‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता’- "सायंकाळची शोभा"

Started by Atul Kaviraje, September 02, 2021, 12:10:13 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     "बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता", यांच्या सौजन्याने, मी आजपासून या श्रावण महिन्यात  'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता' या सदरांतर्गत दररोज एक कविता आपणापुढे सादर करीत आहे.

     मित्रानो, महाराष्ट्रातील मान्यवर कवी आणि कवयित्रींच्या या श्रावणावरल्या कविता  मला तुम्हांपुढे ठेवण्यास पुष्कळ आनंद होत आहे. त्यांची प्रतिमा आणि प्रगल्भ प्रतिभा, आपणा सर्वांस त्यांच्या सुदर काव्य-पंक्तींतून, रचनेतून ,कवितांतून क्षणोक्षणी प्रत्ययास येईल. त्यांना अभिवादन करून, आणि या त्यांच्या रचनेस नमन करून मी आपणापुढे त्यांच्या कवितेचे तेवीसावे पुष्प सादर करीत आहे. प्रस्तुत कविता ही " भा. रा. तांबे " यांची असून या श्रावण कवितेचे बोल आहेत - "सायंकाळची शोभा"


                                   कविता पुष्प-तेवीसावे
                                   "सायंकाळची शोभा"
                                  --------------------

सायंकाळची शोभा--

'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'मध्ये आज  भा. रा. तांबे यांची 'सायंकाळची शोभा' ही कविता....


पिवळें तांबुस ऊन कोवळें पसरे चौफेर,
ओढा नेई सोनें वाटे वाहुनिया दूर.

झाडांनीं किति मुकुट घातले डोकिस सोनेरी,
कुरणावर शेतांत पसरला गुलाल चौफेरी.

हिरवें हिरवेंगार शेत हें सुंदर साळीचें,
झोके घेतें कसें, चहुंकडे हिरवे गालीचे.

सोनेरी, मखमली, रुपेरी, पंख कितीकांचे,
रंग किती वर तऱ्हेतऱ्हेचे इंद्रधनुष्याचे.

अशीं अचल फुलपांखरे फुलें साळिस जणुं फुलती,
साळीवर झोपलीं जणूं का पाळण्यांत झुलती.

झुळकन् सुळकन् इकडुन तिकडे किति दुसरीं उडती,
हिरे, माणकें, पांचू फुटुनी पंखचि गरगरती.

पहा पांखरें चरोनि होती झाडावर गोळा,
कुठें बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा?


                      कवी - भा. रा. तांबे
                     -------------------

  (साभार आणि सौजन्य-संदर्भ -  बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता)
                         'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'
-------------------------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.09.2021-गुरुवार.