स्त्री-कविता-अन्याय न सहणारी स्त्री-" स्त्रिये, तू हो बेलगाम !"

Started by Atul Kaviraje, July 29, 2021, 01:31:38 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     स्त्री या विषयावर आणि एक कविता, पण थोड्या वेगळ्या संदर्भाने. ती आता अबला नाही राहिली, तर खऱ्या अर्थाने सबला झाली आहे. पायातील पुरोगामी विचारांच्या जखडलेल्या बेड्या आता तिने स्व-बळाने तोडून टाकल्या आहेत. आता तिची ती तेव्हाची पडदा-नशीन मूर्ती राहिलेली नाही, तर कमरेला पदर खोचून ती या रणांगणात उतरली आहे. दुय्यम दर्जाचा लगाम तोडून ती आज पुरुषांच्या बरोबरीने वाटचाल करीत आहे. अन्यायाचा मुकाबला करण्यास प्रसंगी तिने रणचंडिकेचे रूपही धारण केले आहे.

     आज ती स्वतंत्र, बेलगाम, मुक्त विचारांची आहे. सर्व सर्व बंधने झुगारून ती प्रत्येक क्षेत्रात समर्थपणे काम करीत आहे. मित्रानो, अश्या या स्त्रीस माझा मनोमन नमस्कार. ऐकुया तर या स्वतंत्र स्त्री वरील एक वेगळीच, तिच्या अधिकार-प्राप्तीची कविता, ज्वलंत शब्दांत. कवितेचे शीर्षक आहे-" स्त्रिये, तू हो बेलगाम !"


                      स्त्री-कविता ( कविता क्रमांक -2 )
                          अन्याय न सहणारी स्त्री
                         " स्त्रिये, तू हो बेलगाम !"
                     -------------------------------


हो धुंद, हो बेबंद, हो एकसंध,हो स्वच्छंद
तोड तुझ्या पायांतील जखडलेल्या बेड्या
अबलेची आता सबला तू आहेस,
दाखवून दे समाजास या वेड्या !

     पडदानशीन मूर्ती होती तुझी तेव्हाची
     दूर सार, ही पटलं, झापडे त्यांच्या डोळ्यांवरची
     येऊ दे जाग, समाजास खडबडून,
     अस्त्र घे हाती असे, तयांसी घाम फुटू दे दरदरून !

आसूडांचे वण उमटू दे तयांच्या रक्तबंबाळ पाठींवर
येऊ दे लखलखत्या तलवारीसम शब्दाला धार
आक्रंदणाऱ्या मनास सुप्त, येऊ दे जागर,
मनः शक्ती सामर्थ्याने, तू नव्हत्याचे होते कर !

     लगाम होता आजवरी जो, तू दूर झुगार
     खेळ एकदाच आता तू, आयुष्याचा जुगार
     बंडखोर मनाच्या गाभाऱ्यातून येऊ दे तीव्र हुंकार,
     जळू दे विषमता, येऊ दे नजरेतून क्रूर अंगार !

वाहू दे धमन्या-धमन्यांतून तुझ्या उसळणारे रक्त
अन्यायास, गुलामगिरीस टाक भेदूनि ,तू हो विरक्त
रणचंडिका, रणरागिणी, रणमर्दानी होऊन तू दे लढा,
शिक्षा अशी दे, थरथर कापून वाचू दे पापांचा पाढा !

     आजवरी जे लाभले तुला कृष्ण-सावट पारतंत्र्याने
     स्वातंत्र्याच्या सूर्यास तू उगव, तव शक्तिस्रोताने
     होऊन काली, होऊन दुर्गा, रावण-वधास हो बद्ध,
     संहारक बाळाने, कर दग्ध, तयांसी तू होऊन क्रुद्ध !

झुगारून बंधने, कर दूर विषमतेचे कालकूट जहाल
समानतेचे हक्क घे हक्काने, पिऊन तू ज्वलंत हलाहल
पुरुष-प्रधान समाजात, बरोबरीने मिळव तू स्थान,
येऊ दे युग तुझे हे स्त्रिये, टिकू दे मग युगा-युगानं !


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.07.2021-गुरुवार.