचे पण चहा पाजायचे नाहीत. असाच एक प्रसंग माझ्याबाबतीतही घडला होता. वडिलांचे एक जुने मित्र परगावी स्थायिक झाले होते. त्यांच्या गावी गेल्यावर अगत्याने त्यांना भेटायला गेलो. त्यांच्या सुनेला ते फारसं आवडलं नाही. तिने एकदम रूक्षपणे, 'तुम्ही काय घेणार, चहा की कॉफी?' असं विचारलं. तिच्या विचारण्यामागे चहा-कॉफीशिवाय इतर काही मिळणार नाही, असा गर्भित अर्थ होता. ;D ;D ;D
चहा हे सगळ्या वयोगटांचे पेय आहे. पर्वतीवर फिरायला जाणारे पेन्शनर येताना एखाद्या टपरीवर चहा प्यायला थांबतात आणि सेवन्थ पे-कमिशन लागू झाल्यावर पेन्शनचे अ‍ॅरिअर्स किती मिळतील यावर चर्चा करतात. तर कॉलेज तरुण एखाद्या काकाच्या हॉटेलात कटिंग आणि एक छोटी फोरस्क्वेअर सिगारेट 8) घोळक्यात शेअर करीत आपापला 'डाव' पटवायला कशी फिल्डिंग लावली त्याची चर्चा करतात 8) 8) 8). वयोमानानुसार चर्चांचे विषय बदलतात, पण त्यांचा आधार चहा हाच असतो.
चहा हा भारतीयांच्या जीवनात इतका मुरलाय की, समाजजीवनातही तो विविध भूमिका बजावतो. मुलगी दाखविण्याच्या कार्यक्रमाला पूर्वी 'कांद्या-पोह्याचा कार्यक्रम' म्हणायचे. हल्ली त्याला 'चहा-बिस्किटांचा कार्यक्रम' म्हणतात. मुली आणि मुलं दोघांच्या बाबतीत कार्यक्रमाची संख्या वाढली आहे. दरवेळी कुठे पोहे भिजत घालणार. म्हणून हल्ली बिस्किटांची खोकी आणून ठेवली जातात. पाहुणे आले की चहा करायचा आणि एक बिस्किटाचा पुडा फोडायचा की झाला कार्यक्रम! दोन बिस्किटांचं पुडे तीन पाहुण्यांना पुरतात.
चहाला सख्खं भावंडं कुणी नाही. कॉफी ही त्याची चुलत बहीण आहे >:(. सरबत, ओव्हल्टीन, कोल्ड्रिंक्स वगैरे दूरचे नातेवाईक. चहा आपल्यातला वाटतो. कॉफी म्हणजे श्रीमंताघरची गोरीपान, शिष्ट मुलगी. तिच्याकडे नुसतं बघावंसं वाटतं. तिच्यावर प्रेम करावं, जीव टाकावा असं वाटत नाही. इतर उत्तेजक पेयांबद्दल बोलायलाच नको. त्यांना चहाची सर येणं शक्यच नाही.
चहा पिण्याची एक स्टाईल आहे. चहा हा कपातून बशीत ओतून फुंकून फुंकूनच प्यायला पाहिजे. 'दीवार'मधला अमिताभ बच्चन, 'सलीमचाचा! कल और एक कुली हप्ता देनेसे इन्कार करनेवाला है' 8) असं म्हणताना ज्या पद्धतीने चहा पितो ती खरी चहा पिण्याची पद्धत. चहा पिताना फुर्र्र असा आवाज काढल्यास चहा अजून गोड लागतो. तसेच चहा पिताना मिश्या भिजतील किंवा लिपस्टीक बिघडेल याची काळजी करीत बसू नये, तरच चहा अंगी लागतो.
तर एकूण, चहा हे समस्त भारतीयांच्या राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे. सर्व सरकारी कचेऱ्यांचं 'सत्यमेव जयते' हे लिखित आणि 'चहापाणी' हे अलिखित ब्रीदवाक्य आहे. चहा जोडतो ;D, चहा तोडतो ::), तो अंतर कमी करतो, राखतो, निर्माण करतो. एके काळी बिस्किटांबरोबर लाजत चहाचा कप घेऊन येणारीच पुढे 'एकदाचा हा सकाळचा शेवटचा चहा ढोसा आणि कामावर चालू पडा म्हणजे मला पुढची कामं सुचतील' असं बजावण्याएवढी बदलत जाते. तिने पुढय़ात आदळलेला चहाचा कप हा जीवनातल्या सगळ्या स्थित्यंतरांचा साक्षीदार असतो.
चहा म्हणजे नुसतं साखर-चहा पावडर घालून उकळवलेलं पाणी नव्हे. ते एक अजब खदखदतं रसायन आहे :). तो उकळेपर्यंत वाट बघावी लागते. मग सगळ्यांनाच तो फुंकून फुंकून प्यावा लागतो. गरम असताना त्याचा एकदम मोठा घोट घेतला तर जीभ भाजते. आयुष्यासारखाच तो कलाकलाने, तब्येतीने घुटके घेत फुंकून प्यावा लागतो. ज्याला हे जमतं तो आयुष्यात सुखी होतो! ;D ;D ;D ;D ;D ;D

Swan


gaurig

chan aahe lekh......ani chaha pan.... :) ;) :D ;D 8)