‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता’- "गवतफुला रे गवतफुला"

Started by Atul Kaviraje, September 01, 2021, 12:54:05 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     "बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता", यांच्या सौजन्याने, मी आजपासून या श्रावण महिन्यात  'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता' या सदरांतर्गत दररोज एक कविता आपणापुढे सादर करीत आहे.

     मित्रानो, महाराष्ट्रातील मान्यवर कवी आणि कवयित्रींच्या या श्रावणावरल्या कविता  मला तुम्हांपुढे ठेवण्यास पुष्कळ आनंद होत आहे. त्यांची प्रतिमा आणि प्रगल्भ प्रतिभा, आपणा सर्वांस त्यांच्या सुदर काव्य-पंक्तींतून, रचनेतून ,कवितांतून क्षणोक्षणी प्रत्ययास येईल. त्यांना अभिवादन करून, आणि या त्यांच्या रचनेस नमन करून मी आपणापुढे त्यांच्या कवितेचे बाविसावे पुष्प सादर करीत आहे. प्रस्तुत कविता ही " इंदिरा संत" यांची असून या श्रावण कवितेचे बोल आहेत - "गवतफुला रे गवतफुला"


                                कविता पुष्प- बाविसावे
                               "गवतफुला रे गवतफुला"
                              -----------------------


गवतफुला रे गवतफुला--

आषाढात मनसोक्त कोसळून घेतल्यानंतर श्रावणात पावसाचा जोर काहीसा ओसरतो आणि मग काही वेळा सूर्यनारायणाचं दर्शनही घडतं. त्याचा संयुक्त परिणाम म्हणजे माळरानावर इवली-इवलीशीच, पण अत्यंत मनमोहक अशी गवतफुलं दर्शन देऊ लागतात. या गवतफुलांची गंमत ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांनी गवतफुला रे गवतफुला या कवितेतून मांडली आहे. 'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'मध्ये आज पाहू या तीच छान कविता...


रंगरंगुल्या, सानसानुल्या
गवतफुला रे गवतफुला
असा कसा रे मला लागला,
सांग तुझा रे तुझा लळा.

मित्रासंगे माळावरती
पतंग उडवित फिरताना
तुला पाहिले गवतावरती,
झुलता झुलता हसताना.

विसरुनि गेलो, पतंग नभीचा
विसरून गेलो मित्राला
पाहून तुजला हरखुन गेलो,
अशा तुझ्या रे रंगकळा.

हिरवी नाजुक, रेशीम पाती
दोन बाजुला सळसळती
निळ निळुली एक पाकळी,
पराग पिवळे झगमगती.

तळी पुन्हा अन् गोजिरवाणी
लाल पाकळी खुलते रे
उन्हामध्ये हे रंग पाहता,
भानच हरपुनी गेले रे.

पहाटवेळी आभाळ येते
लहान होउनी तुझ्याहुनी
तुला भरविते निळ्या करांनी,
दवमोत्यांची कणी कणी.

वारा घेऊनी रूप सानुले
खेळ खेळतो झोपाळा
रात्रही इवली होऊन म्हणते,
अंगाईचे गीत तुला.

गोजिरवाणा हो रवीचा कण
छाया होते इवलीशी
तुझ्या संगती लपून खेळते,
रमून जाते पहा कशी.

तुझी गोजिरी, शिकून भाषा
गोष्टी तुजला सांगाव्या
तुझे शिकावे खेळ आणखी,
जादू तुजला शिकवाव्या.

आभाळाशी हट्ट करावा
खाऊ खावा तुझ्यासवे
तुझे घालुनी रंगीत कपडे,
फुलपाखरां फसवावे.

मलाही वाटे लहान व्हावे
तुझ्याहूनही लहान रे
तुझ्या संगती सदा रहावे,
विसरुनी शाळा घर सारे.

                कवयित्री  - इंदिरा संत
               ----------------------

  (साभार आणि सौजन्य-संदर्भ -  बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता)
                         'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'
-------------------------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.09.2021-बुधवार.