राईस बीअरचा उतारा!

Started by Swan, March 16, 2010, 01:38:42 PM

Previous topic - Next topic

Swan


'बबऱ्या चक्कीत चालतोस काय?'
काल सांजच्याला दोस्तानं इचारलं आन् म्या बावचळून गेलो. च्यायला ह्य़ो लायब्रीत जान्याचा, दोन-चार बुकं हानन्याचा टाईम आन् आशा टायमाला यखांदा लिडर मानूस डायरेक्ट चक्कीत जायचं म्हनू लागल्यावर तं मानूस झीट येवूनच पडायचा. स्सालं यवडं परिवर्तन? पन म्हन्नार काय? म्या कवतूक करीत म्हन्लं,
'दोस्ता, तू लैच फॅमिलीयर झालास मान्सा.'
'कसं काय?'
'चक्कीत जायचं म्हन्तोस म्हंजे लैच झालं.'
'त्यात काय? कवाकवा जातोच मानूस चक्कीत.'
'म्या तं कंदी बगितलं न्हाई. वैनी न्हाईत का काय?'
'हाये ना. कामून?'
'बिमारैत का काय मंग?'
'न्हाई. कामून?'
'त्यांनी कसं काय परमीशन दिली तुला चक्कीत जायला?'
'बायलीला इचारून चक्कीत जातेत का बबऱ्या?'
'आरं पन वैनी सोता जात आस्तीन ना चक्कीत?'
माझ्या प्रश्नावर पैल्यांदा तं त्यो फिदीफिदी हासला. नंतरच्याला डोळे मोठे करीत म्हन्ला,
'बबऱ्या, फुकन्या जरा संभाळून बोलत जाय. दुसऱ्या कोनाला आसं इचारशील तं थोबाड रंगवून काडतीन.'
'कामून? म्या काय वंगाळ इचारलं?'
'धुतरीच्या, आपल्याकडं बया कंदी चक्कीत जातेत का?'
'मंग दळण का आपूण आणतो का काय?'
म्या इचारलं तसा त्यो आजूक जोऱ्यानं हासला, म्हन्ला,
'बबऱ्या, स्सालं तुझ्या डोस्क्यात फकस्त दळणच कसं बसलं हाये? आरं एखांदी गोष्ट जवा निस्ती खाण्याची न ऱ्हाता पिण्याचीबी व्हवून जाती तवा चक्कीचाबी आर्थ बदलणार का न्हाई?'
लागलीच माझी टय़ूब पेटली आन् म्या म्हन्लं,
'..इन द सेन्स, बारचक्की?'
त्यानंबी लागलीच टाळी दिली. म्याबी नंतर त्याला 'चक्की'च्या कोडवर्डचं पेटंट देऊन टाकले आन् ह्य़ेच्यापुडं साऱ्या लायब्रऱ्या चक्कीत ट्रान्सफर करन्याचं आश्वासनबी दिलं.
पन यवडय़ानं सारं संपत नस्तं. त्यानं ह्य़ो सब्जेक्ट काडला म्हंजे त्याच्या डोस्क्यात जबरा कायतरी आसनार.
आमी मंग लायब्रीत गेलो, बसलो. म्या निस्ताच बसलो, दोस्तानं जराशीक घितली. भायेर हीव पडलं व्हतं. आंगं गारठून गेलं व्हतं. आमी मंग बाजरीच्या भाकरी आन् मटनरस्सा मागितला. जबरा टेस्ट व्हती. मंग आमी आजूक यक-यक भाकर मागवली तं वेटर किचनमंदी जावून रिटर्न आला आन् म्हन्ला,म्
'सायेब, बाजरीची भाकर खतम झाली. जवारी चालन का?'
फुकनीचं बेत जबरा व्हता. बाजरीची भाकर रश्श्यामंदी चुरून जबरा लागत व्हती आन् त्याच टायमाला ह्य़ेच्याकडल्या भाकरी संपाव म्हंजे काय? दोस्तानं त्याला पुन्यांदा चक्कर हाणायला पाठीवलं तसं त्यो म्हन्ला,
'भऊ, बाया गेल्या. आता भाकर करणारं कुणीच न्हाई. जवारीच्या रेडी हायेत. अध्र्या घंटय़ात त्याबी खतम व्हतीन.'
