पाऊस-धबधबा कविता - " फेसाळता जलप्रपात वहातो खांद्यांवरुनी "

Started by Atul Kaviraje, June 13, 2021, 05:33:32 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     प्रस्तुत कविता ही पावसाशीच संबंधित आहे. कविता-संकल्पना अशी की, भरपूर पाउस पडल्यावर, नदी - नाले, सागर, तलाव जसे तुडुंब भरतात, तसेच, जल-प्रपातासही ( धबधबा) एक नवे रूप प्राप्त होते. आपण सर्वांनी फेसाळता धबधबा उंच पहाडावरून किंवा डोंगर रांगांवरून रोरावत खाली धरणीवर पडताना  पावसाच्या दिवसांत पाहिला असेलच. तर असा हा धबधबा माथ्यावर धारण करणारा, अंगी - खांदी खेळविणारा डोंगर, किंवा पहाड, हा एक दैवी स्वरूप असलेला असा अजानुबाहूच मला भासतो.

     धबधबा डोंगरावरून कोसळताना मंत्र-मुग्ध होऊन, एकटक फक्त पहातच राहावं, इतके ते दृश्य जादूमय असत, इतकं विस्तीर्ण की, नजरेत तो बांधता येत नाही, इतका विशाल की, नजर ठरत नाही. शुभ्र दुग्धासम त्याचे फेसाळते पाणी, व पडताना येणारा तो घन-गंभीर आवाज,तन - मन  मोहून टाकतो, तल्लीन करतो. तर अश्या धबधब्यास अंगावर, खांद्यावर खेळवणाऱ्या या डोंगराची, पहाडाची एक वेगळी, अतर्क्य कविता ऐकवितो. माझ्या कवितेचे शीर्षक आहे- " फेसाळता जलप्रपात वहातो खांद्यांवरुनी "

                        पाऊस-धबधबा कविता
               " फेसाळता जलप्रपात वहातो खांद्यांवरुनी "
               ------------------------------------


विसरुनी स्वतःस रहावे पहात
निसर्गाचे रूप साठवावे डोळ्यांत
जणू शुभ्र-दुग्धची ओतले महाघटातुनी,
फेसाळता जलप्रपात वहातो खांद्यांवरुनी.

     उंच पहाडाचे अतिविशाल पौरुष
     घनघोर गर्जत  बलशाली बाहुतून
     काळ्याकभिन्न कातळात जातो सामावूनी,
     फेसाळता जलप्रपात वहातो खांद्यांवरुनी.

होत येथे जीव-शिवाचे मिलन
घन-गंभीर उच्चारांच्या दैवी संगीतात
शिखरास ,आसमंतास साद घालुनी,
फेसाळता जलप्रपात वहातो खांद्यांवरुनी.

     देत शिरशिरी, सपकारे तुषारांचे
     मम भासे गोड-संवेदना शरीरी
     झोकून द्यावे अनंतात या-वास्तवातुनी,
     फेसाळता जलप्रपात वहातो खांद्यांवरुनी.

वाटतं, येथेच थांबावे काल-चक्र
या मरणातच दडलेय जीवन
स्वतःस देत निर्मोही, झोकुनी,
फेसाळता जलप्रपात वहातो खांद्यांवरुनी.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.06.2021-रविवार.