‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता’ - "पोया (पोळा)"

Started by Atul Kaviraje, August 09, 2021, 01:00:11 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

   ...आणि म्हणता म्हणता तो आला... शेतशिवाराला चिंब करणारा, झाडा-फुलांना बहरून टाकणारा, पशु-पक्ष्यांना सुखावणारा, मनामनांना फुलवणारा, चित्तवृत्ती उल्हसित करणारा, अवघ्या चराचरालाच नवं रूपडं देणारा...तो...श्रावण आला... सर्जनाचा अनोखा आविष्कार असलेल्या या महिन्याचं आणि कवितांचं एक वेगळंच नातं आहे.  पाऊस, निसर्ग-पर्यावरण, शेती अशा विषयांशी निगडित असलेली श्रावणातील  एक कविता मी  तुम्हाला आजपासून रोज  ऐकवीन.

     श्रावण म्हणजे जीवनाच्या आनंदयात्रेतला एक उत्सवच जणू. ज्येष्ठ-आषाढात दमदार कोसळणारा पाऊस श्रावणात थोडा रमत-गमत, उन्हाशी लपंडाव खेळतच बरसतो. जणू काही दोन महिन्यांच्या अविरत परिश्रमांनंतरची थोडी विश्रांतीच! या काळातच सृष्टी बहरते आणि नवे रूप लेवून सजते...या वेळी अवनी धारण करत असते निसर्गदत्त सौंदर्याचा आविष्कार...आणि आकाशही त्याला अपवाद नसतं...कारण ऊन-पावसाच्या खेळातूनच नभात साकारतं सप्तरंगी इंद्रधनू...साहजिकच सारा आसमंतच मोहरून जातो आणि आपल्या जगण्याचं अवकाशही...नवा उत्साह मिळतो आपल्याला...अन् जगण्याची उमेदही...रिफ्रेश करून टाकतो हा माहौल...शहरातल्या गर्दीत कदाचित हे सारंच्या सारं नसेल मिळत अनुभवायला...पण श्रावणाचा 'फील' तरी नक्कीच अनुभवता येतो...अशा या उत्सवाच्या नाटकाचा पडदा आज वर जातोय...पुढचे काही दिवस पाहायला मिळेल त्याचं सुंदर नेपथ्य...आणि आपल्या जीवनाच्या नाट्याला मिळेल एक मस्त कलाटणी!


       (साभार आणि सौजन्य-संदर्भ -  बीट्सऑइंडिया.कॉम/मेन/श्रावणाच्याकविता)
                         'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'
    ----------------------------------------------------------------------
                           
मित्र/मैत्रिणींनो,

     "बीट्सऑइंडिया.कॉम/मेन/श्रावणाच्याकविता", यांच्या सौजन्याने, मी आजपासून या श्रावण महिन्यात  'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता' या सदरांतर्गत दररोज एक कविता आपणापुढे सादर करीत आहे.

     मित्रानो, महाराष्ट्रातील मान्यवर कवी आणि कवयित्रींच्या या श्रावणावरल्या कविता  मला तुम्हांपुढे ठेवण्यास पुष्कळ आनंद होत आहे. त्यांची प्रतिमा आणि प्रगल्भ प्रतिभा, आपणा सर्वांस त्यांच्या सुदर काव्य-पंक्तींतून, रचनेतून ,कवितांतून क्षणोक्षणी प्रत्ययास येईल. त्यांना अभिवादन करून, आणि या त्यांच्या रचनेस नमन करून मी आपणापुढे त्यांच्या कवितेचे पहिले पुष्प सादर करीत आहे. प्रस्तुत कविता ही " बहिणाबाई चौधरी" यांची असून या श्रावण कवितेचे बोल आहेत -" पोया (पोळा)"


                             कविता पुष्प-पहिले
                               "पोया (पोळा)"
                           --------------------


      शेतकऱ्यांच्या अत्यंत जिवाभावाच्या असलेल्या बैलांचं पूजन करण्याचा  दिवस म्हणजेच पोळा. त्या निमित्ताने आज 'पोया (पोळा)' ही बहिणाबाईंची कविता पाहू या:---


आला आला शेतकऱ्या
पोयाचा रे सन मोठा
हातीं घेईसन वाट्या,
आतां शेंदूराले घोटा.

आतां बांधा रे तोरनं
सजवा रे घरदार
करा आंघोयी बैलाच्या,
लावा शिंगाले शेंदुर.

लावा शेंदूर शिंगाले
शेंव्या घुंगराच्या लावा
गयामधीं बांधा जीला,
घंट्या घुंगरू मिरवा.

बांधा कवड्याचा गेठा
आंगावऱ्हे झूल छान
माथां रेसमाचे गोंडे,
चारी पायांत पैंजन.

उठा उठा बह्यनाई
चुल्हे पेटवा पेटवा
आज बैलाले नीवद,
पुरनाच्या पोया ठेवा.

वढे नागर वखर
नहीं कष्टाले गनती
पीक शेतकऱ्या हातीं,
याच्या जीवावर शेतीं.

उभे कामाचे ढिगारे
बैल कामदार बंदा
याले कहीनाथे झूल,
दानचाऱ्याचाज मिंधा.

चुल्हा पेटवा पेटवा
उठा उठा आयाबाया
आज बैलाले खुराक,
रांधा पुरनाच्या पोया.

खाऊं द्या रे पोटभरी
होऊं द्यारे मगदूल
बशीसनी यायभरी,
आज करूं या बागूल

आतां ऐक मनांतलं
माझं येळीचं सांगन
आज पोयाच्या सनाले,
माझं येवढं मांगन.

कसे बैल कुदाळता
आदाबादीची आवड
वझं शिंगाले बांधतां,
बाशिंगाचं डोईजड.

नका हेंडालूं बैलाले
माझं ऐका रे जरासं
व्हते आपली हाऊस,
आन बैलाले तरास.

आज पुंज रे बैलाले
फेडा उपकाराचं देनं
बैला, खरा तुझा सन,
शेतकऱ्या तुझं रीन !

     --- कवयित्री -"बहिणाबाई चौधरी."
        -----------------------------


      (साभार आणि सौजन्य-संदर्भ -  बीट्सऑइंडिया.कॉम/मेन/श्रावणाच्याकविता)
                         'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'
    --------------------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.08.2021-सोमवार.