‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता’ - "हिरवळ आणिक पाणी"

Started by Atul Kaviraje, August 23, 2021, 10:54:19 PM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     "बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता", यांच्या सौजन्याने, मी आजपासून या श्रावण महिन्यात  'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता' या सदरांतर्गत दररोज एक कविता आपणापुढे सादर करीत आहे.

     मित्रानो, महाराष्ट्रातील मान्यवर कवी आणि कवयित्रींच्या या श्रावणावरल्या कविता  मला तुम्हांपुढे ठेवण्यास पुष्कळ आनंद होत आहे. त्यांची प्रतिमा आणि प्रगल्भ प्रतिभा, आपणा सर्वांस त्यांच्या सुदर काव्य-पंक्तींतून, रचनेतून ,कवितांतून क्षणोक्षणी प्रत्ययास येईल. त्यांना अभिवादन करून, आणि या त्यांच्या रचनेस नमन करून मी आपणापुढे त्यांच्या कवितेचे चौदावे  पुष्प सादर करीत आहे. प्रस्तुत कविता ही " बा. भ. बोरकर" यांची असून या श्रावण कवितेचे बोल आहेत - "हिरवळ आणिक पाणी"


                                  कविता पुष्प-चौदावे
                                "हिरवळ आणिक पाणी"
                                --------------------


हिरवळ आणिक पाणी
     हिरवळ आणिक पाणी तेथे स्फुरती मजला गाणी....
     हिरवळ आणिक पाणी तेथे स्फुरती मजला गाणी....


'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'मध्ये आज कविवर्य बा. भ. बोरकर यांची 'हिरवळ आणिक पाणी' ही कविता...

हिरवळ आणिक पाणी
तेथे स्फुरती मजला गाणी,
निळीतुनी पांखरे पांढरी किलबिलतात थव्यांनी.

सुखांत चरती गुरेवासरे
लवेतुनी लहरते कापरे,
हवेतुनी आरोग्य खेळते गार नि आरसपानी.

उरी जिथे भूमीची माया
उन्हात घाली हिरवी छाया,
सांडित कोमल आनंदाचे पाझर पानोपानी.

जिथे अशी समृद्ध धरित्री
घुमति घरे अन पुत्रकलत्री,
रमे श्रमश्री माहेरीच्या स्वाभाविक लावण्यी.

सख्यापरते जिथे न बंधन
स्मितांत शरदाचे आमंत्रण,
सहजोद्वारी गाढ चांदणे, स्पर्शी स्नेह हिमानी.

ऋतूऋतुंतून जिथे सोहळे
तसेच उघड्यावरी मोकळे,
आणि अंगणी श्रृंगाराची निर्मळ अमृतवाणी.

माणूस जेथे हवाहवासा
अभंग-ओवीमधे दिलासा,
विश्वासावर जीवन सुस्थिर, श्रद्धा नेक इमानी.

देव जिथे हृदयात सदाचा
भार मनाला नसे उद्यांचा,
सुखे दुजाच्या हिरवळ चित्ती, दु:खे डोळा पाणी.


                   कवी- बा. भ. बोरकर
                 ----------------------


  (साभार आणि सौजन्य-संदर्भ -  बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता)
                         'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'
-------------------------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-23.08.2021-सोमवार.