II रक्षा बंधन शुभेच्छा II - लेख

Started by Atul Kaviraje, August 22, 2021, 10:03:01 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

                                 II रक्षा बंधन शुभेच्छा II
                                -----------------------

मित्र/मैत्रिणींनो,

     आज श्रावणी रविवार. आजचा हा  म्हणजे  दिनांक -२२.०८.2021 चा सुमुहूर्त आपल्या मराठी माणसाचे दोन पुनीत, पावन असे सण घेऊन आलाय , ते म्हणजे, रक्षा बंधन ,आणि नारळी पौर्णिमा . मराठी कवितेच्या माझ्या सर्व कवी-बंधूस आणि कवयित्री भगिनींस रक्षा - बंधन आणि नारळी पौर्णिमेच्या  हार्दिक शुभेच्छा. आता वाचूया रक्षा बंधनानिमित्त परमपूज्य श्री पांडुरंग शास्त्री आठवले यांनी लिहिलेला एक लेख----- 

                 रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचे बंधन!
                -----------------------------------------

     भगवान शंकराने तिसरा डोळा उघडून मदनाला भस्म केले होते. त्याप्रमाणे तिसर्‍या डोळ्याच्या रूपात बहिण भावाला आजार, वासना इत्यादी भस्म करण्याची सूचना करते.

     बहिण भावाच्या हातावर राखी बांधून केवळ आपले संरक्षण मागत नाही, तर सर्व स्त्री जातीच्या संरक्षणाची मनोकामना ठेवते, तसेच बाह्य शत्रूपासून आणि अंतर्विकारांपासून आपला भाऊ विजय प्राप्त करो किंवा सुरक्षित राहो ही भावना पण त्यात असते.

     देवासुर संग्रामात देवांच्या विजयासाठी इंद्राणीने हिम्मत हरवलेल्या इंद्राच्या हातात राखी बांधली होती, असे वेदात सां‍गितले आहे. अभिमन्यूच्या सुरक्षेसाठी कुंतीने त्याला राखी बांधली होती आणि आपल्या संरक्षणासाठी राणी कर्मवतीने हुमायूँला राखी पाठवली होती. या राखीमध्ये सुरक्षिततेची भावना होती.

     रक्षाबंधन हे सुरक्षिततेचे स्मारक आहे. राखी बांधल्याने एक बंधन आपल्यावर असते. हे बंधन असते ध्येयच्युत न होण्याचे. या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करण्याची आठवण राखी देते. राखी बांधताना बहिण भावाचे बंधन किंवा ध्येयाचे रक्षण करण्याची सूचना करते.

     ''स्त्रीकडे विकृत दृष्टीने न पाहता तिच्या प्रती पवित्र दृष्टी ठेवा'' असा महान संदेश देणार्‍या या भारतीय संस्कृतीच्या सर्वश्रेष्ठ सणाला आपण कुटुंबापुरतेच मर्यादित ठेवले आहे. अशा सुंदर प्रेम आणि भावबंधनाच्या सणाला कुटूंबापुरतेच मर्यादित ठेवणे योग्य नाही. सख्या भावाकडे बहिणीची दृष्टी निर्मळ आणि प्रेमपूर्ण राहील.

     समाजात स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची आवश्यकता आहे. सख्ख्या बहिणीने सख्ख्या भावाला राखी बांधण्यापेक्षा समवयस्क एखाद्या बहिणीने दुसर्‍या भावाला राखी बांधल्यास त्यामध्ये शील रक्षणाची जबाबदारी येते. सारांश, रक्षाबंधन म्हणजे स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे, रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेणे, रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या शुद्ध प्रेमाचा वाहता निर्झर! भाऊ आणि बहिण परस्पर प्रेरक, पोषक आणि पूरक आहेत हा संदेश देणारा हा उत्सव भारतीय संस्कृतीची अमूल्य देन आहे.


                          (साभार-पूज्य पांडुरंगशास्त्री आठवले)
                         ----------------------------------


                        (सौजन्य-संदर्भ-मराठी .वेबदुनिया .कॉम)
                       -------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.08.2021-रविवार.