‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता’ - "सरीवर सरी आल्या गं"

Started by Atul Kaviraje, August 20, 2021, 11:25:01 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     "बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता", यांच्या सौजन्याने, मी आजपासून या श्रावण महिन्यात  'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता' या सदरांतर्गत दररोज एक कविता आपणापुढे सादर करीत आहे.

     मित्रानो, महाराष्ट्रातील मान्यवर कवी आणि कवयित्रींच्या या श्रावणावरल्या कविता  मला तुम्हांपुढे ठेवण्यास पुष्कळ आनंद होत आहे. त्यांची प्रतिमा आणि प्रगल्भ प्रतिभा, आपणा सर्वांस त्यांच्या सुदर काव्य-पंक्तींतून, रचनेतून ,कवितांतून क्षणोक्षणी प्रत्ययास येईल. त्यांना अभिवादन करून, आणि या त्यांच्या रचनेस नमन करून मी आपणापुढे त्यांच्या कवितेचे अकरावे  पुष्प सादर करीत आहे. प्रस्तुत कविता ही " बा. भ. बोरकर" यांची असून या श्रावण कवितेचे बोल आहेत - "सरीवर सरी आल्या गं"


                                  कविता पुष्प-अकरावे
                                 "सरीवर सरी आल्या गं"
                                 --------------------


सरीवर सरी आल्या गं--
 
'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'मध्ये आज  बा. भ. बोरकर यांची 'सरीवर सरी आल्या गं' ही कविता...

सरीवर सरी आल्या गं,
सचैल गोपी न्हाल्या गं.

गोपी झाल्या भिजून-चिंब
थरथर कापती कदंब-निंब
घनांमनांतुन टाळ-मृदंग
तनूंत वाजवी चाळ अनंग
पाने पिटिती टाळ्या गं,
सरीवर सरी आल्या गं.

मल्हाराची जळांत धून
वीज नाचते अधूनमधून
वनांत गेला मोर भिजून
गोपी खिळल्या पदी थिजून
घुमतो पावा सांग कुठून?
कृष्ण कसा न उमटे अजून?
वेली ऋतुमति झाल्या ग,
सरीवर सरी आल्या ग.

हंबर अंबर वारा ग
गोपी दुधाच्या धारा ग
दुधात गोकुळ जाय बुडून
अजून आहे कृष्ण दडून
मी-तू-पण सारे विसरून
आपणही जाऊ मिसळून
सरीवर सरी आल्या ग,
दुधात न्हाणुनि धाल्या ग.


                 कवी- बा. भ. बोरकर
                --------------------

  (साभार आणि सौजन्य-संदर्भ -  बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता)
                         'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'
----------------------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.08.2021-शुक्रवार.