‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता’ - "मेघास"

Started by Atul Kaviraje, August 15, 2021, 12:02:53 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     "बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता", यांच्या सौजन्याने, मी आजपासून या श्रावण महिन्यात  'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता' या सदरांतर्गत दररोज एक कविता आपणापुढे सादर करीत आहे.

     मित्रानो, महाराष्ट्रातील मान्यवर कवी आणि कवयित्रींच्या या श्रावणावरल्या कविता  मला तुम्हांपुढे ठेवण्यास पुष्कळ आनंद होत आहे. त्यांची प्रतिमा आणि प्रगल्भ प्रतिभा, आपणा सर्वांस त्यांच्या सुदर काव्य-पंक्तींतून, रचनेतून ,कवितांतून क्षणोक्षणी प्रत्ययास येईल. त्यांना अभिवादन करून, आणि या त्यांच्या रचनेस नमन करून मी आपणापुढे त्यांच्या कवितेचे सहावे  पुष्प सादर करीत आहे. प्रस्तुत कविता ही " कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर)" यांची असून या श्रावण कवितेचे बोल आहेत -"मेघास"


                               कविता पुष्प-सहावे
                                    "मेघास"
                              -------------------


     दडी मारलेल्या पावसाला परत बोलावण्यासाठी कुसुमाग्रजांनी मेघांना केलेले आवाहन म्हणजे 'मेघास' ही कविता.'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'मध्ये आज पाहू या तीच कविता...


थांब थांब परतू नको रे घना कृपाळा,
अजुनि जाळतोच जगा तीव्र हा उन्हाळा!

अजुनि पायी भासतात पसरलेले निखारे
उसळतात अजुनि गगनि पेटलेले वारे,
मरुनि पडतात तरुवरुनी पाखरे !

तगमगुनी टाकितसे भूमि ही उसासे
शून्य हृदय होत नदी हसत विकट भासे,
रखरखती दाही दिशा उफळतात ज्वाळा!

हतभागी दिसत तरू जाळत्या उन्हाने
पायाशी पडलेली गळुनि दग्ध पाने,
आशा जणू पिचलेल्या लगटती जिवाला!

बांधावर बसुनि नजर बांधुनि आकाशी
तडफडती गाईगुरे पाहुनी उपाशी,
शेतकरी बैसे कर लावुनी कपाळा!

गर्जत ये, ओढित ये आसूड तडितेचा
गर्वोन्नत माथा तो नमव भास्कराचा,
लोकाग्रणि नमवी जसा मातल्या नृपाळा!


         - कवी-"कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर)"
         --------------------------------------

       (साभार आणि सौजन्य-संदर्भ -बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता)
                         'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'
     --------------------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.08.2021-रविवार.