सहृदय मित्राची हृद्य कविता-"मनाचा कप्पा हलकेच उघडतोय ,आठवणींचा नजराणा घेऊन उमलतो

Started by Atul Kaviraje, July 17, 2021, 07:13:47 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


मित्र/मैत्रिणींनो,

     त्या दिवशी मंडईत खरेदी करण्यास गेलो असता, माझे एक जुने सेवा-निवृत्त स्नेही श्री शरदजी, मला अवचित भेटले. सेवा-निवृत्त होऊन त्यांना तशी बरीच वर्षे लोटली होती. इतक्या वर्षांनी ओळख पटताच, त्या जुन्या  आठवणींना पुन्हा नव्याने उजाळा मिळू लागला. प्रेमळ व्यक्तिमत्त्व, सहृदयी, मन-मिळावू असे हे शरद-भाऊ सगळ्यांच्याच गळ्यातले तेव्हा ताईत बनले होते.आपल्या साध्या सरळ स्वभावाने त्यांनी तेव्हा सर्वांचीच मने जिंकली होती.

          इतक्या वर्षांनी त्यांना मी सहज ओळखू शकलो याचे कारण त्यांच्या शर्टाला खोवलेला एक सुंदर, लाल रंगाचा , मंद सुगंध पसरवणारा, लहानगा गुलाब, जो त्यांची तेच शरद-भाऊ असल्याची ओळख पटवून देत होता.  होय, मित्रांनो, या शरद-भाऊंना गुलाबांचा अतिशय लळा होता. एक दिवस असा त्यांचा गेला नाही , की त्यांच्या शर्टाला ते चीर-परिचित गुलाब-पुष्प खोवलेले नसायचे. शर्ट बदलायचे, पण त्या गुलाबाचा रंग, त्याचा तो दरवळणारा मंद सुगंध, त्याची नजाकत तीच असायची. 

     आणि आज तोच टपोरा गुलाब त्यांच्या त्या न विसरता येणाऱ्या आठवणींची मला प्रकर्षाने आठवण करून देत होता. शरद-भाऊंना त्यांच्या या आयुष्याच्या  दुसऱ्या टप्प्यासाठी मी त्याना पुन्हा एकवार शुभेच्छा दिल्या,व आग्रह केला की, ही जी आवड आपण आजवर जोपासली आहे, तिचा कधीही विसर पडू देऊ नका, व पुन्हा मला तुम्ही भेटाल तेव्हाही हा गुलाब-पुष्प मला पुन्हा एकदा दिसू द्या. असो, मित्रानो, ऐकुया तर शरद-भाऊंच्या आठवणीवरली ही एक मनातून साकारलेली, भावपूर्ण, मैत्रीपूर्ण कविता. कवितेचे शीर्षक आहे-"मनाचा कप्पा हलकेच उघडतोय ,आठवणींचा नजराणा घेऊन उमलतोय."


                            सहृदय मित्राची हृद्य कविता
"मनाचा कप्पा हलकेच उघडतोय ,आठवणींचा नजराणा घेऊन उमलतोय." 
----------------------------------------------------------------


हृदयाच्या कप्प्यात साठल्यात
केव्हातरी त्या गोड आठवणी
आज त्या सांगताहेत साऱ्या,
तुमच्या अंतरातील कहाणी.

पाकळ्या सम गुलाबाच्या
एक एक कप्पा उलगडतोय
अन आठवणीचे पीस घेऊन,
तरंगत बाहेर येतोय.

या मित्रांना आपले हृदगत
केव्हातरी सांगावेसे वाटते
अंतरीच्या भावना दडलेल्या,
मग उघड कराव्याश्या वाटतात.

आज तुमचे हृदय मी
उघडून पहिले आहे
त्यात दडलेले गुपित मी,
शोधून काढले आहे.

त्या नकोश्या काट्यांना
तुम्ही नकळत दूर सारलेत
आणी त्या हव्याश्या सुगंधाला,
तुम्ही पसरत ठेवलेत.

एक लाघवी व्यक्तिमत्त्व
मला तुमच्यात दिसले
लळा लावीत ते आमच्यात,
हळूच मग मिसळले.

असाच गोडवा देत आम्हाला
या गुलाबासम रहा
अशीच उधळण करीत रंगांची,
तुम्ही कायम आमचे व्हा.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.07.2021-शनिवार.