‘कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता’ - "नको जाऊं बाहेर आज बाळा"

Started by Atul Kaviraje, September 05, 2021, 12:52:04 AM

Previous topic - Next topic

Atul Kaviraje

मित्र/मैत्रिणींनो,

     "बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता", यांच्या सौजन्याने, मी आजपासून या श्रावण महिन्यात  'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता' या सदरांतर्गत दररोज एक कविता आपणापुढे सादर करीत आहे.

     मित्रानो, महाराष्ट्रातील मान्यवर कवी आणि कवयित्रींच्या या श्रावणावरल्या कविता  मला तुम्हांपुढे ठेवण्यास पुष्कळ आनंद होत आहे. त्यांची प्रतिमा आणि प्रगल्भ प्रतिभा, आपणा सर्वांस त्यांच्या सुदर काव्य-पंक्तींतून, रचनेतून ,कवितांतून क्षणोक्षणी प्रत्ययास येईल. त्यांना अभिवादन करून, आणि या त्यांच्या रचनेस नमन करून मी आपणापुढे त्यांच्या कवितेचे पंचविसावे पुष्प सादर करीत आहे. प्रस्तुत कविता ही " माधव (माधव केशव काटदरे) " यांची असून या श्रावण कवितेचे बोल आहेत - "नको जाऊं बाहेर आज बाळा"


                                  कविता पुष्प-पंचविसावे
                              "नको जाऊं बाहेर आज बाळा"
                            ------------------------------


नको जाऊं बाहेर आज बाळा!--
     
निसर्गाचं अत्यंत उत्तम शब्दांत नेटकं चित्रण करणं हे कवी माधव अर्थात माधव केशव काटदरे यांच्या कवितांचं वैशिष्ट्य. 'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'मध्ये आज आपण पाहणार आहोत 'नको जाऊं बाहेर आज बाळा!' ही त्यांची कविता. ही कविता म्हणजे रवींद्रनाथ टागोरांच्या 'दी रेनी डे' या कवितेचा अनुवाद आहे. ती मूळ कविता तर छान आहेच; पण योग्य शब्द आणि योग्य उपमांच्या निवडीमुळे तो अनुवादही इतका सुंदर झाला आहे, की ती अनुवादित कविता न वाटता मूळ कविताच वाटते. या दोन्ही कविता येथे देत आहोत.


नभा आच्छादित करी मेघमाला
तिमिर दाटुनियां वनीं राहियेला
होति जर्जर बहु तालवृक्ष सारे,
जवन पवनाशी झुंजतां बिचारे !

पंख पर्जन्यें भिजुनि मलिन झाले
स्तब्ध चिंचेवरि काक बैसलेले
नदीनिर्जनतट भीति दे मनाला,
नको जाऊं बाहेर आज बाळ !

वईपाशीं बांधुनी ठेविलेली
गाय कपिला बापुडी भिजुनि गेली
तिला बांधुनि गोठ्यांत परत येतें,
बसुनि बाळा तोंवरी रहा येथें !

जागजागीं शेतांत भरे पाणी
धरिति मासे जाउनी तिथें कोणी
गल्लिगल्लींतुनि करित खळखळाटा,
गढुळ पाणी बुझवितें सर्व वाटा !

करुनि घोडा आपुला समीराला
स्वार त्याच्यावरि मेघ गमे झाला
नदीवरुनी घागरी आपुलाल्या,
अधिंच भरुनी बायका परत आल्या !

तऱ्यालागीं हा कोण हांक मारी?
बंद तरिची जाहली असे फेरी
असे आला सरितेस महापूर,
ऐक बाळा! गर्जना तिची घोर !

दिवे अजुनी आहेत पुसायाचे
सांज झाली तरि न तें कळायाचें
जागजागीं मार्गांत चिखल झाला,
नको जाऊं बाहेर आज बाळा !

वाघ सांपडतां पिंजऱ्यांत जैसा
वनीं वेळूंच्या वायु आज तैसा
क्षुब्ध होउनि धडपडे सुटायाला,
शब्द त्याचा दे भीति बालकांला !

                कवी - माधव (माधव केशव काटदरे)
             -----------------------------------
               रवींद्रनाथ टागोरांच्या 'दी रेनी डे' या कवितेचा अनुवाद
            -------------------------------------------------

  (साभार आणि सौजन्य-संदर्भ -  बीट्सऑफइंडिया .कॉम/मेन/श्रावणाच्याकविता)
                         'कवितांचा श्रावण...श्रावणाच्या कविता'
--------------------------------------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.09.2021-रविवार.