" शाही स्नान की रोगांचे स्थान ?"

Started by Atul Kaviraje, June 20, 2021, 11:21:52 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आपल्या देशात, दर बारा वर्षांनी भरणाऱ्या कुंभ-मेळ्याबद्दल आपण सर्वांनी ऐकले असेलच. दर बारा वर्षांनी भरणारा हा कुंभ-मेळा माझ्या माहितीप्रमाणे, देशात एकूण चार ठिकाणी भरतो. माझी प्रस्तुत कविता ही नाशिक कुंभ-मेळ्याची आहे. काहीशी अंध-श्रद्धेवर प्रकाश-झोत टाकणारी ही कविता आहे.

     पुण्य पदरी पडावे, म्हणून भाविकांची अलोट गर्दी येथे होते, लाखोंनी भाविक  येथे शाही किंवा पवित्र स्नानास नदीवर येतात. असं केल्याने त्यांचे पाप - क्षालन होऊन मुक्ती मिळते, असा त्यांचा समज आहे. परंतु मित्रानो, हे कितपत खरं आहे ? खरोखर त्यांना पुण्य मिळून, ते पवित्र होतात, की त्यांच्या शाही स्नानामुळे हे नदीचे पाणीच अपवित्र होते. जास्त काही पाल्हाळ न लावता, ऐकुया तर कविता. माझ्या कवितेचे शीर्षक आहे-" शाही स्नान की रोगांचे स्थान ?"

                     अंध-श्रद्धेवर प्रकाश-झोत टाकणारी कविता
                          " शाही स्नान की रोगांचे स्थान ?"
                     ------------------------------------

भाविकांची उसळलीय गर्दी पुण्यस्थानी
येई ऐसा योग एका तपातुनी
सिंहस्थाच्या शुभ-मुहूर्ती शाही-स्नान घेण्या,
पुण्यक्षेत्र नाशिकी, आलेत ते लाखानी.

     ऐसे केल्याने पुण्य लाभते
     जन्मोजन्मीचे भोग, पाप सरते
     कुंडातील स्नानाने शरीर होई पवित्र,
     आत्म्याचे तेज पसरेल सर्वत्र.

नकळे तयांना, या अंध-भक्तांना
श्रद्धा असावी, पण अंध-श्रद्धा नसावी
मोक्ष कधी गवसलाय का ?
नुसत्या पाण्यात डुबकी मारुनी !

     अनेक रोगांपासून, अनंत यातनांतून
     मुक्ती मिळण्या, रोगी येई स्नाना
     पवित्र जल राहील का पवित्र ?
     रोग-राई नाही का पसरणार सर्वत्र !

पुण्य-स्थान झालयं आज रोगाचे स्थान
भ्रष्ट करतंय त्याला शाही स्नान
पण अंध-श्रद्धेपुढे कुणाचे काय चालणार ?
अशी कित्येक क्षेत्रे अपवित्रच होणार !

-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.06.2021-रविवार.