कोरोना - वास्तव - कविता -"शाळेची घंटा पुन्हा वाजणार,मुलांची पाऊले शाळेकडे वळणार"

Started by Atul Kaviraje, July 14, 2021, 11:18:21 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील हि एक कविता. कोरोनाचा कहर सर्वत्र होऊन सरकारला नाईलाजाने देशभर, बंदी आणणे भाग पडले होते. यातून सर्व उद्योग-धंदे, सरकारी कचेरी, दुकाने, शाळा आणि अनेक संस्थाही अंतर्भूत होत्या. दरम्यान एक बातमी ऐकण्यात आली होती कि, कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्यावर जी तिसरी लाट येणार आहे, त्यामध्ये लहान मुलांना धोका आहे. त्यामुळे सरकारने पुन्हा एकदा सुरु होणाऱ्या शाळांवर पुन्हा एकदा नव्याने बंदी आणली होती.

     पण आता एक समाधानाची बातमी कळली आहे. कि नवीन सर्व्हे प्रमाणे लहान मुलांना या कोरोनाचा एवढा धोका नाही, ज्याची आपणास भीती वाटत होती. या पार्श्वभूमीवर सरकारने पुन्हा एकदा शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचे यापुढे नुकसान होऊन नये. अर्थात सर्व महत्त्वाचे नियम पाळूनच.

          या दरम्यान सर्व शाळा बंद होऊन, तिची द्वारे पुन्हा या मुलांच्या पावलांची वाट पाहत होती. शाळेला सर्व कसे ओके बोके वाटत होते. ज्या मुलांची तिला सवय होती,  मुलांच्या खेळण्या बागडण्याचे आवाज जे तिने तेव्हा ऐकले होते, ते तिला पुन्हा ऐकावेसे वाटत होते. तिची घंटा, कार्यरत नसल्यामुळे पूर्णपणे शांत होती, निस्तब्ध होती, गंजून गेली होती. तिची घणघण थांबली होती. पण जेव्हा तिला हे वृत्त कळले कि हि मुले पुन्हा एकदा शाळेत येणार आहे, तेव्हा ती अतिशय आनंदून गेली होती, तिचा उत्साह द्विगुणित झाला होता. मित्रानो, या सर्व एकंदर परिस्थितीत शाळेला काय वाटतंय. ऐकुया तर या विषयावर शाळेच्या मनाची  व्यथा, तिच्याच शब्दांत, तिच्या मनोगतात, कवितेच्या रूपात. कवितेचे शीर्षक आहे-"शाळेची घंटा पुन्हा वाजणार,मुलांची पाऊले शाळेकडे वळणार"


            कोरोना (विद्यार्थी -शाळा) वास्तव - कविता

   "शाळेची घंटा पुन्हा वाजणार,मुलांची पाऊले शाळेकडे वळणार"
---------------------------------------------------------


मुलांचा उत्साहपूर्ण किलबिलाट, खीलखिलाट   
कधीच झालाय बंद त्यांचा उत्स्फूर्त चिवचिवाट
होती गजबज ,लगबग ऐकू येत, लहानग्यांची,
शाळेस झाली होती सवय या आवाजाची.

शाळा सुन्न होऊन पहात आहे
शाळा खिन्न, उदास -भकास दिसत आहे
कालच्या घंटेची चीर-परिचित घण-घण ,
पुन्हा ऐकण्यास ती उत्सुक आहे.

शोर-शराबा मुलांचा, मैदानावरील आरडा -ओरडा
बे एके बे चा पाढा अन वर्गातल्या मस्करी-छेडया 
मास्तरांच्या छडीचा प्रसाद खाता हळूच मागे,
पुन्हा सुरु झालेल्या  त्या मनस्वी खोड्या.

सारं सारं राहिलंय मागे, गेलंय भूतकाळात
एक नकोशी अशांतता पसरलीय वातावरणात
पाहून जीव कासावीस होतोय शाळेचा,
त्रास होतोय तिला या भकास शांततेचा.

त्या मुलांबरोबर शाळाही होती शिकत
त्यांच्यासवे तीही होती वर्गात रंगात
मुलांच्या असण्यानेच होते तिचे अस्तित्त्व,
त्यांच्या असण्यानेच तिचे होते महत्त्व.

येईल का पुन्हा ऐकू हाक मुलांची ?
पृच्छा करीत होती ती स्वतःशीच
येतील का ते दिन परतुनी एकवार ?
समजूत घालीत होती ती स्वतःच्या मनाचीच.

या कोरोनाच्या विळख्यात सापडलेय मीही
नुकसान झालेय भरपूर अपरिमित माझेही
कधीही बंद न असलेली माझी कवाडे,
परिस्थितीपुढे झालीत ती लाचारही.

विद्यार्थ्यांचा मूळ पाया मी बसविते
त्यांच्यातील सुजाण नागरिक मी घडविते
भविष्य आहे अंधारमय त्या मुलांचे,
भवितव्य काय असेल या देशाचे?

पण अवचित एक नवल घडलेय
शाळेला आज एक खुशीचे वृत्त कळलंय
सुटलीत कोरोनाच्या भयंकर विळख्यातून ही मुले,
शाळा कराव्यात सुरु, सरकारने जाहीर केले.

आज ती आनंदी आहे, खुश आहे
अंगोपांगातून शाळेच्या उत्साह ओसंडत आहे
ती फुलली आहे, ती खुलली आहे,
तिच्या मनाचे पूर्ण समाधान झाले आहे.

घंटेचा तो सुपरिचित ध्वनी पुन्हा ऐकू येणार
ती मुलांची सान -पाऊले पुनः मजकडे परतणार
तो हवा-हवासा बाल आवाज भरून वाहणार,
तृप्त तृप्त त्या चिवचिवाटाने कर्ण माझे होणार.

तिच्या चेहऱ्यावर अनोखे विलसत होते समाधान
उत्साहाचा नवा रंग तिने केला होता परिधान
तिचे डोळे लागले होते, आता फक्त दाराकडे,
पाटी-पुस्तक घेऊन दौडत येणाऱ्या मुलांकडे.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.07.2021-बुधवार.