म्या दोस्ताला म्हन्लं,
'दोस्ता, जावूंदे. जवारी तं जवारी. फुकनीचं त्याबी संपल्या तं तंदूर चावत बसावं लागेल.'
दोस्त म्हन्ला, 'बिलकुल न्हाई. बाजरीच्या भाकरी संपल्या आस्तीन तं आपलं जेवणबी इथंच स्टॉप करू.'
वेटरवर दबाव आणण्याचा दोस्ताचा प्लॅन आसनार म्हनून म्या गप ऱ्हायलो. वेटरबी गप ऱ्हायला. त्यो टस की मस हालला न्हाई आन् त्यानं काई कॉमेंटबी केली न्हाई. दोस्ताची पोजीशन आता आवगड झाली. म्या म्हन्लं.
'दोस्ता, आसं हाटून बसूने, दुसऱ्याचा तं इचार करावा.'
'बबऱ्या तुझा इचार करूनच म्या ह्य़ो डिसीजन घितला.'
'कामून? जवारी डसती काय मला?'
'बबऱ्या, कसं आस्तय, व्हिस्कीवर रम, रमवर व्होडका आसं करता येत नस्तं. कॉकटेल झालं की, मंग फुकनीचं इज्जतीचा बुकना वाजतो. सकाळच्याला डोस्कं धरतं, वान्त्या व्हतेत. घरामंदी पचका व्हतो. म्हणून मान्सानं यकदा जो ब्रँड घेतला, त्यो बदलला न्हाई पायजेल.'
'..पन दोस्ता.. न पिताच कॉकटेल?'
'बबऱ्या, त्येचं तं सांगून ऱ्हायलोय. फकस्त पिलेल्याच मान्साला कॉकटेल व्हन्याचे दिवस गेले आता. आरं, सांप्रतला बाजरीवर जवारीबी डेंजरस झाली हाये. त्यांना पैल्यावानी निस्तं धान्य म्हनून ट्रीट न्हाई करता येत. ते आता ब्रँड झाले हायेत. आन् म्हनून म्हन्तो, दोन आल्लग ब्रँड यकाच टायमाला म्हंजे कॉकटेल! मग वान्त्या, डोस्कं धरणं.. हँगओव्हर.'
आता म्या च्याटच झालो. स्सालं जवारी, बाजरी, मकाचा सब्जेक्ट आसा कन्टीन्यू त्याच्या डोक्यात दांगोडा घालत व्हता. यखांदा सब्जेक्ट मान्साच्या आत आसा रुतून बसला की मानूस पुनपुन्यांदा त्याच्याभवतीच फिरत ऱ्हातो आन् आल्लग आल्लग स्टाईलमंदी आळवत ऱ्हातो. आशा टायमाला पिलेला मानूस लयच प्रतिभाशाली आस्तो, त्याला न्यू किरिंग पॉइंट सुचत आस्तेत, त्याची कन्व्हिंसिंग पावरबी लै वाडलेली आस्ती. पानटपरीच्या साईडला बिडीसिगारेटचे थोटकं सापडल्यावानी त्याला लॉजिक सापडत आस्तं.
पैली गोष्ट म्हंजे आशा मान्साला त्याची दुखती रग भायेर काडन्यासाठी उचकवावं लागतं. यकदा त्यो राग भायेर निंगला की मंग त्याला रिलॅक्स करणं इंपॉर्टेड आस्तं, न्हाय तं त्यो आजूक थर्टी-सिक्स्टी मागवण्याची भीती आस्ती. नंतरची थर्टी-सिक्स्टी तं सगळंच पांगवून टाकत आस्ती. दारू जवा टॉपपरेंत, म्हंजे तिच्या औकातीच्या टोकापरेंत चडलेली आस्ती आन् आता काई टायमात तिच्या उतरन्याला सुरवात व्हनार आस्ती आशा कळसावर मानूस मंग ओरिजनल सब्जेक्टला हात घालत आस्तो. त्यो पिनाऱ्यातला कितीबी भाद्दर आन् कितीबी कंट्रोलवाला आसो आशा टायमाला त्यो पाघळतोच.
मंग म्या हाशीमजाकमंदला मूड आन्ला आन् म्हन्लं,
'दोस्ता, यवडा पिन्यातला भाद्दर मानूस तू. आन् तुला आसल्या कॉकटेलवरचा उताराबी म्हाईत न्हाई?'
