कृष्ण-कृत्य वास्तव कविता-" बांधकामे अनधिकृत, कंत्राटदारांना स्वीकृत "

Started by Atul Kaviraje, July 10, 2021, 01:55:43 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     आज काल आपण पाहतो, की नवीन इमारती बांधल्या जातात, नवे पूल बांधले जातात, पण ते किती काळ टिकतात ? काही वर्षांनी ते धडाधड  कोसळल्याचे दिसून येते. या सर्वाला जबाबदार कोण? बांधकाम कंत्राटदार, बांधकाम खाते अधिकारी, की आणि कोण ? सिमेंट भेसळ, रेती भेसळ आणि कित्येक भेसळी, होऊन इमारती जमीनदोस्त नाही झाल्या तर त्यात नवल ते काय. पक्के बांधकाम आज कुठेच नजरेत येत नाहीय. अश्या अनाधिकृत बांधकामाचे पीक आज खूपच फोफावतंय.


     मित्रानो, हे कुठवर चालणार, या अनाधिकृत इमारतीत वस्तीस असणाऱ्या आमच्या तुमच्यासारख्या सामान्यांचाच फक्त जीव जाणार. या मोठ्यांना काय पडलंय त्याचे ? इथे छोटेच बळी जाताहेत. कुठेतरी यास खीळ बसणं गरजेचं आहे. भ्रष्टाचार ,या क्षेत्रातील वेळीच थांबवला नाही गेला, तर यापुढेही अनेक गरिबांचे नाहक बळी जातील. ऐकुया तर या वास्तवतेवर एक, अंगावर काटा आणणारी गंभीर, कृष्ण दुनियेतील, कृष्ण कविता. कवितेचे शीर्षक आहे-" बांधकामे अनाधिकृत, कंत्राटदारांना स्वीकृत "


                   कृष्ण-कृत्य वास्तव कविता
         " बांधकामे अनाधिकृत, कंत्राटदारांना स्वीकृत "
       ------------------------------------------


हप्त्या -हप्त्याने घ्या, पैसे गुंतवा
हक्काचे अपुल्या घर बांधा
हमी देतात कंत्राटदार बिनदिक्कत,
पण त्यांच्या इमारती नाहीत टिकत.

     सिमेंट खाती, रेती खाती
     भेसळीच्या मालाचे भरपूर पैसे खाती
     खाऊन फुगलीत त्यांच्या बँकांतील खाती,
     खातानाही नाही पहात कोणतीच नाती-गोती.

अधिकृत बांधकामाचे अनाधिकृत लायसेन्स ?
बांधकामाचा आधीच नसतो सेन्स
या खात्यातही चाललाय भ्रष्टाचार,
अभियंता, प्युन अन गुंतलेत ऑफिसर चार.

     सामान्य गुंतवणूक करून फसतो
     पुढल्याच वर्षी, कपाळाला हात लावून बसतो
     धडाधड कोसळतात अनाधिकृत इमारती,
     कमावलेल्या साऱ्या पैशांची होते डोळ्यांदेखत माती.

कधी संपणार हे षडयंत्र ?
केव्हा सुधारणार इमारत बांधणीचे तंत्र ?
अनाधिकृत कंत्राटदारांना व्हावी कडक शिक्षा,
जेणेकरून मागावी लागेल त्यांना भिक्षा.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-10.07.2021-शनिवार.