II आषाढी अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा II - ( लेख क्रमांक - 3)

Started by Atul Kaviraje, August 08, 2021, 05:02:06 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje


                     II  आषाढी अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा II
                    ----------------------------------------


मित्र/मैत्रिणींनो,

     आज आषाढी अमावास्या आहे. श्रावण महिना सुरु होण्यापूर्वीची ही अमावस्या म्हणून  हिची चांगलीच ओळख आहे. हिला गटारी अमावास्या म्हणूही ओळखले जाते. या अमावास्येच्या आपणा सर्वांस माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. वाचूया, तर शुभेच्छापर लेख.


                 II  आषाढी अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा II
                               ( लेख क्रमांक - 3)
                ----------------------------------------


     आषाढ महिन्यातील दीप अमावस्या समाप्ती नंतर श्रावण मासाला प्रारंभ होणार आहे. श्रावणातला जवळजवळ प्रत्येक दिवस काही ना काही उपवासाच्या सणांशी संबंधित असतो. आज दीप अमावस्या प्रारंभ होणार आहे.

     चातुर्मासातील पहिली अमावास्या म्हणून आषाढ अमावास्येकडे पाहिले जाते. आषाढ एकादशीपासून सात्विकतेचा काळ मानला जाणारा चातुर्मास सुरू झाला आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, आषाढ महिन्यातील दीप अमावस्या समाप्ती नंतर श्रावण मासाला प्रारंभ होणार आहे. श्रावणातला जवळजवळ प्रत्येक दिवस काही ना काही उपवासाच्या सणांशी संबंधित असतो. आज दीप अमावस्या प्रारंभ होणार असून, या वर्षी ८ ऑगस्ट रोजी दीपपूजन केले जाईल. या दिवशी पूर्वजांचे स्मरण केले जाते, दिवा लावला जातो आणि दान धर्म केले जाते. दीप अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचेही विशेष महत्त्व आहे.

     उदया तिथी वैध असल्याने, दीप अमावस्येची पूजा ८ ऑगस्टलाच केली जाईल. काही लोक या दिवशी उपवास देखील करतात. शास्त्र आणि पुराणांमध्ये, या अमावास्येला उपवास अनेक पटीने परिणाम देतो आणि व्यक्तीसाठी मोक्षाचे दरवाजे उघडतो. अगदी प्राचीन काळापासून दररोज सायंकाळी तिन्ही सांजेला देवासमोर तेलाचा वा तुपाचा दिवा लावण्याची आपली संस्कृती आहे. दिव्याची ज्योत ही अग्नितत्त्वाचे प्रतीक आहे. तर, दिवा मांगल्याचे प्रतिक आहे. अग्निप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आषाढ अमावास्येला 'दीपपूजन' केले जाते. आषाढ अमावास्येला 'दीपान्वित अमावास्या' असेही म्हणतात. पितरांच्या स्मरणार्थ या दिवशी पिंपळ, वटवृक्ष, केळी आणि तुळशीच्या रोपांची लागवड सर्वोत्तम मानली जाते.

     उत्तर भारतात श्रावण सुरू झाल्यामुळे ही अमावास्या श्रावण अमावास्या म्हणून साजरी केली जाणार आहे. या अमावस्येला तेथे हरियाली अमावस्या असे म्हणतात. आषाढ अमावस्येनंतर दुसऱ्याच दिवशी सोमवारी ९ ऑगस्टला श्रावण मासारंभ होतो आहे.

     दीप अमावस्येचे महत्त्व:-----

शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा |
शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते |
दिव्या दिव्या दिपोत्कार कानीं कुंडलें मोतीहार |
दिवा जळो तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी || २ ||

     दीप अमावस्येला दिवा लावण्याचे महत्व असून, दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. भरपूर पाऊस व अंधारून येणे हे श्रावणाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे घरातील इकडे तिकडे ठेवलेले, धुळीने माखलेले दिवे, समया, निरांजने, लामणदिवे या सर्वांना एकत्र करून, घासून पुसून लख्ख करून ठेवण्याचा हा दिवस असतो.

     दीप अमावस्येच्या दिवशी वृक्षारोपण केल्यास ग्रह दोष दूर होतात. अमावस्या तिथी देखील पूर्वजांशी संबंधित असल्याचे मानले जाते. आर्यमांना पूर्वजांमध्ये प्रमुख मानले जाते. भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात की ते स्वतः पूर्वजांपैकी मुख्य आर्यम आहेत. दीप अमावस्येच्या दिवशी वृक्षारोपण केल्याने पूर्वजांचे समाधानही होते, म्हणजेच या दिवशी झाडे लावून निसर्ग आणि माणूस दोघेही समाधानी राहून मनुष्याला सुख आणि समृद्धीचे आशीर्वाद देतात. दीप अमावस्येच्या या महत्त्वामुळे अनेक धार्मिक आणि सामाजिक संस्था या दिवशी वृक्षारोपण कार्यक्रमांचे आयोजन करतात. या दिवशी एकमेकांना भेटवस्तू म्हणून वनस्पती देणे देखील शुभ मानले जाते.


           (साभार आणि सौजन्य-संदर्भ-महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
           --------------------------------------------


-----संकलन
-----श्री अतुल एस परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.08.2021-रविवार.