'कसला?' त्यानं चमकून इचारलं.
तसं म्या म्हन्लं, 'दोस्ता, सिम्पल हाये, आसं कॉकटेल झालं की, सकाळच्याला 'राईस बीअर' हाणायची. पंधरा मिनिटांत ओके! डोस्कंबी उतरतं आन् मानूस यकदम फ्रेश व्हतो.'
दोस्त आता भांबावल्यावानी झाला. कसंनुसं हास्ला.
म्हन्ला,
'बबऱ्या आता ह्य़े नवं खुळ कुठलं? जवारी, बाजरीच्या दारूवर राईस बीअरचा उतारा? ह्य़े राईस बीअरचं कुठून काढलंस? का तसंबी डिसीजन घितलं सरकारनं?'
'आजूक घेतलं न्हाई, पन घितीन यकदिशी.'
'फुकनीच्या मनाचं हाणून ऱ्हायलास काय? आशी कुठं बीअर आस्ती का?'
म्या मंग त्याला ताकावानी दिसनाऱ्या राईस बीअरची गोष्ट सांगितली. घरामंदीच ती कशी काडतात, बांबूमंदून गिलासात वतून घिताना कसं फिल व्हतं एक्सेट्रा एक्सेट्रा. त्यो भयानच झाला आन् मंग डायरेक्ट मेन सब्जेक्टला हात घालत त्यानं मला इचारलं,
'बबऱ्या, तू कोन्त्या साईडचा हायेस?'
म्या जरासाक पॉज घितला आन् त्याला इचारलं,
'दोस्ता, जवारी, बाजरीच्या दारूचा शोध लावणारे मोठे की त्यातलं जादा माल देणारं वाण शोधून काडणारे मोठे?'
माझ्या प्रश्नावर त्यो ट्रान्समंदी गेल्यावानी झाला. त्याला काईच फिक्स करता येईना. मंग म्या त्याला म्हन्लं,
'दोस्ता, पिनाऱ्यानं आशा गोष्टीत कंदीच पडूने, दारू कशापासून बनती, तशी बनावी का न्हाई? भूक इंपर्ॉटट की तल्लफ? ह्य़ाचं कंदी टेन्शन घिवूने. आशे इश्यू येतेत, आपल्याला दोनीबी मतं पटतेत. कवा ह्य़ा तं कवा त्या साईडनं आपन झुकत जातो. नंतर तं ते कोनाच्या फायद्याचं सांगितलं जातं आन् डेफिनेट कोनाला फायदा व्हनार आस्तो ह्य़ेबी आपल्याला कळत न्हाई. डोस्क्याचा पार भुगा व्हतो आन् मंग दोनेक पेग हाणल्याबगर आपन शांत व्हत न्हाई.'
'बबऱ्या, मंग काय आपन ब्लँक ऱ्हायचं?'
'न्हाय. प्रश्न  तं पडलेच पायजेत. भाकरी फिरवली न्हाई की ती करपती, प्रश्न नसले की आपन करपतो.'
'मंग आपल्याला कोन्ते प्रश्न पडले पायजेत?'
'दोस्ता, आशा टायमाला आपली थिंकिंग लाईन टर्न करायची. फोकस बदलायचा. सपोर्ट की आपोज आशा कोन्त्याच पारडय़ात बसायचं न्हाई. फकस्त टेस्टचा इचार करायचा. स्सालं कशी लागत आसंन ही दारू? म्हंजे बाजरीचा स्मेल कसा आसंन? जवारीची चव कशी आसंन आन् मक्याची कितीला पडंन? कोन्ती जादा लवकर चडत आसंन? क्वार्टरचा भाव काय आन् यकदम खंबा घितला तं त्यात किती डिस्काऊंट बसंन? ह्य़ा दारूमंदी काय मिक्स करायचं? म्हंजे ह्य़ा दारूचं कॉम्बीनेशन काय आस्लं पायजेल? ह्य़ेंच्यासंग स्नॅक्स काय चांगलं लागत आसंन? शिळ्या भाकरीला जशी चव लागती तशी शिळ्या दारूलाबी जबरा टेस्ट असनार की ती इंस्टंट पैल्या धारेची पिण्याला मजा येत असणार? एक्सेट्रा एक्सेट्रा प्रश्न पडले पायजेत.'
