चारोळी -लेख - "पाउस व धुके"

Started by Atul Kaviraje, June 07, 2021, 11:34:11 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                "पाउस व धुके"
                                -------------

पहाट झाली, पसरले धुके
दाट -पांढरे, झाले क्षितिजही फिके
परी चाहूल लागता पर्जन्याची,
विरले पहाता, हलके-हलके.
====================

     मित्रानो, रोजच्या प्रमाणेच आजही एक सुंदर पहाट मी पाहतोय, सूर्य-नारायणाला भू-वर अवतरायला अजून खूप अवकाश आहे. त्या-आधी निसर्गाने धरेला बहाल केलेली अनेक आश्चर्ये मी गेले कित्येक वर्षे पाहतोय.  नित्याप्रमाणेच, त्या दंव-बिंदू सह तो दाट धुक्याचा पडदा कुठून कोण जाणे पण अवतीर्ण झाल आहे. मागे मी दंव बिंदूवर एक चारोळी रचली होती, आज धुक्यावर हि चारोळी आहे, तर मित्रानो, पहाता पहाता माझ्या नजरेच्या टप्प्यातील ते क्षितीज त्या धुक्याने वेढले गेले. एक जाडसर असा सफेद रंगाचा, पांढऱ्या वर्णाचा असा दाट पडदा त्या क्षितिजाला झाकोळून गेला. इतका कि ते क्षितिजही त्यात स्वतःला हरवून बसले, स्वतःचे अस्तित्त्व गमावून राहिले, मग त्या क्षितिजाच्या कक्षेत येणाऱ्या प्रत्येक गोष्टी  या धुक्याने वेढल्या  गेल्या. जवळ जवळ दृष्टी च्या पार जाऊन पोहोचल्या, त्यांचे नामोनिशाण ही  मिटून गेले . असे ते धुके दिमाखाने त्या क्षितिजावर आपले शुभ्र राज्य करू लागले होते.


क्षितिजही गेले झाकोळून
या धुंद फुंद धुक्यापाठी
स्वतःस बसले हरवून का ?
कि कपाळावर पाडून आठी ?


     असे ते स्वतंत्र क्षितीज , ज्यावर कुणीही आजवर आक्रमण करू शकले नव्हते, जे आजवर अपराजित होते, जे स्वतःच  एक सम्राट होते, त्याचे आज गर्व-हरण झाले होते, ज्या क्षीतीजाने आजवर कित्येक सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त, पहिले होते, ते केवळ एका क्षुल्लकश्या धुक्याने जवळ जवळ भुई सपाट झाल्यासारखे वाटत होते. ते आज पराजित होते, एक वेळ अजेय असणारे ते आज हार मानीत होते, आणी मग त्या क्षिताजाला हि खात्री पटली, कि केवळ एक हाच निसर्ग महान आहे, तो मनात आणले तर कुणाचेही गर्व-हरण एका क्षणात करू शकतो, आज हे धुके माझ्यापेक्षाही सरस ठरले, आपल्या दाट पट्ट्याने त्याने मला अक्षरशः झाकून टाकले, माझे अस्तित्व मिटवून टाकले.


हार मानली मी तुजपुढे
मलाही तू, तुज ताकदीने वेढले
तुझ्या घन अस्तित्त्वाने माझे,
अस्तित्त्व हे असे लोपले.


     आणी असा त्या क्षितीजाचा विचार चालू असता, कुठूनशी वाऱ्याची  झुळूक येऊन तो  पावसाची नांदी घेऊन आला, आणी पहाता पहाता पाउस सुरु हि झाला, प्रथम थोडे थेंब आणी नंतर सरींवर सरी  बरसू लागल्या. मी पाहत होतो, तो समोरल्या क्षितिजावरून असा पुढे इथपर्यंत आला होता, पावसाची सुरुवात तुम्ही कुठूनही  पहा, क्षितीजावरूनच होत असते,  तर असा तो तेथून आला, आणी अचानक मला जाणवले कि तो धुक्याचा दाट पट्टा आता हळू हळू विरळ होत चालला आहे, त्याचे घट्ट-पण, घनत्त्व हळू मिटत जाऊन ते विरत आहे. वातावरणाशी  एकरूप होत आहे, हवेत मिसळत आहे, आणी हलकेच नष्टही होत आहे, त्याचे नामो -निशाणही कुठे मला दिसेना, आणि मगापासूनचे ते हरवलेलं क्षितीज मला पुन्हा गवसले, त्या क्षितीजालाही  आता मोकळे झाल्यासारखे वाटले, पुन्हा ते  सर्व जगाकडे आपल्या अंदाजाने पाहू लागले, आणि नंतर त्याला कळले या धुक्याला परतवायला कारणीभूत हा पाउसच  आहे, त्याच्या आगमनाने ते धुके कुठच्या कुठे नाहीसे झाले आहे, मला त्याने मोकळे केले आहे, या पावसाचे आभार मानावे तेवढे थोडेच . तो महा-शक्तिमान आहे, सर्व-शक्तिमान आहे, त्याला काहीही अशक्य नाही, तो काहीही करू शकतो.


सर्व -शक्तिमान आहे तो
त्याचे पडणे नुसते पडणे नाही
अमंगलाचे मंगल करतो तो,
त्याला काहीही अशक्य नाही.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.06.2021-सोमवार.