‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता’ - "धबधबा"

Started by Atul Kaviraje, September 04, 2021, 12:53:41 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     "बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता", यांच्या सौजन्याने, मी आजपासून या श्रावण महिन्यात  'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता' या सदरांतर्गत दररोज एक कविता आपणापुढे सादर करीत आहे.

     मित्रानो, महाराष्ट्रातील मान्यवर कवी आणि कवयित्रींच्या या श्रावणावरल्या कविता  मला तुम्हांपुढे ठेवण्यास पुष्कळ आनंद होत आहे. त्यांची प्रतिमा आणि प्रगल्भ प्रतिभा, आपणा सर्वांस त्यांच्या सुदर काव्य-पंक्तींतून, रचनेतून ,कवितांतून क्षणोक्षणी प्रत्ययास येईल. त्यांना अभिवादन करून, आणि या त्यांच्या रचनेस नमन करून मी आपणापुढे त्यांच्या कवितेचे चोविसावे पुष्प सादर करीत आहे. प्रस्तुत कविता ही " भवानीशंकर पंडित " यांची असून या श्रावण कवितेचे बोल आहेत - "धबधबा"


                                   कविता पुष्प-चोविसावे
                                        "धबधबा"
                                  --------------------

धबधबा--
 
'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'मध्ये आज  भवानीशंकर पंडित यांची 'धबधबा' ही कविता....

किती उंचावरून तूं। उडी ही टाकिसी खालीं,
जणों व्योमांतुनी येसी। प्रपाता! जासि पातालीं.

कड्यांना लंघुनी मागें। चिपांना लोटिसी रागें,
शिरीं कोलांटुनी वेगें। शिळेचा फोडिसी मौली.

नगाचा ऊर फोडोनी। पुढें येसी उफाळोनी,
उडे पाणी फवारोनी। दरीच्या सर्द भोंताली.

तुषारांचे हिरेमोत्यें। जणों तूं फेंकिसी हातें,
खुशीचें दान कोणातें। मिळे ऐसें कधीं काळीं?

कुणी तांदूळ वा कांडे। रुप्याचे भंगती हांडे,
मण्यांचा कीं भुगा सांडे। कुणाच्या लूट ही भालीं?

घळीमाझारिं घोटाळे। वरी येऊनि फेंसाळे,
कुठें खाचांत रेंगाळे। करी पाणी अशी केली.

उभीं ताठ्यांत जीं झाडें। तयांचीं मोडिसी हाडें,
कुशीं घेसी लव्हाळ्यांना। तयांचा तूं जणों वाली.

विजेचा जन्मदाता तूं। प्रकाशाचा निशीं हेतू,
तुला हा मानवी जंतू। म्हणोनी फार सांभाळी.


                     कवी - भवानीशंकर पंडित
                  --------------------------

  (साभार आणि सौजन्य-संदर्भ -  बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता)
                         'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'
--------------------------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.09.2021-शनिवार.