नवल कविता-"अनोखा उपहार वधू-वरांचा,आमंत्रितांस देती अहेर रोपांचा"

Started by Atul Kaviraje, June 22, 2021, 11:24:22 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,
   
     मागे एक अगदी वेगळीच बातमी ऐकण्यात आली होती कि, एका लग्नात वधू वरानी , स्वतः अहेर न घेता,  त्यांनीच सर्व आमंत्रितांना एक अनोखा अहेर दिला होता. तो म्हणजे त्यांनी साऱ्या वऱ्हाडीसहित इतर जणांना रोपांचे वाटप केले होते. न भूतो, घडलेली ही तर एक आगळीच लग्न गोष्ट होती. रोपांचे वाटप करून त्यांनी फक्त अभिनव उपक्रमच राबविला नव्हता, तर निसर्गाचा समतोलही साधण्यास एक प्रकारे मदतच केली  होती.

     झाडे लावा, झाडे वाढवा आणि झाडे वाचवा ,या मूल-मंत्राचे ते एक कट्टर पुरस्कर्ते आहेत, यात शंकाच नाही. त्यांनी जे महान काम केलंय, त्यास सीमा नाही. त्यास तोड नाही, समाजासमोर एक उत्तम उदाहरणच त्यांनी घालून दिलंय, असं म्हणायलाहि  हरकत नाही. आपणही असं काहीतरी अनोखे समाज कार्य करून दाखवावयास हवं की ज्यामुळे, त्याचा समाजाला फायदाच होईल. प्रस्तुत कविता ही याच अनोख्या विषयावर स्फुरली आहे. ऐकुया तर, ही आगळी-वेगळी, दीर्घ कहाणीरूपी, सोप्या शब्दांतली कविता, कवितेचे शीर्षक आहे - "अनोखा उपहार वधू-वरांचा,आमंत्रितांस देती अहेर रोपांचा"

                           नवल कविता

     "अनोखा उपहार वधू-वरांचा,आमंत्रितांस देती अहेर रोपांचा"
     --------------------------------------------------

लग्न करा, सुखाने नांदा
खरा मंत्र हा संसाराचा
सोबती असावा हा मित्रासम,
तरच होईल संसार सुखाचा.

लग्नात ओळखीस वधू-वरांच्या
स्टेजवर अख्खी रांग लागलीय
साऱ्यांच्या हाती सजलीत पाकिटे,
अहेर देण्यास रीघ लागलीय.

परि इथे उलटीच तऱ्हा
करवली हसतेय घेऊन कऱ्हा
नवं-दाम्पत्यास नकोय अहेर-बिहेर,
त्यांनी तसं केलयं जाहीर.

कुंडीतील रोपांनी स्टेज सजलंय
नाना-विध रोपांच्या जातींनी बहरलंय
प्रत्येकास वधू-वरांकडून भेट-बक्षीस अनोखे,
न येणारे झालेत त्यास पारखे.

वर-वधू देती रोपांचा अहेर
सांगुनी साऱ्यांस रोपे लावा घरा-बाहेर
अंगण सजवा तुम्ही फळा-फुलांनी,
घर भरेल तुमचं मुलां-बाळांनी.

नवीन मंत्र देऊन त्यांनी
आपले लग्न सफल केले
रोपांचे वाटप करुनी सर्वां,
अनोख्या अहेराने तृप्त केले.

कल्याण असो त्या नवं-दाम्पत्यांचे
त्यांनी निसर्गाचं भान राखले
अभिनव शक्कल योजून त्यांनी,
निसर्गाशी एक नातेच जोडले.

आगळ्या अहेराने वऱ्हाडी आनंदले
नवं-दाम्पत्यांस त्यांनी शुभाशिष दिले
नवरा-नवरीच्या चेहऱ्यावर तेज लागले दिसू,
कुंड्यांतील रोपेही लागली होती हसू.

झाडे लावा, झाडे वाढवा
आजच्या युगाचा नवीन मंत्र
या लग्ना-निमित्ते आपण सर्वानी जपूया,
अन या रोपांचे स्वहस्ते रोपण करूया.

लग्नसराई आज बहरली होती
नवरा-नवरी आज कृत-कृत्य होती
काहीतरी दिल्याचे होते समाधान,
निसर्गाचा त्यांनी ठेवला होता मान.

अभिनव संकल्पना पुढती याव्यात
निमित्त असावे तसे कोणतेही
निसर्गाचा समतोल राखण्या सर्वांनी,
प्रयोगशील व्हावे, जाणून कर्तव्यही. 


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.06.2021-मंगळवार.