दोस्तानं सारं आयकून घितलं. जरा टाईम त्यो काईच बोलला न्हाई. मंग जरासाक तंबाखूचा बार लावत त्याने दोन पिचकाऱ्या मारल्या. मंग इराकतीला जावून आला. त्याला जरा हुशारी आली. मंग त्यानं मला यक किस्सा सांगितला.
'तं बबऱ्या, तवा म्या शाळात व्हतो. माझा यक दोस्त व्हता. त्याचा घाणा व्हता. आमच्याकडं करडी झाली, भुईमूग झाला की त्यातला काई आमी त्यांच्याकडं देयाची आन् घरच्यापुरतं तेल काढून आणायचो.'
'दोस्ता तुला काय वाटतं, हरभऱ्याचे फुटाणे, जवारीच्या लाह्य़ा आपन प्रायव्हेटमंदी काडून आणतो तसं आपले पोरं दारू गाळून आणतीन?' त्याच्या किश्श्याची लाईन लागलीच ध्यानात येवून म्या इचारलं.
'तसं न्हाई बबऱ्या, पुडचं आईक.' आसं म्हनत त्यो पुडं म्हन्ला, 'तं यकदा मंग आमच्या डोस्क्यात भानगड आली. घाण्यावाल्या दोस्ताचा बाप कुठं पाव्हन्याकडं गेला व्हता, तवा ही आयडिया करून बगितली. म्या त्येला गुपचीत भुईमूग आनून दिले, त्यानं त्याचा तेलात हिशेब केला आन् ते तेल आमी दुकानदाराला कमी रेटमंदी इकून त्याच्यात ऐश केली. म्या भुईमुगाचं घरी बोलायचं न्हाई आन् त्यानं तेल काडल्याचं बोलायचं न्हाई आसं आमचं अंडरस्टँडिंग व्हतं. पन स्सालं नंतरच्याला त्याचा पर्दाफाश झाला आन् आमच्या दोगायचीबी बापानं पाठ सोलून काडली.'
म्या काईच बोललो न्हाई. कारन त्यात चोट्टय़ा धंद्यापेक्षा पकडल्या गेल्याचंच दु:ख जादा व्हतं.
पुडं चालून पोरं 'दळणाला चाल्लो' आसं सांगून प्रायव्हेटमंदी दारू गाळून आणणार, सालभराच्या स्टॉकमंदले घमलेच्या घमेले तिकडे जाणार. चौकाचौकात पोलीस झडती घेणार. दळणाला जाणारा 'दारू गाळायलाच चालला व्हता' म्हनून पकडला जाणार. त्याला मंग पुरावे द्यावे लागनार. केस चालणार. तवर लोक माल पोलिसात जमा व्हनार. केसचा निकाल लागेपरेंत त्या दळणाचं गाळण्यात रूपांतर झालेलं आस्नार! आशे काय तरी आर्काट प्रश्न दोस्ताच्या डोस्क्यात आता दांगोडा घालत आसनार. काय सांगावं आसं व्हईलबी. कारन ज्या गोष्टी फॅन्टसी वाटतेत, त्या प्रत्यक्षामंदी येन्याचे चान्सेस सांप्रतला वाढत चालले हायेत.
(ता.क.-नाईंटी पर्सेट मराठी मान्सं दारू चढल्यावर इंग्लिश स्टार्ट करतेत. आसं कामून? त्यांना गिल्टी फिलिंग आस्तं? त्यांना एक्स्प्रेस व्हन्याला ती भाषा जवळची वाटत आस्ती? की मराठीचं पावित्र्य ऱ्हावं म्हनून ते आशा टायमाला दुसरी लँग्वेज वापरतात? स्सालं फ्यूचरमंदी बाजरी, जवारची दारू पॉप्युलर झाली, चांगली कीक मारू लागली तं तवा लोक कोन्ती लँग्वेज बोलतीन? सपोज इंग्लिशच बोलले तं आपला ह्य़ा आशा दारूला आपोज हाये आन् सपोज ते ओरिजनल लँग्वेजमंदी बोलू लागले ते आपला ह्य़ा दारूला फुल सपोर्ट हाये. सपोर्ट आन् आपोजच आपलं यवडं सोपं मॅथेमॅटिक्स हाये. जादा झंझट न्हाई, डिस्कशन न्हाई.)

बब्रूवान रुद्रकंठावार


gaurig