बाप कविता

Started by Ashu C P, June 20, 2021, 02:47:20 PM

Previous topic - Next topic

Ashu C P

बाप

लेका तुला जन्म दिलं माई नं,
बापा नं दिलं नाही.....
पण बापा सारखं प्रेम तुला,
माईनं ही केलं नाही...

दुधावरची साय म्हणायला माईला,
कुणीबी विसरला नाही......
आनं बापाला लंगड्याचा पायही,
कुणी म्हनला नाही....

आयुष्यभर राब-राब-राबला लेका तुझ्यासाठी,
पण प्रेमाने त्याला तू बाप म्हणत नाही...
आनं मोठा होऊन घरी आला नी बापाला म्हनला,
बाप तुला काही कळत नाही.....

लेका तुझं वय वाढलं पण,
बाप होता आलं नाही.....
जिवंत पणी त्या बापाला,
पाणी पाजलं नाही...

लेका तुला तुझ्या बापाचं प्रेम,
कधीच कळलं नाही...
पण बाप सोडून गेल्यावर सांग लेका,
तु रडलं नाही...

बाप गेल्यावरच कळतो रे लेका सर्वांना,
जिवंत पणी तो कधीच कळत नाही.....
लेका त्या बापा सारखा माणूस,
दुसरा शोधून मिळत नाही......

✍️आशु छाया प्रमोद
📲 7820994118

Atul Kaviraje

     आशु छाया प्रमोद - सर/मॅडम जी,

     आज वडील-दिवस (फादर्स डे) च्या निमित्ताने बापावर (वडिलांवर ) एक चांगली कविता आपणाकडून वाचण्यास मिळाली.  " बाप ",  या कवितेतून, आपण वडील या व्यक्तीचे एक सुंदर चित्रण केले आहे. साधारणतः मुलांचा ओढा हा आपल्या आईकडे जास्त असतो. त्यांना फक्त आईचा त्याग, प्रेम, ममता दिसून येतात, परंतु वडिलांकडे त्यांचे कळत नकळत दुर्लक्षच होत असते.

     वडीलही आपल्या   मुलांसाठी त्याग करीत असतात, पण ते हे बोलून कधीच दाखवीत नाहीत, त्यांचेही आपल्या मुलांवर निरामय प्रेम असते, पण ते हे उघडपणे जाहीर करत नाहीत, सरतेशेवटी मुलांना आई ही जवळची व वडील हे कधी कधी परके भासू लागतात. परंतु खरी परिस्थिती वेगळीच असते. आई ही प्रसंगी भावनाविवश होऊन रडते देखील, पण वडिलांना मात्र आपले अश्रू दाखविता येत नाहीत, त्यांना कठोर व्हावे लागते, परंतु ते देखील रडत असतात , मनातल्या मनात.

      आपण, आपल्या या भावना-विवश करणाऱ्या कवितेतून पुन्हा एकदा वडिलांची आठवण करून दिलीत, याबद्दल आपले आभार.

     नाही उमजली माया बापाची
     नाही कळले प्रेम आम्हा
     उशाशी बसून रात्रभर जागत होता,
     आजारी पडून होतो अंथरुणावर जेव्हा.

     शाळेची फी भरणारा बापच होता
     सहलीला पैसे देणारा बापच होता
     सकाळी सकाळी जाग येण्या पूर्वीच,
     नोकरीस निघून जाणारा बापच होता.

     माया फक्त आईचीच दिसली
     ममता फक्त तिच्यातच जाणवली
     पण प्रेम बापाच्या हृदयातले,
     त्याने फक्त हृदयातच ठेवले.

     आजच्या या दिनी मंगल
     आठवण त्यांची येऊन राहिलीय
     नकळत पापण्या ओलावताहेत माझ्या,
     डोळयांपुढे मूर्ती उभी राहिलीय.

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-२०.०६.२०२१-रविवार.