सद्य-स्थिती गंभीर कविता-"दरडी कोसळत चालल्यात भराभर, मदती पोचताहेत का वेळेवर ?"

Started by Atul Kaviraje, July 29, 2021, 11:37:28 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     मानवी जीवनाची सद्य स्थितीवरील एक गंभीर, विचार करण्यास प्रवूत्त करणारी ही माझी पुढील कविता आहे. मित्रानो, कोंकण आता सुरक्षित राहिलेले नाही. नुकत्याच झालेल्या ढगफुटीमुळे, कोकणातले डोंगर खचून, दरडी कोसळण्याचे प्रकार आतासे खूप वाढले आहेत. अतोनात नुकसान, वाहून जाणारी शेते, वाहून जाणारी माणसे, गुरे ढोरे, जमीनदोस्त होणारी घरे , झोपेतच मृत्यूने घातलेला काळ-घाला, या सर्व बातम्या  वाचून मन सुन्न झालेय. हा आलेला महापूर, आणि कोसळणाऱ्या दरडी, यांनी गावकऱ्यांचे पूर्ण जीवन उद्ध्वस्तच करून टाकले आहे.     

     या पूरग्रस्तांना मदत पोचतेय खरी, पण काहीशी उशिरानेच. मंत्री, पुढारी, राज्यकर्ते भेट देत आहेत, पण काहीसे उशिरानेच. वर नेहमीप्रमाणे आश्वासनांचे त्यांचे प्रेमळ बोल आहेतच. यापुढे असं घडू नये, किंबहुना या नैसर्गिक आपदांस वेळीच किंवा वेळेच्या आधी आळा घालण्यास, विकासाचे आराखडे, ग्राम-पुनर्वसन योजना, आणि बरंच काही सुचवलं जात , या गोष्टी  खरोखर घडून येतात का ? की फक्त कागदापुरत्याच मर्यादित असतात ? त्यांची अंमलबजावणी होताना दिसतेय का ? ऐकुया तर या पूर-ग्रस्तांवर आलेलं नैसर्गिक संकट, आणि त्यांना देण्यात येणारी सरकारची आश्वासने, यावर एक गंभीर कविता. कवितेचे शीर्षक आहे- "दरडी कोसळत चालल्यात भराभर, मदती पोचताहेत का वेळेवर ?"


                     विषय-गावोगावी दरडी कोसळताहेत.
                   मानवी जीवन सद्य-स्थिती - गंभीर कविता
    "दरडी कोसळत चालल्यात भराभर, मदती पोचताहेत का वेळेवर ?"
   ----------------------------------------------------------


उत्पात, आकांत माजवलाय पावसाने सर्वत्रच
दिसतोय स्पष्टच वरुणराजाचा राग आणि क्रोधच 
निसर्ग कोपला की ऐकत नाही कुणाचेही,
रौद्ररूप त्याचे आताशी अनुभवास आम्हा येतेही.

डोंगर घसरला, दरडी कोसळल्या,हाहा:कार  माजला कोकणात
नदी नाल्याना  येऊन  पूर, पाणी पोचले घराघरात
एकच शोक, एकच आकांत,डोळ्यातही साठला महापूर,
नुकसानच दिसत होते,पाणीच पाणी होते सर्वत्र दूर-दूर.

झोपेतच गाठले मरणाने,दरडी कोसळून घरांवर
वर मारा ढगफुटीचा,पाण्याचा झाला घनघोर, छपरांवर
झाली जमीनदोस्त घरे,नावालाही नाही उरली निशाणी,
संसार आले उघड्यावर,सांगत होते विनाशाची कहाणी.

वृत्त पसरले जगभर,हळहळले सारे जण या घटनेवर
न भूतो न भविष्यती,असे संकटच कोसळले होते माणसावर
सारे झाले होते बरबाद, कुटुंबेच्या कुटुंबे झाली उद्ध्वस्त,
मेहनतीने उभारलेले संसार,विस्कटून गेले, झाले अस्ताव्यस्त.

विनाश चोर-पावलांनी साऱ्या बाजूनी ग्रासत होता
काळोखी रात्र, काळा-कभिन्न अंधार त्यास साथ देत होता
होत्याचे नव्हते झाले,डोळ्यांदेखत ते सारे घडले होते,
दरडी-महापुराने माणसाचे सारे स्वप्न राखेनेच मढले होते.

काना-कोपऱ्यांतून साऱ्या, मदतीचे हात पोचले, हातभार लागले
जीवनावश्यक वस्तूंचे पुरवठे,ट्रक-गाड्यांमधून त्वरित पोहोचू लागले
इथे माणूसच उभा राहिला,संकटकाळी माणसाच्याच मदतीस,
एकी दिसून येत होती, दर्शन देत होती माणसाची माणुसकीच.

मंत्री धावले, दौरे झाले, गाड्या-विमानांतून पाहिले पुरग्रस्ता
उशिरा का होईना जाग आली होती सरकारला, उठता-बसता
पाहणी झाली, हळहळ व्यक्त झाली, आश्वासन दिले गेले,
यापुढे असे घडणार नाही, याचे बढेरे-ताशेरे मारले गेले.

सारे-सारे घडून गेले होते,आता झाला होता उशीरच
पंचनामा झाला होता सुरु, पूरग्रस्त ग्रामस्थांच्या देखतच
तोंड देण्या आपत्तीस, योजले जात होते मनसुबे अन आराखडे,
पण निसर्गाचे आतापर्यंत, कुणी करू शकले होते का वाकडे ?

योजना विकासाच्या सर्व सर्व कागदापुरत्याच उरल्या होत्या
इकडे-तिकडे नाचवून त्यांच्या घोड्या लंगड्या झाल्या होत्या
आश्वासने दिली गेली होती,अति-उत्साहाने आपादग्रस्त पहाणीत,
पण समीकरणच होत नव्हते तयार, चुकत होते त्यांचे सारेच गणित.

नेहमी असेच घडते, घडून जाते, अन पुढेही घडते
भरघोस वचने  देण्यास या पुढाऱ्यांचे काय बरे जाते ?
अंमल -बजावणी, विकास आराखडे, पुनर्वसन,फक्त योजनाच रहातात,
पुन्हा येणाऱ्या महापुरात त्या,फक्त वहातात आणि वहातच जातात.

आता सारे शांत आहे, या घटनेचा जणू विसरच पडलाय
पण त्यांचे काय, ज्यांचा यास्तव सारा संसारच बुडालाय ?
पुन्हा एकदा येईल वादळ,पुन्हा होईल, पुन्हा एकदा धावपळ,
शमल्यावर पुन्हा, पुन्हा तोच मुद्दा, गाठेल पुन्हा रसातळ .

पूर्व-नियोजित योजना,निसर्ग आपदांच्या राबविल्या जाव्यात वेळेवर
शास्त्र, शस्त्रांची घेऊन मदत, कर्तव्य व्हावे युद्ध-पातळीवर
निसर्गावर जरी मात नाही झाली,तरी प्राण-हानी होणार नाही,
आपल्या जिवापेक्षा या जगात दुसरे, काहीही मोठे नाही.


-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-29.07.2021-गुरुवार.